गोध्रा हत्याकांडातील मुख्य आरोपीला तब्बल १९ वर्षांनंतर अटक

गोध्रा हत्याकांडातील मुख्य आरोपीला तब्बल १९ वर्षांनंतर अटक

गोध्रा हत्याकांडातील मुख्य आरोपीला तब्बल १९ वर्षांनंतर अटक

गोध्रा हत्याकांडातील मुख्य आरोपीला तब्बल १९ वर्षानंतर पोलिसांनी अटक केली आहे. रफिक हुसैन भटुक असं या आरोपीचं नाव आहे. ५१ वर्षीय रफीक हुसेन भटुक २००२ पासून फरार होता, असं पोलीस अधिकऱ्याने सांगितलं. फेब्रुवारी २००२ रोजी गुजरातमधील पंचमहल जिल्ह्याच्या गोध्रा स्थानकात साबरमती एक्स्प्रेस ट्रेनच्या एका डब्याला जमावाने आग लावली होती. या घटनेत ५९ कारसेवकांचा मृत्यू झाला होता.

५१ वर्षीय भटुक हा संपूर्ण कटात सहभागी असलेल्या आरोपींच्या मुख्य गटाचा एक भाग होता, असं पंचमहल जिल्हा पोलीस अधीक्षक लीना पाटील यांनी सांगितलं. भटुक हा गेले १९ वर्ष फरार होता. गुप्त माहितीच्या आधारे गोध्रा पोलिसांच्या पथकाने रविवारी रात्री रेल्वे स्थानकाजवळील सिग्नल फालिया भागातील घरावर छापा घातला आणि तेथून भटुकला अटक केली, अशी माहिती लीना पाटील यांनी दिली. भटुक याच्यावर कट रचणे, जमावाला भडकवणे आणि रेल्वेचा डबा पेटवण्यासाठी पेट्रोलची व्यवस्था करणे असे अनेक आरोप आहेत. गोध्रा हत्याकांडात त्याचं नाव समोर येताच फरार झाला, असं लीना पाटील यांनी सांगितलं.

या प्रकरणाच्या तपासात जेव्हा त्याचं नाव समोर आलं तेव्हा तो पळून गेला, अशी माहिती लीना पाटील यांनी दिली. फरार झाल्यानंतर भटुक अनेक वर्ष दिल्लीत होता. तेथे तो रेल्वे स्थानक आणि बांधकाम ठिकाणी मजूर म्हणून काम करत असत, असंही पाटील यांनी सांगितलं.

खून आणि दंगलीचे आरोप

तपासादरम्यान नाव समोर आल्यानंतर तो दिल्लीत पळून गेला. त्याच्यावर खून आणि दंगली यासह इतर आरोप आहेत. महत्त्वाचे म्हणजे २ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा हत्याकांडात ५९ कारसेवक मारले गेले आणि त्यानंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात जातीय दंगली झाल्या. पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की, भटुक हा गोध्रा रेल्वे स्थानकात मजूर होता. “कोचवर दगडफेक करण्यात आणि त्यावर पेट्रोल टाकण्यात त्याचा सहभाग होता, त्यानंतर इतर आरोपींनी डब्याला पेटवून दिले,” असं लीना पाटील यांनी सांगितलं. दरम्यान, पुढील तपासासाठी त्याला गोध्रा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देऊ, असं लीना पाटील यांनी सांगितलं.


हेही वाचा – बँक ऑफ महाराष्ट्रासह या चार बँकांचं होणार खासगीकरण


 

First Published on: February 16, 2021 4:02 PM
Exit mobile version