सोनिया, राहुल गांधींना ईडीचे समन्स

सोनिया, राहुल गांधींना ईडीचे समन्स

नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी समन्स बजावले आहे. थेट गांधी घराण्यातील नेत्यांमागे आता ईडी चौकशीचा ससेमिरा लागणार असल्याच्या वृत्ताने राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकार आपल्या स्वार्थासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करीत असल्याची टीका याप्रकरणी विरोधी पक्ष काँग्रेसमधील नेत्यांकडून करण्यात आली, तर केंद्रीय तपास यंत्रणा या निष्पक्षपणे आपले काम करीत असल्याचा पुनरूच्चार सत्ताधारी भाजपमधील नेत्यांकडून करण्यात आला.

काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी आणि रणदीप सुरजेवाला यांनी बुधवारी काँग्रेस मुख्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सोनिया आणि राहुल गांधी यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आल्याची माहिती दिली. सोनिया गांधी या स्वतः चौकशीला सामोरे जाणार असल्याचे अभिषेक मनू सिंघवी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, तर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे सध्या परदेश दौर्‍यावर आहेत. येत्या ८ जूनपर्यंत राहुल गांधी भारतात परतल्यास तेही चौकशीला स्वतः सामोरे जातील, असे अभिषेक मनू सिंघवी यांनी स्पष्ट केले. आपल्या परदेश दौर्‍यामुळे जर राहुल गांधी उपस्थित राहू न शकल्यास ईडीकडे यासाठी वेळ मागण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

काय आहे प्रकरण?
माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘नॅशनल हेराल्ड’ हे वृत्तपत्र सुरू केले होते. काही काळानंतर हे वृत्तपत्र बंद पडले, मात्र २०१२ साली सोनिया आणि राहुल गांधींच्या ‘यंग इंडिया’ या कंपनीने या वृत्तपत्राचे हक्क पुन्हा विकत घेतले. या प्रक्रियेदरम्यान १६०० कोटींची संपत्ती फक्त ५० लाखांत घेतल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सध्या विविध तपास यंत्रणांकडून सुरू आहे. याबाबत स्वामी यांनी न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. आपल्या याचिकेत त्यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांविरोधात आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप केले होते. याआधी दिल्लीच्या पतियाळा हाऊस न्यायालयाने नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात २०१५ साली सोनिया आणि राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला आहे.

भाजपचे सूडाचे राजकारण – काँग्रेस
काँग्रेसने हे सूडाचे राजकारण असल्याची टीका केंदातील सत्ताधारी भाजपवर केली. ईडीच्या नोटिशीला घाबरणार नसल्याचे काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्र सरकार सूडाच्या भावनेने आंधळे झाले आहे. या प्रकरणात मनी लाँड्रिंगचा कोणताही पुरावा नसताना सोनिया आणि राहुल गांधी यांना अडकविण्यात येत असल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले.

काँग्रेसच्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले की, मी गुन्हेगार आहे, असे म्हणणारा गुन्हेगार कधी पाहिला आहे का? ते आणि त्यांचे नेते आरोप मानण्यास नकारच देणार. याबाबत तपास यंत्रणांकडे कागदोपत्री पुरावे आहेत. जर आरोपपत्र दाखल झाले तर ते रद्द करण्यासाठी तुम्ही न्यायालयात जाल, पण त्यांनी तसे केले नाही. त्यांनी न्यायालयात जाऊन जामीन मागितला. याचा अर्थ ते दोषी आहेत, असा हल्लाबोल जे. पी. नड्डा यांनी केला.

First Published on: June 2, 2022 4:35 AM
Exit mobile version