राम जन्मभूमी उडवण्याची पुन्हा धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

राम जन्मभूमी उडवण्याची पुन्हा धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

अयोध्याः राम जन्मभूमी बॉम्बने उडवण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. धमकी आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. पोलीस व प्रशासनाने सर्तक होत सुरक्षेचा आढावा घेतला आहे. गेल्या महिन्यात राम जन्मभूमी बॉम्बने उडवण्याचा कट रचला जात असल्याची माहिती समोर आली होती.

मनोज कुमार यांना हा धमकीचा फोन गुरुवारी आला. हा फोन साडेपाचच्या सुमारास आला. सकाळी १० वाजेपर्यंत राम जन्मभूमी बॉम्बने उडवली जाईल, अशी धमकी फोन करणाऱ्याने दिली. मनोज कुमार यांनी धमकीच्या फोनची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी अज्ञाताविरोधात याची तक्रार नोंदवली आहे. हा फोन कोणी केला. फोन कुठून आला. याची चौकशी पोलीस करत आहेत. याबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. धमकीचा फोन आल्यानंतर गुप्तचर यंत्रणांनीही चौकशी सुरु केली आहे.

प्रभू राम व सितेची मूर्ती साकारण्यासाठी नेपाळ येथील शिळा गुरुवारी राम मंदिर ट्रस्टच्या ताब्यात देण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह होता. राम जन्मभूमी उडवण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या महिन्यात अयोध्येतील राम मंदिरावर पाकिस्तानातील दहशतवादी संघटना हल्ला करण्याची योजना आखत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानंतर राम मंदिरावर हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती.

गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, आत्मघातकी बॉम्बच्या माध्यमातून राम मंदिरावर हल्ला करण्याचा कट रचला जात असल्याचे समजते. तसेच, ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याचा कट रचल्याचे सांगितले जात असून, दहशतवादी नेपाळमार्गे भारतात आत्मघातकी हल्ल्याची योजना आखत असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली होती.

१० व १६ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरावर पाकिस्तानातील दहशतवादी संघटना हल्ला करण्याची योजना आखत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावेळी जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि लष्कर-ए-तैयबा (LeT) या एकमेव दहशतवादी संघटना आहेत ज्या प्रामुख्याने राम मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची योजना आखत असल्याचे समोर आले होते. शिवाय, या दहशतवादी गटांनी नेपाळमार्गे दारूगोळा आणि आत्मघाती बॉम्बर आणण्याची योजना आखली असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे गुरुवारी आलेल्या धमकीच्या फोनने सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर गेल्या आहेत.

 

First Published on: February 2, 2023 9:50 PM
Exit mobile version