चीनमध्ये कोरोनाचा वेगाने प्रसार, भारतात निर्बंध लागणार? आज केंद्रीय मंत्र्यांची बैठक

चीनमध्ये कोरोनाचा वेगाने प्रसार, भारतात निर्बंध लागणार? आज केंद्रीय मंत्र्यांची बैठक

नवी दिल्ली – चीनमध्ये कोरोना संसर्गाचा धोका वाढल्याने भारताने खबरदारीची पावले उचलायला सुरुवात केली आहे. त्यानुसार, आज बुधवारी केंद्रीय मंत्र्यांची बैठक होणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी देशातील कोविड-19 परिस्थितीबाबत वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये इतर देशांतील कोविड 19 परिस्थितींचाही आढावा घेण्यात येईल. यानंतर परिस्थिती पाहता नवे निर्बंध लागू होण्याबाबत निर्णय होऊ शकतो.

चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील तीन महिन्यांत चीनच्या ६० टक्क्यांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे भारतातही याबाबत खबरदारी घेतली जात आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढल्यास केंद्र सरकारकडून राज्यांना सूचना पाठवल्या जातील. त्यानुसार राज्यांना निर्बंध लादावे लागणार आहेत. सध्या भारतात कोरोनाचा वेग कमी आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण घटले असल्याचं चित्र आहे. मात्र, चीनमध्ये खालावत जाणारी परिस्थिती पाहता येत्या काळात संभाव्य परिस्थितीशी मुकाबला करण्याकरता केंद्रीय मंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोना प्रतिबंधासाठी चर्चा होणार असून नवे निर्बंध तयार होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री भारती पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्राने राज्यांना सूचना दिल्या असल्याचं सांगितलं. तसंच, जिनोम स्विक्सेंग करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आज केंद्रीय आरोग्यमंत्री मनसूख मांडविया यांच्यासोबत बैठक होणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

First Published on: December 21, 2022 11:22 AM
Exit mobile version