राज बब्बर यांनी नक्षलवाद्यांची तुलना केली क्रांतीकारकांशी

राज बब्बर यांनी नक्षलवाद्यांची तुलना केली क्रांतीकारकांशी

उत्तरप्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार राज बब्बर यांनी नक्षलवाद्यांची तुलना ही क्रांतीकारकांशी केली आहे. तसेच नक्षलवाद्यांशी बोलून तोडगा निघू शकतो असं देखील राज बब्बर यांनी म्हटलं आहे. नक्षलवाद्यांची तुलना क्रांतिकारकांशी केल्यानं राज बब्बर वादात सापडण्याची शक्यता आहे. मीडियाशी बोलत असताना राज बब्बर यांनी ही तुलना केली आहे. यावेळी राज बब्बर यांनी प्रत्येकाला त्यांच्या हक्कासाठी लढण्याचा अधिकार आहे. केवळ बंदुकीच्या माध्यमातून प्रश्न सुटू शकत नाहीत. समस्यांवर तोडगा हा लोकांशी बोलून, त्यांच्याशी संवाद साधून निघू शकतो असं  म्हटलं आहे. बंदुकीच्या जोरावर निर्णय घेतले जाऊ शकत नाहीत. त्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. तरच त्यातून उपाय निघेल. हे माझं वैयक्तिक मत असून मी माझ्या पक्षाशी देखील ही बाब बोलणार असल्याचं राज बब्बर यांनी म्हटलं आहे. छत्तीसगडमध्ये मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे.

नक्षली चळवळीबद्दल काय म्हणाले राज बब्बर?

मुळात नक्षली चळवळ ही त्यांच्या हक्कासाठी सुरू झाली आहे. त्यांच्या हक्कावर बोलण्यासाठी एकत्र बसून चर्चा केली पाहिजे. काही लोक सध्या चुकीच्या मार्गानं पुढं जात आहेत. पण, त्यांच्याशी बोलून त्यांना योग्य मार्ग दाखवायला हवा असं देखील यावेळी राज बब्बर यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

वाचा – ‘त्या’ पत्रकारांना मारायचे नव्हते,नक्षलवाद्यांनी दिले स्पष्टीकरण

यावेळी, त्यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांच्यावर देखील टिका केली. छत्तीसगड हे एकमेव राज्य आहे ज्याचे मुख्यमंत्री हे डॉक्टर आहेत. अशा वेळी राज्यातील आरोग्य खाते हे उत्तम असायला हवे. पण, छत्तीसगडमध्ये आरोग्य स्थिती चांगली नाही. २१ राज्यांच्या आरोग्याचा सर्व्हे केल्यानंतर छत्तीसगड हे राज्य २०व्या स्थानी जाऊन बसलं आहे. दिवसेंदिवस ही स्थिती आणखीनच खालावत आहे. अशा शब्दात राज बब्बर यांनी रमण सिंह यांना लक्ष्य केलं. दरम्यान, छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या १८ जागांसाठी मतदान होणार असून दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे सध्या आरोप – प्रत्यारोपांना जोर चढला आहे.

वाचा – छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन पोलिसांसह कॅमेरामनचा मृत्यू

First Published on: November 4, 2018 2:23 PM
Exit mobile version