‘अँटिलिया’च्या बाहेर स्फोटकांची SUV सापडल्याने नीता अंबानींनी रद्द केला होता गुजरात दौरा!

‘अँटिलिया’च्या बाहेर स्फोटकांची SUV सापडल्याने नीता अंबानींनी रद्द केला होता गुजरात दौरा!

नीता अंबानी

अँटिलिया स्फोटक प्रकरणात एनआयएचे आरोपपत्र दाखल केल्यानंतर अनेक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. फेब्रुवारी महिन्यात दक्षिण मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ घराबाहेर स्फोटके घेऊन जाणारी एसयूव्ही गाडी आढळली होती. यावेळी मुकेश अंबानींची पत्नी नीता अंबानी यांनी त्यांचा गुजरात दौरा रद्द केला होता. घराच्या सुरक्षा प्रमुखांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) दिलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे.

घराच्या सुरक्षा प्रमुखांनी या निवेदनात असे म्हटले की, स्फोटके असलेले वाहन आणि धमकीचे पत्र मिळाल्यानंतर त्यांनी ते लगेच मुकेश अंबानींच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी पुढे एनआयएला असेही सांगितले की, त्या दिवशी नीता अंबानींचा गुजरातमधील जामनगर दौरा निश्चित करण्यात आला होता. मात्र या घटनेनंतर त्यांच्या गुजरात दौरा झोनल डीसीपीच्या सल्ल्याने रद्द करण्यात आला होता. तसेच त्यांना विविध धमक्या येत होत्या, परंतु त्यासर्व धमक्या ऑक्टोबर २०२० मध्ये सुरू झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी संबंधित होते. त्यांनी पुढे निवेदनात असेही म्हटले की, २५ फेब्रुवारी रोजी येथे कारमाईकल रोडवर बेकायदेशीरपणे पार्क केलेल्या एका बेवारस स्कॉर्पिओमध्ये सापडलेल्या धमकीच्या पत्र आणि जिलेटिनच्या काड्यांसाठी अंबानी कुटुंबाचा कोणत्याही विशिष्ट व्यक्तीवर संशय नाही.

समोर आलेल्या माहितीनुसार, माजी पोलीस अधिकारी वाझे हे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. तपास संस्थेच्या मते, ठाण्यातील उद्योजक मनसुख हिरेन यांच्या हत्येतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. काही तांत्रिक कारणामुळे १७ व १८ फेब्रुवारीच्या रात्री विक्रोळी महामार्गावर त्याची स्कॉर्पिओ खराब झाल्याचे पोलिसांना मनसुखने सांगितले होते म्हणून त्याने ती तिथे सोडली. काही तासांनी तो तेथून परत आला तेव्हा त्यांची कार चोरीला गेली होती. ज्या व्यक्तीने मनसुखची स्कॉर्पिओ कार चोरली आणि ती मुकेश अंबानीच्या इमारतीच्या बाहेर सोडली त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. दरम्यान, एसयुव्ही चोरीला गेल्याचा दावा करणारा हिरेन ५ मार्च रोजी ठाणे जिल्ह्यातील एका नाल्यात मृतावस्थेत आढळला होता.


First Published on: September 8, 2021 1:28 PM
Exit mobile version