बिहारमध्ये सरकार कोसळलं, नितीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

बिहारमध्ये सरकार कोसळलं, नितीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

संग्रहित छायाचित्र

पाटणा – देशभर ऑपरेशन लोटस सुरू असताना भाजपाला बिहारमध्ये मोठा धक्का बसला आहे. भाजपने महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणलं होतं. मात्र, बिहारमध्ये भाजपच्या मित्रपक्षानेच म्हणजे जेडीयूने साथ सोडून राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) पक्षासोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यामुळे बिहारमध्ये नितीश कुमार सरकार कोसळलं आहे. (Nitish kumar resign as chief minister, bihar government collapsed)

हेही वाचा – बिहारमध्ये जेडीयू- बीजेपी युती अखेर तुटली; जेडीयू- आरजेडीसोबत स्थापन करणार नवं सरकार

नितीश कुमार यांनी आमदार, खासदारांशी चर्चा केल्यानंतर राज्यपालांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यामुळे बिहारमधील सरकार कोसळलं आहे. दरम्यान, थोड्याच वेळात आरजेडीचे तेजस्वी यादव राज्यपालांच्या भेटीला पोहोचणार आहेत. या भेटीनंतर ते सत्तास्थापनेचा दावा करू शकतील. त्यानंतर नव्या सरकारचा शपथविधी उद्या सकाळीच होण्याची शक्यता आहे.

बिहारमध्ये सत्तासमीकरण कसे आहे?

बिहारमध्ये विधानसभेचे २४३ सदस्य आहेत. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यासाठी १२२ सदस्यांची गरज आहे. बिहारमध्ये सध्या आरजेडी सर्वांत मोठा पक्ष आहे. आरजेडीकडे ७९ आमदार, भाजपाकडे ७७ आणि जेडीयूकडे ४५, काँग्रेसकडे १९, कम्युनिस्ट पक्षाकडे १२ आमदार आणि एआयएमआयएम १, हिंदुस्तानी आवाम मोर्चा ४ आदींसह इतर अपक्ष आमदार आहेत.

हेही वाचा मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कायम ठेवत नितीश कुमारांचे 17 वर्षे धरसोडीचे राजकारण

दरम्यान, जेडीयूकडे ४५ आमदार आहेत, तर आरजेडीकडे ७९ आमदार आहेत. त्यामुळे हे दोघे एकत्र आल्यास सहज सत्तास्थापन होऊ शकते. या दोघांचेही संख्याबळ १२४ होत आहे. यामध्ये काँग्रेस, कम्युनिस्ट पक्षही सहभागी होऊ शकणार आहे. हे चारही पक्ष एकत्र आल्यास महाआघाडीकडे १५५ पेक्षा जास्त संख्याबळ होत आहे.

First Published on: August 9, 2022 4:43 PM
Exit mobile version