झारखंड मॉब लिंचिंग प्रकरणी ५ जणांना अटक

झारखंड मॉब लिंचिंग प्रकरणी ५ जणांना अटक

मोटार सायकल चोरीचा संशय आला म्हणून झारखंडमध्ये एका मुस्लीम तरुणाला जमावाने बेदम मारहाण केल्याची घटनामागच्या आठवड्यात घडली होती. या मारहाणीत संबंधित तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणावरून मोठा गदारोळ उठल्यानंतर अखेर आठवड्याभरानंतर पोलिसांनी या प्रकरणी ५ जणांना अटक केली आहे. याशिवाय या प्रकरणात २ पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय अजून एक आरोपी फरार असून त्याचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

जय श्रीराम, जय हनुमानच्या घोषणा देण्याची बळजबरी

तबरेज अन्सारी (वय २४), असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी शाइस्ता नावाच्या तरुणीसोबत त्याचा विवाह झाला होता. मंगळवारी तो मुताबिक अन्सारी या त्याच्या नातेवाईकासोबत, तसेच काही मित्रांसोबत खरसावन जिल्ह्यातील धातकिडीह गावात गेला होता. याच दरम्यान त्याच्यावर जमावाने हल्ला केला. तबरेजने मोटर सायकल चोरी केल्याचा त्यांचा आरोप होता. यासाठी संतापलेल्या जमावाने त्याला खांबाला बांधले आणि खूप वेळ त्याला लाकडाने मारहाण करण्यात आली. या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये तबरेजने त्याची ओळख सांगितल्यानंतर मारहाण करणारे त्याला ‘जय श्रीराम’ आणि ‘जय हनुमान’ घोषणा देण्यासाठी सांगत असल्याचं दिसत होतं. त्याने ही घोषणा देण्यास नकार दिल्यावर त्याला अजून मारहाण केली गेली. जेव्हा तो बेशुद्ध झाला तेव्हा त्याला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आलं. शनिवारी चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याला  हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं मात्र तिथे त्याला मृत घोषित केलं गेलं.

त्याच्या कुटुंबियांचा असा आरोप आहे की, तबरेजने उपचार करण्यासाठी पोलिसांना विनंती केली होती. मात्र, त्याच्यावर वेळीच उपचार करण्यात आले नाहीत. तसेच त्याच्या कुटुंबियांना त्याला भेटायला देखील पोलीसांनी परवानगी दिली नाही. चार दिवसांनंतर जेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नेण्यात आलं, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर तबरेजच्या कुटुंबियांनी पोलीस, डॉक्टर आणि या घटनेशी संबंधित लोकांविरोध तक्रार दाखल केली.


हेही वाचा – देशात धर्मांधतेचा कहर, निष्पापांचा बळी घेण्याची मालिका सुरूच – नसीम खान


जेव्हा सर्व देशातून या घटनेला टीका होत होती तेव्हा पोलिसांनी एक विशेष पथकाची स्थापना केली. या घटनेमध्ये सामील असलेल्या दोन पोलीस अधीक्षक चंद्रमोहन ओराव आणि बिपीन बिहारी यांना निलंबित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी संसदेत जेव्हा खासदार असदु्द्दीन ओवैसी शपथ घेण्यासाठी उठले, तेव्हा देखील संसदेतील भाजपाच्या सदस्यांनी ‘जय श्रीराम’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषण्या दिल्या होत्या.

First Published on: June 24, 2019 9:24 PM
Exit mobile version