राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचा प्रस्ताव पवारांनी नाकारला, ममता बॅनर्जींची माहिती

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचा प्रस्ताव पवारांनी नाकारला, ममता बॅनर्जींची माहिती

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी दिल्लीत मोर्चेबांधणी सुरू आहे. मागील काही दिवसांपासून अनेक पक्षांच्या बैठका सुरू आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी २२ पक्षांच्या विरोधी पक्षनेत्यांची बैठक बोलावली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी द्यावी, अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचा प्रस्ताव शरद पवारांनी नाकारला असल्याची माहिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली आहे.

ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या म्हणाल्या की, शरद पवार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक नाहीयेत. परंतु ते जर इच्छुक असतील, तर त्यांना संपूर्ण पक्षाचा पाठिंबा आहे. परंतु इतर कोणता उमेदवार इच्छुक असेल तर त्याला संपूर्ण पक्षाचा पाठिंबा असेल, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. अनेक डाव्या पक्षांनी शरद पवारांना उमेदवारी स्वीकारण्याची मागणी केली होती. परंतु त्यांनी उमेदवारी नाकारली आहे.

काँग्रेस पक्षाने अजून कुणाचेही नाव जाहीर केलेले नाहीये. मात्र, ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना राष्ट्रपती निवडणुकांच्या संदर्भात बैठकीसाठी आमंत्रण दिले होते. जुलैमध्ये होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकांसाठी ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला पाच मोठे नेते गैरहजर होते.

पश्चिम बंगाल विधानसभेत मोठा विजय मिळवल्यापासून ममता बॅनर्जी विरोधकांना एकत्र करण्यात गुंतल्या आहेत. दरम्यान त्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली तर त्यांनी शरद पवारांशी देखील चर्चा केली, वेळोवेळी पत्र लिहून इतर नेत्यांना एकत्र आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात होणारी ही बैठकही याच पार्श्वभूमीवर घेण्यात आली आहे.


हेही वाचा : राष्ट्रपती पदाच्या शर्यतीतून शरद पवार बाहेर; विरोधी पक्षांच्या बैठकीत आज नव्या नावावर चर्चा?


 

First Published on: June 15, 2022 6:08 PM
Exit mobile version