खर्गे विरुद्ध थरूर! काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मुंबईतून कोणाला किती मते मिळणार?

खर्गे विरुद्ध थरूर! काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मुंबईतून कोणाला किती मते मिळणार?

मुंबई – काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी चुरस वाढली असून मल्लिकार्जून खर्गे आणि शशी थरुर यांच्यात मुख्य लढत होणार आहे. उमेदवारी मागे घेण्यासाठी आजची शेवटची तारीख होती. त्यानुसार, अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जून खर्गे आणि शशी थरुर एकमेकांविरोधात लढणार आहेत. मल्लिकार्जून खर्गे यांना सर्वाधिक पाठिंबा मिळण्याची शक्यता असताना त्यांच्यासाठी मुंबईतून मिळणारी मते फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्रातून एकूण ४०० मते असून त्यापैकी २०० मते मुंबईतून मिळणार आहेत. मात्र, २०० पैकी १०० पेक्षा जास्त मते शशी थरुर यांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे मुंबईतील किती मते शशी थरुर आणि मल्लिकार्जून खर्गेंना जातात हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, ही लढत या दोघांमधील असली तरीही सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा मात्र मल्लिकार्जून खर्गे यांनाच पाठिंबा आहे.

हेही वाचा – उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरिता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून राहुल गांधींना साकडे, शशी थरूर यांचा दावा

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा आहे. राहुल गांधी यांनी पुढील अध्यक्ष व्हावं अशी मागणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासह अनेक नेत्यांनी केली होती. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत हार पत्कारल्याने राहुल गांधी यांनी अध्यक्षपदासाठी विरोध केला होता. त्यामुळे अशोक गहलोत यांचं नाव चर्चेत होतं. मात्र, त्यांच्या उमेदवारीने राजस्थानत सत्तासंघर्ष निर्माण झाला. त्यामुळे सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून अशोक गहलोत यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर, राज्यसभेचे विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतरस लागलीच, खासदार शशी थरुर यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

८ ऑक्टोबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे, काँग्रेसच्या अध्यक्षपदाची खरी लढत आता मल्लिकार्जून खर्गे आणि शशी थरूर यांच्यातच होणार आहे. हे दोनच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

हेही वाचा – काँग्रेस अध्यक्षपदाची औपचारिकता!

दरम्यान, ७ ऑक्टोबरपासूनच मल्लिकार्जून खर्गे निवडणुकीच्या प्रचारासाठी बाहेर पडले आहेत. येत्या ५ दिवसांत ते १० राज्यांच्या राजधान्यांना भेट देणार आहेत. तसंच, ते मुंबईतही येणार आहेत. १७ ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार असून १९ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

हेही वाचा आरएसएस आणि सावरकरांनी पैशांसाठी इंग्रजांची मदत केली; राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

First Published on: October 8, 2022 6:59 PM
Exit mobile version