आईची काळजी घेण्यासाठी मोठ्या घराची नव्हे, तर मोठ्या हृदयाची गरज, सर्वोच्च न्यायालयाची टिपण्णी

आईची काळजी घेण्यासाठी मोठ्या घराची नव्हे, तर मोठ्या हृदयाची गरज, सर्वोच्च न्यायालयाची टिपण्णी

नवी दिल्ली : आई आपल्या मुलाच्या आनंदासाठी सर्व काही करण्यास तयार असते. आईच्या सुखाचा संसार खरं तर मुलाच्या आनंदात असतो. आई म्हातारी झाली तरी आपल्या मुलाला त्रास होऊ नये हीच तिची इच्छा असते. पण कित्येकदा असे ऐकायला मिळते की, एखाद्या मुलानं आपल्या वृद्ध आईला घरातून हाकलून दिले, तर दुसऱ्या कोणीतरी आईला मारहाण केली. अनेक मुले त्यांच्या वृद्ध आई-वडिलांची काळजी घेत नाहीत. अशाच एका प्रकरणात देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ‘आईची काळजी घेण्यासाठी मोठे घर नसून मोठे हृदय असणे आवश्यक आहे.’

हिंदुस्तान टाईम्समधील वृत्तानुसार, 89 वर्षीय वृद्ध महिला वैदेही सिंह यांच्या मुली पुष्पा तिवारी आणि गायत्री कुमार यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती की, तिचा भाऊ आईची काळजी घेत नाही. बहिणींनी आपल्या भावावर आरोप केला की, त्यांच्या भावाने आईची संपत्ती आपल्या नावावर केली. तिच्या आईला स्मृतिभ्रंश आहे, त्यामुळे तिचा ताबा तिला देण्यात यावा, जेणेकरून ती आईची काळजी घेऊ शकेल, असे पुष्पा आणि गायत्रीचे म्हणणे आहे.

मुलाचे हृदय विशाल असणे आवश्यक

या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि सूर्यकांत यांच्या खंडपीठाने सांगितले की, मुली त्यांच्या आईची जबाबदारी घेऊ शकतात. मुलगाही आईला भेटू शकतो. या मुद्यावर मुलाच्या वतीने युक्तिवाद करताना वकिलाने सांगितले की, पुष्पा आणि गायत्री या त्यांच्या कुटुंबासोबत राहतात आणि मुलींकडे आईला ठेवण्यासाठी वेगळी अशी जागा नाही. त्यावर कोर्ट म्हणाले, ‘प्रश्न तुमचं क्षेत्र किती मोठं आहे हा नाही, तर तुमच्या आईची काळजी घ्यायचं मन किती मोठं आहे हा आहे.’ या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे की, महिलेची कोणतीही मालमत्ता आता हस्तांतरीत होणार नाही. यासोबतच मुलींना आईचा ताबा देण्याच्या प्रश्नावर न्यायालयाने मुलाकडून मंगळवारपर्यंत उत्तर मागितले आहे.

मार्च महिन्यात ही याचिका दाखल करण्यात आली होती

मुलींनी मार्च महिन्यात याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये म्हटले होते की, फेब्रुवारीमध्ये आईला दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर भावाने आईला अज्ञातस्थळी ठेवले आणि तिला भेटूही दिले जात नाही. यानंतर कोर्टाने मुलाला नोटीस बजावली आणि आई कुठे आहे, अशी विचारणा केली. यावर मुलाने सांगितले की, तो आईला त्याच्या बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात असलेल्या घरी घेऊन गेला होता. त्यानंतर कोर्टाने आदेश दिला की, पुष्पा तिवारी आणि गायत्री कुमार त्यांच्या आईला भेटू शकतात.

न्यायालयाने चिंता व्यक्त केली

तत्पूर्वी न्यायालयाने पाटणाच्या मेदांता हॉस्पिटलला वैदेही सिंगच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे आदेश दिले होते. वैद्यकीय मंडळाने आपल्या अहवालात मुलींची आई स्मृतिभ्रंशाची रुग्ण असल्याचे न्यायालयाला सांगितले होते. त्यावर न्यायालयाने मुलाला फटकारले आणि सांगितले की, आईची तब्येत बिघडत असतानाही त्याने मालमत्तांचे हस्तांतरण सुरूच ठेवले. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने देशातील वृद्धांच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली.


हेही वाचाः LIC चे गुंतवणूकदार पहिल्याच दिवशी तोट्यात, 8.62% च्या घसरणीसह शेअर्सची लिस्टिंग

First Published on: May 17, 2022 12:11 PM
Exit mobile version