Video : मैदानात साप घुसल्यामुळे क्रिकेट मॅच थांबवावी लागली!

Video : मैदानात साप घुसल्यामुळे क्रिकेट मॅच थांबवावी लागली!

मैदानात सापडला साप आणि खेळाडूही दचकले!

अवघ्या काही मिनिटांमध्ये मॅच सुरू होणार होती. खेळाडू मैदानावर दाखल झाले होते. बॅट्समन्सनी स्टान्स घेतला होता. फिल्डर बॉल पकडण्यासाठी सज्ज झाले. आता बॉल टाकण्यासाठी बॉलर रनअपला सुरुवात करणार, इतक्यात खेळ थांबवण्यात आला. खेळ का थांबवला, हे प्रेक्षकांना कळेना. खेळाडू खेळायला तयार होईनात. सगळेच एकमेकांकडे पाहात होते. तेवढ्यात ८ ते १० लोकांची ग्राऊंड स्टाफची एक टीमच मैदानावर दाखल झाली. सगळेजण मैदानावर एका ठिकाणी धावले. गोल करून उभे राहिले. आणि खाली काहीतरी असल्याचं दाखवायला लागले. तेव्हा सगळ्यांनाच कळलं काय झालंय. खेळाडू खेळाच्या तयारीत असताना एक साप बिनधास्तपणे मैदानावरच्या हिरवळीवरून सरपटत चालला होता. पंचांनी खेळ थांबवायचा निर्णय घेतला आणि ग्राऊंड स्टाफ सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करायला लागले.

…आणि पंचांनी खेळ थांबवला!

विजयवाडामध्ये आंध्र प्रदेश आणि विदर्भ यांच्या टीममध्ये सुरू असलेल्या रणजी सामन्यामध्ये हा प्रकार घडला. सोमवारी रणजी सामन्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही टीम सामन्यासाठी मैदानावर दाखल झाल्या. विदर्भाचा कर्णधार फैज फैझलने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आंध्र प्रदेशचे सलामीवीर फलंदाजीसाठी मैदानात दाखल देखील झाले. मात्र, तितक्यात मैदानात साप शिरल्याचं समजलं. हे पाहाता पंचांनी खेळ सुरूच न करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, या सापाला बाहेर काढण्यासाठी ग्राऊंड स्टाफ मैदानावर दाखल झाला. त्यांनी मोठ्या मुश्किलीने सापाला मैदानाबाहेर काढलं आणि त्यानंतर कुठे हा रणजी सामना सुरू झाला. बीसीसीआयने त्यांच्या ऑफिशिअल ट्वीटरवरून या घटनेचा व्हिडिओ ट्वीट केला आहे. या व्हिडिओवर नेटिझन्सच्या धम्माल प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत!


हा व्हिडिओ पाहिलात का? – बॉलरने विकेट घेतल्यानंतर प्रेक्षकांना भन्नाट जादू दाखवली!
First Published on: December 9, 2019 6:15 PM
Exit mobile version