आम्ही भारतासमोर लहान

आम्ही भारतासमोर लहान

भारताविरोधात सतत गरळ ओकणारे मलेशियाचे पंतप्रधान महातिर मोहम्मद यांना अखेर आता उपरती झाली आहे. भारताने मलेशियाच्या पाम तेलावर टाकलेल्या बहिष्काराला प्रत्युत्तर म्हणून आपण काहीही करू शकत नाही. भारतासारख्या विशाल अर्थव्यवस्थेसमोर मलेशिया कुठेही टिकणार नाही. त्यामुळे आपण प्रत्युतरादाखल कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. आपल्याला यातून बाहेर येण्याचा मार्ग शोधावा लागेल, असे महातिर यांनी म्हटले आहे.

मलेशिया खाद्य तेलाची निर्मिती करणारा जगातील सर्वात मोठा दुसरा देश आहे. तर भारत खाद्य तेलाचा सर्वात मोठा आयातदार आहे. पण मलेशियाच्या पंतप्रधानांनी जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर भारतावर टीका केली होती. प्रत्युत्तर म्हणून भारताने मलेशियाकडून आयात होणारे पाम तेल रोखले होते. त्यामुळे सर्वात मोठ्या आयातदार देशानेच आयात बंद केल्यामुळे मलेशियाच्या अर्थव्यवस्थेलाही हादरा बसला आहे.

मलेशिया हा मुस्लीम बहुल देश आहे. भारतातील नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरही मलेशियाच्या पंतप्रधानांनी टीका केली होती.परिणामी गेल्या आठवड्यात मलेशियन खाद्य तेलाचे भविष्य दर १० टक्क्यांनी घसरले, जी गेल्या ११ वर्षांतील सर्वात मोठी साप्ताहिक घसरण आहे.

झाकीर नाईकचा आश्रयदाता मलेशिया

मलेशिया फक्त भारताविरोधातील वक्तव्यापुरताच मर्यादित नाही. वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईकलाही मलेशियाने शरण दिली आहे. झाकीर नाईकचे स्थायी नागरिकत्व मागे घेण्याची विनंती भारताने केली होती, जी मलेशियाने फेटाळून लावली. यामुळेही भारत नाराज आहे. झाकीर नाईक पैशांची अफरातफर आणि भडकावू भाषणामुळे रडारवर आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो फरार असून मलेशियात स्थायिक आहे. भारताने निष्पक्ष न्यायालयीन कारवाईचा विश्वास दिला तरीही आम्ही झाकीर नाईकला ताब्यात देणार नाही, कारण नाईकचा भारतात छळ केला जाईल, असेही वक्तव्य महातिर यांनी केले होते.

First Published on: January 21, 2020 5:53 AM
Exit mobile version