निर्भयाला नाही मात्र माझ्या दुसऱ्या एका मुलीला न्याय मिळाला – निर्भयाची आई

निर्भयाला नाही मात्र माझ्या दुसऱ्या एका मुलीला न्याय मिळाला – निर्भयाची आई

निर्भयाची आई

‘हैदराबाद बलात्कार प्रकरणातील दोषी आरोपींचा एन्काऊंटर करुन तेलंगना पोलिसांनी माझ्या सात वर्षांपासून भळभळणाऱ्या जखमेवर मलम लावले आहे. निर्भयाला नाही मात्र निदान माझ्या दुसऱ्या एका मुलीला तरी न्याय मिळाला. याबद्दल मी तेलंगणा पोलिसांचे आभार मानते’, असे निर्भयाची आई आशा देवी म्हणाल्या आहेत. हैदराबाद बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला म्हणून तेलंगणा पोलिसांनी एन्काऊंटर केला. यात चारही आरोपींचा मृत्यू झाला आहे. ही घटना राष्ट्रीय महामार्ग-४४ येथे सकाळी तीन वाजेच्या सुमारास घडली. याबाबत तेलंगणा पोलिसांनी माहिती दिली आहे. या एन्काऊंटरनंतर देशभरातून तेलंगणा पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरबद्दल जनतेकडून आभार व्यक्त केले जात आहेत. बलात्कार करणाऱ्यांसोबत असेच व्हायला हवे, अशी प्रतिक्रिया लोकांकडून येत आहे.


हेही वाचा – हैदराबाद बलात्कार प्रकरण: चारही आरोपींचे एन्काऊंटर


काय आहे हैदराबाद बलात्कार प्रकरण?

हैदराबादच्या शमशाबाद येथे २७ नोव्हेंबर रोजी चार ट्रक ड्रायव्हर आणि क्लीनर यांनी मिळून एका २६ वर्षीय महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार केला होता. बलात्कारानंतर या चारही नराधमांनी पीडितेला जिवंत जाळले होते. या घृणास्पद कृत्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. या घटनेनंतर पीडितेवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना ठेचून काढा, अशी प्रतिक्रिया देशभरातून उमटत होती. दरम्यान, याप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी चारही आरोपींना शोधून काढले. त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी बजावण्यात आली होती. विषयाचे गांभिर्य पाहून या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात सुरु करण्यात आला होता. तेलगंणा पोलीस याप्रकरणी आणखी तपास लावत होते. तपास लावण्यासाठीच ते गुरुवारी रात्री चारही आरोपींना घटनास्थळी घेऊन गेले. तिथे आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला म्हणून पोलिसांना नाईलाजास्तव त्यांच्यावर गोळीबार करावा लागला. यात त्यांचा मृत्यू झाला.


हेही वाचा – गुजरात : अपहरण करुन १४ वर्षीय मुलीवर बलात्कार


निर्भया बलात्कार प्रकरणी १३ डिसेंबरला सुनावणी

डिसेंबर २०१२ मध्ये दिल्लीत निर्भयावर पाशवी सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. नराधमांनी बलात्कार करुन पीडितेची निघृणपणे हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. मात्र, अजूनही आरोपींना शिक्षा झालेली नाही. आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी देशभरातील जनतेने केली आहे. याप्रकरणी कोर्टात खटला सुरु आहे. घटनेला सात वर्ष झाले तरीही आरोपींना शिक्षा झालेली नाही. याप्रकरणी कोर्टात अजूनही खटला सुरु असल्याची माहिती निर्भयाच्या आईने दिले. येत्या १३ डिसेंबरला कोर्टात सुनावणी असून आपण या सुनावणीला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

First Published on: December 6, 2019 9:29 AM
Exit mobile version