सर्व धर्मियांना आरोग्य सेवा पुरवणारी मशीद!

सर्व धर्मियांना आरोग्य सेवा पुरवणारी मशीद!

हैदराबादमध्ये मशिदीमध्ये सर्व धर्मियांसाठी आरोग्य सेवा

देशात एकीकडे एका मशिदीवरून मोठं रणकंदन पेटलेलं असताना दुसऱ्या एका मशिदीने गरिबांना दिलेला मदतीचा हात चर्चेचा विषय ठरलेला आहे. एकीकडे अयोध्येतील मशिदीवरून हिंदू-मुस्लीम समाजांमध्ये तणाव निर्माण झालेला असतानाच दुसरीकडे हैदराबादमध्ये ‘मशिद-ए-इशक’ या मशिदीने एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे. कोणत्याही धर्मातील व्यक्तींना आरोग्यसेवा पुरवणारं एक आरोग्य सेवा केंद्रच थेट या मशिदीमध्ये सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे आसपासच्या गरीबांना आरोग्य सेवेचा लाभ घेता येत आहे. त्यामुळे धार्मिक ऐक्याचा एक आदर्श नमुनाच या मशिदीने घालून दिला आहे.

गरिबांसाठी एक मदतीचा हात!

‘हेल्पिंग हॅण्ड फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हैदराबादमधल्या मशिद-ए-इशक या मशिदीच्या आसपास मोठ्या प्रमाणावर झोपड्यांमध्ये राहणारी लोकं आहेत. यामध्ये सगळ्याच धर्मांची लोकं आहेत. मात्र, कोणत्याही धर्मियांमध्ये भेदभाव न करता सर्वांनाच या सेवा केंद्रामध्ये आरोग्य सेवा पुरवली जाते.

या मशिदीच्या सभोवताली ९ झोपडपट्टी परिसर आहेत. तब्बल दीड लाख लोकं तिथे राहतात. सरकारी आरोग्य केंद्रांविषयी माहिती नसलेल्या लोकांना इथे आरोग्य सेवा मिळावी हा आमचा मूळ हेतू आहे. सध्या या मशिदीमध्ये दिवसाला ४० ते ५० लोकांना आरोग्य सेवा पुरवली जाते.

मुजतबा अस्कारी, ट्रस्टी, हेल्पिंग हॅण्ड फाऊंडेशन

रुग्णांसाठी वाहतुकीची सुविधा

या परिसरामध्ये सदर आरोग्य केंद्रामुळे नागरिकांना वेळच्या वेळी प्राथमिक आरोग्य सेवा मिळत आहे. तसेच, आवश्यकता असल्यास नागरिकांसाठी वाहतुकीची सोयही करून दिली जाते. त्यामुळे स्थानिकांना सरकारी आरोग्य सेवेप्रमाणेच त्यांच्याच परिसरामध्ये आरोग्य सेवा उपलब्ध झाली आहे.


हेही वाचा – शबरीमला मंदिर सर्वधर्मीयांसाठी खुलं – न्यायालय

First Published on: November 14, 2018 5:16 PM
Exit mobile version