Karnataka election : काँग्रेसला मिळालेल्या विजयामागे आमचा ‘हात’, आपचा दावा

Karnataka election : काँग्रेसला मिळालेल्या विजयामागे आमचा ‘हात’, आपचा दावा

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे प्रमुख नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी कर्नाटक निवडणुकीच्या (Karnataka Assembly election, 2023) निकालाबाबत मोठा दावा केला आहे. काँग्रेसच्या (Congress) विजयामागे आम आदमी पक्षाचा (AAP) मोठा हात असल्याचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटले आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यातून कर्नाटकच्या जनतेला दिलेली आश्वासने ही सर्व ‘आप’चीच मूळ कल्पना असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

वास्तविक, आम आदमी पार्टीने दिल्लीत ज्या उपाययोजना केल्या आहेत, तशाच प्रकारचे आश्वासन काँग्रेसने दिले असून त्याचाच उल्लेख अरविंद केजरीवाल यांनी केला. काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात मोफत वीज, मोफत रेशन आणि बेरोजगारी भत्ता देण्याचे आश्वासन देऊन कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला असल्याचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले. देशाच्या राजकीय दृष्टीकोनात काही बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नात आम आदमी पार्टी यशस्वी झाली आहे. कारण इतर पक्ष देखील आता शिक्षण आणि आरोग्य यासारख्या मुद्द्यांवर मते मागत आहेत, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

आम्ही मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते, तेव्हा काँग्रेसनेही तेच आश्वासन दिले. आम्ही बेरोजगारी भत्ता, मोफत रेशन आणि महिलांना दरमहा एक हजार रुपये देऊ, असे जाहीर केले होते. काँग्रेसने देखील हेच आश्वासन दिले, असे सांगून केजरीवाल म्हणाले, पूर्वी जात-धर्माच्या आधारावर मते मागणारी भाजपाही आता अशी आश्वासने देत आहे.

ममतांचा बदलला सूर
नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 135 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले. 224 सदस्यीय विधानसभेत सत्तास्थापनेसाठी 113 जागा जिंकणे आवश्यक असते. कर्नाटक विजयामुळे केवळ काँग्रेसच नव्हे तर, सर्वच विरोधकांना हुरूप आला आहे. काँग्रेसपासून चार हात लांब राहण्याचेच धोरण अवलंबणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा सूरही मवाळ झाला आहे. जिथे काँग्रेस मजबूत असेल तिथे त्यांनी लढले पाहिजे. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. मात्र, काँग्रेसनेही इतर पक्षांनाही साथ द्यायला हवी, असे त्यांनी अलीकडेच म्हटले आहे.

First Published on: May 22, 2023 9:08 AM
Exit mobile version