इस्राईलसोबत भारत बनवणार कोरोना फास्ट टेस्ट किट

इस्राईलसोबत भारत बनवणार कोरोना फास्ट टेस्ट किट

India - Israel

कोविड -१९ विरुद्धच्या लढाईत आता भारत-इस्राईल एकत्र काम करण्यास सज्ज झाले आहेत. इस्राईलमधील संशोधकांची एक उच्चस्तरीय टीम कोरोनासाठी जलद चाचणी किट विकसित करण्यासाठी भारतात पोहोचली आहे. सोमवारपासून भारतासोबत हे पथक काम करणार असून या चाचणी किटद्वारे ३० सेकंदात रिपोर्ट मिळू शकतो.

इस्त्राईलचे भारतातील राजदूत रॉन मालका म्हणाले की, जर चाचणी किट विकसित केली गेली तर कोविड -१९ विरुद्धच्या लढ्यात ही मोठी कामगिरी असू शकते. इस्रायलच्या दूतावासाने गेल्या आठवड्यात सांगितले की, कोविड -१९ जलद चाचणी किट विकसित करण्यासाठी इस्त्रायली संरक्षण मंत्रालयाच्या संशोधन व विकास संघाने भारताचे मुख्य वैज्ञानिक के. विजय राघवन आणि संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) सह जवळून काम करत आहेत. इस्राईलच्या संरक्षण मंत्रालयामधील ‘डिरेक्टरेट ऑफ डिफेन्स रिसर्च अण्ड डेव्हलपमेंट’ टीम आणि त्यांचे भारतीय सहयोगी, अनेक जलद निदानविषयक उपायांची प्रभावीता शोधण्यासाठी अंतिम टप्प्यात चाचण्या घेतील.

मालका म्हणाले की कोविड -१९ चा प्रतिकार करण्यासाठी इस्त्रायली तज्ञ विशेष विमानाने सोमवारी सकाळी येथे दाखल झाले. ते म्हणाले की, विशेष विमानाने इस्राईलमधील कोविड -१९ संबंधी विकसित केलेली अत्याधुनिक उपकरणेही आणली आहेत. हे श्वासोच्छवासाचे प्रगत यंत्र आहे, ज्यावर इस्त्राईलने निर्यात बंदी केली आहे, परंतु हे यंत्र भारतात आणण्यासाठी सूट देण्यात आली होती असेही ते म्हणाले.

First Published on: July 27, 2020 6:25 PM
Exit mobile version