महापालिकेच्या कूपर रुग्णालयातही रक्तघटक मिळणार

महापालिकेच्या कूपर रुग्णालयातही रक्तघटक मिळणार

देवेंद्र फडणवीस

पालिकेच्या कूपर हॉस्पिटलमधील रक्तपेढीत लवकरच पीपीपी तत्त्वावर रक्तघटक उपलब्ध होणार आहेत. रुग्णाला जेवढी रक्ताची गरज असते, तेवढीच रक्तघटकांचीही गरज असते. पण,सर्वच पालिकेच्या हॉस्पिटलमध्येही रक्तघटकांची सोय उपलब्ध होत नाही. त्यामुळे, रक्तघटक मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची खूपच धावपळ होते. डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांना प्लेटलेट्स आणि प्लाझमाची गरज असते. रक्तपेढीत रक्तासहीत रक्तघटकही उपलब्ध झाले तर, रुग्णांची गैरसोय होणार नाही. कूपर हॉस्पिटलमध्ये रक्तपेढी खाजगी सहकार तत्त्वावर चालवण्याचा निर्णय २०१८ मध्ये घेण्यात आला होता. त्यानुसार, हॉस्पिटलमध्ये रक्तपेढी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. रक्तातील अनेक घटकांचे विघटन करुन आवश्यकतेनुसार, रुग्णांची सोय झाली पाहीजे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले आहे.

या रक्तपेढीतील रक्तघटकांचा फायदा अनेक योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णांनाही मिळणार आहे. तसेच थॅलेसेमियाच्या रुग्णांना या घटकांचा मोफत पुरवठा केला जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. ‘‘कूपर हॉस्पिटलच्या बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयात मान्यता मिळण्यासाठी भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या अनेक निकषांपैकी अशी रक्तपेढी उपलब्ध असणे हा एक निकष आहे. यामुळे ही रक्तपेढी खासगी भागिदारी तत्वावर चालवली जाणार आहे. या निर्णयातून गोरगरीब रुग्णांना फायदा मिळावा यामागचा हेतू आहे. तसेच महापालिकेतील कर्मचारी वर्ग आणि साधनसामुग्री इत्यादींवर होणारा अंदाजे १.५ कोटी रुपये इतका वार्षिक खर्च वाचवता येईल.’’

या रक्तपेढीच्या माध्यमातून उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून दिले जात आहे. तरीही ही रक्तपेढी सरकारी-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर चालवण्याचा निर्णय का घेण्यात आला ? असा प्रश्न आमदार प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिले आहे.

First Published on: June 20, 2019 2:58 PM
Exit mobile version