बंगालमध्ये पुन्हा संघर्ष; कोलकात्यात भाजपा कार्यकर्ते-पोलिसांत झटापट

बंगालमध्ये पुन्हा संघर्ष; कोलकात्यात भाजपा कार्यकर्ते-पोलिसांत झटापट

फोटो सौजन्य : एएनआय ट्विट

ममता बॅनर्जी सरकारच्या विरोधात आज कोलकाता येथे भाजपाचे कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. बिपीन बिहारी गांगुली रस्त्यावर हा मोर्चा आल्यावर भाजपा कार्यकर्ते आणि पोलिसांत झटापट झाली. त्यामुळे कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या फवाऱ्याचा मारा केला, तसेच अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. या मोर्चात भाजपाचे सर्व आमदार सहभागी असल्याचे समजते.

शनिवारी बशीरहाट येथे भाजपाच्या दोन कार्यकर्त्यांची कथित हत्या झाल्याचा आरोप करत त्याचा निषेध म्हणून हा मोर्चा काढला होता. लाल बाजार भागात असलेल्या राज्याच्या पोलिस मुख्यालयावर जाणाऱ्या या मोर्चाला पोलिसांनी पुढे न जाण्याबाबत वारंवार सूचना दिल्या. मात्र मोर्चातील कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत झटापट होऊन तो बेकाबू झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना पांगविण्यासाठी लाठीमार केला, तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या फवाऱ्याचा वापर केला.

लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान भारतीय जनता पार्टी आणि तृणमुल काँग्रेस यांच्यातील वाद टोकाला पोहोचला होता. याच काळात आपले काही कार्यकर्ते मारले गेल्याचा आरोप भाजपाने केला होता. तसेच निवडणूकीसाठी कोलकाता येथे अमित शाह यांच्या रॅलीत त्यांच्यावर तृणमुलच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप भाजपाने केला होता. दोन्ही पक्षातील तीच धूसफुस निवडणूक निकालानंतरही सुरूच राहिली.

हेही वाचा : पूर्वनियोजित ‘द्रष्टेपण’

त्याच शनिवारी २४ परगणा येथे भाजपाच्या कथित २ कार्यकर्त्यांची हत्या तृणमुलने केल्याचा आरोप भाजपाने केल्यानंतर या वादात ठिणगी पडली. त्यानंतर हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना या भागात घडल्या. भाजपाने १० जून रोजी बंगाल बंदची हाक दिली आणि कायदा व सुव्यवस्था बिघडल्याने या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी घेतली. तर ममता बॅनर्जी यांनी ही भाजपाची पद्धतशीर चाल असून गुजरात दंगलींप्रमाणेच येथे परिस्थिती निर्माण करून बंगालची सत्ता त्यांना काबीज करायची आहे असा आरोप केला होता. दरम्यान कालपासून तेथील दोन्ही पक्षांमधला वाद जास्तच पेटला होता.

First Published on: June 12, 2019 2:19 PM
Exit mobile version