नुपूर शर्मांच्या अडचणीत वाढ; रझा अकादमीच्या तक्रारीनंतर मुंबई पोलीस दिल्लीला रवाना

नुपूर शर्मांच्या अडचणीत वाढ; रझा अकादमीच्या तक्रारीनंतर मुंबई पोलीस दिल्लीला रवाना

प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. नुपूर शर्मा यांच्यासह नवीन जिंदाल यांनीही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने दोघांच्या अटकेसाठी देशासह जगभरातील मुस्लीम संघटनांकडून आंदोलन केले जाते. यात आता रझा अकादमीने देखील नुपूर शर्मांविरोधात तक्रार दाखल केली आहे. मुंबईतील पायधुनी पोलीस स्थानकात नुपूर शर्मांविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. रझा अकादमीच्या तक्रारीनंतर मुंबई पोलीस शर्मांना समन्स बजावण्यासाठी दिल्लीत रवाना होणार आहेत. (prophet muhammad row mumbai police team in delhi to summon nupur sharma)

समोर आलेल्या माहितीनुसार, नुपूर शर्मांना पोलिसांनी यापूर्वी ईमेलद्वारे बोलावण्यात आले होते. आता फिजिकल कॉपी देण्यासाठी पोलिसांचे एक पथक दिल्लीत पोहचले आहे. नुपूर शर्मांना पाठवलेल्या समन्समध्ये मुंबईच्या पायधुनी पोलिसांनी 25 जून रोजी सकाळी 11 वाजता जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगितले आहे. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते.

या वक्तव्यानंतर सौदी अरेबिया, आखाती देश, आणि अनेक इस्लामिक देशांनी जाहीर निषेध व्यक्त केला. या प्रकरणी देशासह जगभरात नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या अटकेची मागणी झाली. या वाढत्या वादानंतर भजपने नुपूर शर्मांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली. दरम्यान देशातील अनेक अनेक राज्यांत त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला.

दरम्यान या संपूर्ण घटनेनंतर आता नुपूर शर्मांनी माफीही मागितली आहे. मी माझे शब्द मागे घेते. कोणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, माझ्या बोलण्याने कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेते. अशा शब्दात नुपूर शर्मांनी माफी मागितली आहे.

मुंब्रा आणि ठाण्यातही शर्मांविरोधात केस

नुपूर शर्मांना मुंब्रा पोलिसांनी बोलावले होते. पोलिसांनी त्यांना 22 जून रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. मुंब्रा येथील मोहम्मद गुफरान खान नावाच्या शिक्षकाने नुपूरविरोधात गुन्हा दाखल केला होता. याशिवाय ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोलकाता पोलिसांकडूनही समन्स

याशिवाय कोलकाता पोलिसांनी नुपूर शर्मांना समन्स बजावले आहे. त्यांना 20 जून रोजी नरकेलडांगा पोलिस ठाण्यात हजर राहून जबाब नोंदवण्यास सांगण्यात आले आहे. तृणमूल काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे सरचिटणीस अबुल सोहेल यांनी कोंटाई पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता.

दिल्ली पोलिसांतही तक्रार दाखल

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सायबर युनिटनेही नुपूर शर्माविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यांच्याशिवाय नवीन जिंदाल, शादाब चौहान आणि मौलाना मुफ्ती नदीम यांच्यासह 9 जणांवर वातावरण बिघडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश आंबेडकरांचे आंदोलन रद्द

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याविरोधात मुंबईतील शुक्रवारचे आंदोलन मागे घेतले आहे. गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आंदोलन रद्द केल्याची घोषणा केली. मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून गृहमंत्र्यांनी प्रकाश आंबेडकर यांना आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली होती. यापूर्वी 17 जून रोजी आंबेडकरांनी मदनपुरा, भायखळा ते मुंबईतील सीएसएमटी स्थानकापर्यंत मोठ्या आंदोलनाची घोषणा केली होती.


 

First Published on: June 17, 2022 9:34 AM
Exit mobile version