८ वर्षांच्या पुनीतसाठी त्याने रोजा सोडला!

८ वर्षांच्या पुनीतसाठी त्याने रोजा सोडला!

(फोटो प्रातिनिधिक आहे)

धर्मापेक्षा मानवता श्रेष्ठ असल्याची जाणीव बिहारमध्ये गोपालगंजमधील एका मुस्लिम व्यक्तीने करुन दिली. एका आठ वर्षांच्या तरुणाकरता गोपालगंजमधील जावेद आलम या व्यक्तीने रोजा सोडल्याचे समोर आले आहे. मुस्लिम धर्मात पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजानच्या महिन्यात रोजा (उपवास) ठेवला जातो. मात्र आठ वर्षांच्या पुनीत कुमारला थॅलेसेमिया हा आजार असून त्याला तात्काळ रक्ताची गरज आहे, अशी माहिती मिळताच जावेद आलम यांनी रोजा (उपवास) सोडून पुनीतला रक्तदान केले. जावेद आलम यांच्या माणुसकीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

जावेदची रुग्णालयात धाव

बिहारमधील गोपालगंजमध्ये राहणाऱ्या भूपेंद्र कुमार यांच्या आठ वर्षांच्या पुनीतला थॅलेसेमिया आजार झाला आहे. या मुलावर गोपालगंजमधील एका रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. थॅलेसेमियाचा आजार असलेल्या व्यक्तीला नियमित रक्तसंक्रमण करावे लागते. हा आजार झाल्यामुळे पुनीतच्या शरीरात जन्मापासूनच हिमोग्लोबिनची कमतरता असल्याचे डॉक्टरांनी पुनीतच्या कुटुंबियांना सांगितले. पुनीतचा रक्तगट A+ असून रुग्णालयात हा रक्तगट उपलब्ध नसल्याचे डॉक्टरांनी कुटुंबातील व्यक्तींना सांगितले.

(फोटो प्रातिनिधिक आहे)

रुग्णालयात रक्त उपलब्ध नसल्याने पुनीतच्या कुटुंबियांनी बाहेर शोधाशोध सुरू केली. त्यानंतर पुनीतच्या घरातल्यांचे रक्तगट तपासण्यात आले. मात्र, पुनीतचा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीशी रक्तगट जुळत नव्हता. अखेर पुनीतच्या वडिलांनी रक्त पुरवठा पथकाशी संपर्क साधला. त्यानंतर जिल्हा रक्त पुरवठा पथकातील अन्वर अली यांनी जावेद आलम यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. जावेद आलम यांचा A+ हा रक्तगट असल्याने त्यांच्याशी संपर्क केला. आपल्या रक्ताची एका आठ वर्षाच्या मुलाला गरज असल्याचे समजताच जावेदने तातडीने रुग्णालयात धाव घेतली.

…आणि त्याने रोजा सोडला

जावेद आलम हा मुस्लिम असून त्याचा रोजाचा उपवास होता. काही झाले तरी या व्यक्ती उपवास सोडण्यास तयार नसतात. तरीही पुनीतबद्दल माहिती मिळताच जावेद रूग्णालयात दाखल झाला. मात्र जावेदला डॉक्टरांनी उपाशीपोटी रक्तदान करण्यास नकार दिला. अखेर जावेदने आपल्या धर्मापेक्षाही माणुसकीला जास्त महत्त्व देत एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आणि पुनीतसाठी रोजा मोडून रक्तदान केलं.

First Published on: May 26, 2018 4:58 AM
Exit mobile version