केवळ खोटेनाटे आरोप करायचे, एवढेच पाकिस्तानला माहीत; जिनिव्हामध्ये भारतीय मुलीने सुनावले

केवळ खोटेनाटे आरोप करायचे, एवढेच पाकिस्तानला माहीत; जिनिव्हामध्ये भारतीय मुलीने सुनावले

जिनेव्हा : भारतातील इंदूर शहरातील एका सफाई कामगाराच्या मुलीने शुक्रवारी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. सरकारी शिष्यवृत्तीवर स्वित्झर्लंडमध्ये पीएचडी करत असलेल्या रोहिणी घावरी हिने मानवाधिकार परिषदेच्या 52व्या सत्रात वंचित घटकांच्या उन्नतीसाठी देशाने उचललेल्या पावलांचे कौतुक केले. जिनिव्हा येथील मानवाधिकार परिषदेच्या बैठकीदरम्यान एका वृत्तसंस्थेने तिच्याशी संवाद साधला. केवळ खोटेनाटे आरोप करायचे, एवढेच पाकिस्तानला माहीत आहे, असे रोहिणी घावरीने सुनावले.

एका सफाई कामगाराची मुलगी असून आपण इथपर्यंत पोहोचलो, हे खूप मोठे यश आहे, असे सांगून ती म्हणाली, अल्पसंख्य तसेच दलित, आदिवासी आणि समाजातील उपेक्षित घटकांतील इतर लोकांच्या प्रश्नांवर पाकिस्तान नेहमीच भारताला लक्ष्य करतो; पण आता भारतात मोठा बदल होत असल्याचे त्याने आता पाहायला हवे. आमच्याकडे आदिवासी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत आणि ओबीसी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, असे तिने पाकिस्तानला ठणकावून सांगितले.

भारतातील दलितांची स्थिती शेजारील देशांपेक्षा खूपच चांगली आहे. दलितांसाठी आमचे आरक्षण धोरण आहे. मला भारत सरकारकडून 1 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. भारतात दलित मागे नाहीत, याचे मी एक उत्तम उदाहरण आहे, हे पाकिस्तानने पाहिले पाहिजे, असा टोलाही तिने लगावला.

मला संयुक्त राष्ट्रात येण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी जिनिव्हा येथे पीएचडी करत असून संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे माझे स्वप्न होते, जे प्रत्यक्षात आले आहे, असे सांगून रोहिणी म्हणाली की, मला भारतातील दलित समाजाच्या स्थितीबद्दल जनजागृती करायची आहे. एक मुलगी असल्याने इथपर्यंत पोहोचणे हे सोपे नव्हती, असे वाटत होते. मला इथे येण्याची संधी मिळाली, याचा एक दलित मुलगी म्हणून मला खरोखर अभिमान आहे.

First Published on: March 25, 2023 12:44 PM
Exit mobile version