1971च्या भारत-पाकिस्तान युद्धाचा हवाला देत तालिबान्यांची पाकला धमकी

काबूल : पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांच्या धमकीनंतर अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने लगेचच पलटवार केला आहे. तालिबानचे ज्येष्ठ नेते आणि अफगाणिस्तानचे उपपंतप्रधान अहमद यासिर यांनी ट्विटरवर, 1971मध्ये पाकिस्तानने भारतीय सैन्यासमोर केलेल्या आत्मसमर्पणाचे ऐतिहासिक चित्र शेअर करत म्हटले आहे की, पाकिस्तानने त्यांच्यावर लष्करी हल्ला केला तर त्यांना अशाच लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल.

पाकिस्तानचे मंत्री राणा सनाउल्लाह यांनी गेल्या गुरुवारी तालिबानला धमकी दिली होती. तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) आपल्या देशावरील हल्ले थांबवले नाहीत, तर पाकिस्तानी सैन्य अफगाणिस्तानात घुसून टीटीपीच्या दहशतवाद्यांचा छुपा तळ उद्ध्वस्त करेल, असे म्हटले होते. टीटीपी संघटनेचे दहशतवादी पाकिस्तानात हल्ले करतात आणि अफगाणिस्तानात लपतात, जिथे तालिबान सरकार त्यांना पाठिंबा देते, असा दावा राणा सनाउल्लाह यांनी केला आहे.

याला अफगाणिस्तानचे उपपंतप्रधान अहमद यासिर यांनी ट्विटरवरून सडेतोड उत्तर दिले आहे. राणा सनाउल्ला! छान! अफगाणिस्तान हा सीरिया, पाकिस्तान किंवा तुर्की नाही. हा अफगाणिस्तान आहे. ही मोठ्या साम्राज्यांची दफनभूमी आहे. आमच्यावर लष्करी हल्ला करण्याचा विचार करू नका, अन्यथा भारतासोबत जशी लज्जास्पद लष्करी शरणागती पत्करावी लागली, तशी स्थिती होईल, असा इशारा त्यांनी ट्वीटवरून दिला आहे. त्यासोबत 1971च्या शरणागतीचा एक फोटो त्यांनी शेअर केला आहे.

तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयाचेही प्रत्युत्तर
पाकिस्तानी मंत्री राणा सनाउल्लाह यांच्या आरोपानंतर तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही निवेदन जारी केले आहे. पाकिस्तान आपल्यावर बिनबुडाचे आरोप करत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. अफगाणिस्तान हे टीटीपी दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान नाही. आम्ही दुर्बळ आहोत, या भ्रमात पाकिस्तानने राहू नये. स्वतःचे संरक्षण कसे करायचे हे आम्हाला चांगलेच माहीत आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने सुनावले आहे.

1971चे भारत-पाकिस्तान युद्ध
सन 1971च्या भारत-पाक युद्धानंतर पाकिस्तानचे दोन तुकडे होऊन बांगलादेशची निर्मिती झाली होती. या युद्धात पाकिस्तानला लाजीरवाण्या परिस्थितीला सामोरे जावे लागले आणि पाकिस्तानच्या 90 हजार सैनिकांनी भारतीय लष्करासमोर आत्मसमर्पण केले होते. अफगाणिस्तानचे उपपंतप्रधान अहमद यासिर यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये पाकिस्तानकडून लेफ्टनंट जनरल आमीर अब्दुल्ला खान नियाझी याने याबाबतच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना दिसत असून बाजूला भारताचे लेफ्टनंट जनरल जगजित सिंग अरोरा आहेत.

First Published on: January 3, 2023 10:27 AM
Exit mobile version