बडगाम आणि राजौरी येथे दोन वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये एकूण पाच दहशतवाद्यांचा खात्मा

बडगाम आणि राजौरी येथे दोन वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये एकूण पाच दहशतवाद्यांचा खात्मा

गेल्या अनेक महिन्यांपासून जम्मू-काश्मीरचे नागरिक दहशतवादांच्या निशाणावर आहेत. सातत्याने दहशतवाद्यांकडून जम्मू-काश्मीरमध्ये हल्ले केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर दहशतवादविरोधी कारवाया सुरूच आहेत. अशातच गेल्या 24 तासांत बडगाम आणि राजौरी येथे दोन वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये एकूण पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती मिळते. तसेच, 30 किलो IED जप्त करण्यात आला आहे. या वर्षात आतापर्यंत 136 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात गुरूवारी सकाळी एका संशयित आत्मघातकी गटाने लष्कराच्या छावणीत घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आणि तीन जवान शहीद झाल्याची माहिती समोर येत आहे.

या हल्ल्यात आणखी दोन जवान जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. “दहशतवाद्यांनी परगलमधील लष्कराच्या छावणीचे कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न केला. जवानांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर चकमक सुरू झाली. यामध्ये दोन दहशतवादी मारले गेले आहेत”, अशी माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक मुकेश सिंह यांनी दिली.

याआधी बुधवारी, बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचे तीन दहशतवादी मारले गेले. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी जिल्ह्यातील खानसाहिब भागातील वॉटरहोल येथे घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केल्यानंतर शोध मोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले.

चकमकीच्या ठिकाणी वॉन्टेड दहशतवादी लतीफ रादरसह लष्कराच्या तीन दहशतवाद्यांना घेरण्यात आले. दहशतवाद्यांकडून भ्याड साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. लतीफ, राहुल भट आणि अमरीन भट यांच्यासह अनेक नागरिकांच्या हत्येत या दहशतवाद्याचा हात आहे.

राजौरीतील हल्ल्याबाबत मुकेश सिंह म्हणाले की, सुभेदार राजेंद्र प्रसाद, रायफलमॅन मनोज कुमार आणि रायफलमन लक्ष्मणन डी यांनी ऑपरेशन दरम्यान राजौरी येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना सर्वोच्च बलिदान दिले आहे. दारहाळ पोलीस ठाण्यापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या या लष्करी छावणीत अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला आहे.

राजौरीचे एसएसपी मोहम्मद अस्लम यांनी सांगितले की, बुधवारी रात्री 3.30 वाजता दहशतवाद्यांनी पोस्टवर ग्रेनेड हल्ला करत कॅम्पमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. लष्कराच्या जवानांनी प्रत्युत्तर दिले आणि चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले असून, 3 जवानही शहीद झाले.

जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी राजौरी जिल्ह्यातील सुरक्षा दलांच्या छावणीवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. तसेच, दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांना योग्यरित्या हाताळण्याचे आवाहन केले.


हेही वाचा – धरणे ओव्हरफ्लो झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

First Published on: August 11, 2022 7:02 PM
Exit mobile version