वाहनांना आता १० सेकंदांहून अधिक काळ टोलनाक्यांवर थांबावे लागणार नाही; NHAI च्या नव्या मार्गदर्शक सूचना 

वाहनांना आता १० सेकंदांहून अधिक काळ टोलनाक्यांवर थांबावे लागणार नाही; NHAI च्या नव्या मार्गदर्शक सूचना 

वाहनांना आता १० सेकंदांहून अधिक काळ टोलनाक्यांवर थांबावे लागणार नाही

महामार्गांवर अगदी गर्दीच्या वेळीही वाहनांना टोलनाक्यावर १० सेकंदाहून अधिक काळ थांबावे लागू नये यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याचप्रमाणे टोलनाक्यावर १०० मीटरहूनही अधिक लांब रांग असल्यास ही रांग १०० मीटरपेक्षा कमी होत नाही तोपर्यंत वाहनांकडून कोणताही टोल आकारला जाणार नाही, असे एनएचएआयकडून सांगण्यात आले. टोलनाक्यापासून १०० मीटरच्या अंतरावर पिवळ्या रंगाची रेष आखण्यात येणार आहे. त्याबाहेर गाड्या असल्यास आधीच्या गाड्यांना टोल न भरता पुढे जाऊ दिले जाणार आहे. त्यामुळे टोलनाक्यात काम करणाऱ्या व्यक्तींवर आता अधिक जबाबदारी येणार असल्याचे एनएचएआयने म्हटले आहे.

एनएचएआयच्या निर्णयामुळे दिलासा

टोलनाक्याहून जाणाऱ्या वाहनांचा प्रवास कॅशलेस व झटपट होण्यासाठी वाहनचालकांना काही महिन्यांपूर्वी फास्टॅग (FASTag) बंधनकारक करण्यात आले होते. त्यानंतर बहुतांश टोलनाक्यांवर वाहनांची फारशी गर्दी अनुभवायला मिळत नाही. मात्र,काही कारणास्तव टोलनाक्यावर वाहनांची रांग १०० मीटरहून अधिक वाढल्यास, ती रांग १०० मीटरच्या आत येईपर्यंत वाहनांकडून टोल घेतला जाणार नाही, असे एनएचएआयने स्पष्ट केले आहे. काही टोलनाक्यांवर अजूनही बराच वेळ घालवावा लागत असल्याची तक्रार देशात लांब पल्ल्याचा प्रवास करणारे लोक करतात. आता एनएचएआयने घेतलेल्या निर्णयामुळे त्यांना दिलासा मिळणार आहे.

टोलनाक्यांवर वाहनांची गर्दी कमी

यावर्षी फेब्रुवारीमध्ये एनएचएआयने फास्टॅग अनिवार्य केला होता. त्यामुळे टोलनाक्यांवर वाहनांची गर्दी कमी झालीच, पण सोबतच टोलनाके कॅशलेस झाले. भविष्यात इलेक्‍ट्रानिक टोल कलेक्‍शन (ETC) लक्षात घेऊन ही व्यवस्था केली गेली आहे. फास्टॅगमुळे वाहनचालक आणि टोल कर्मचारी या दोघांमध्येही सोशल डिस्टंसिंगचेही पालन होत आहे. सध्या जवळपास ७५२ टोलनाक्यांवर फास्टॅग अनिवार्य असून त्यामध्ये सुमारे ५७५ टोलनाके एनएचएआयचे आहेत.

 

First Published on: May 26, 2021 10:38 PM
Exit mobile version