गरज पडल्यास राम मंदिरासाठी आंदोलन – संघ

गरज पडल्यास राम मंदिरासाठी आंदोलन – संघ

RSS

अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्यावरून संघ आता आक्रमक झाला आहे. गरज पडल्यास १९९२ प्रमाणे आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं दिला आहे. अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावे ही देशातील कोट्यावधी जनतेची इच्छा आहे. न्यायालयाने देखील लोकांच्या भावनेचा आदर करावा असं संघाचं म्हणणं आहे. केंद्र सरकारनं राम मंदिरासाठी लवकर अद्यादेश काढावा अन्यथा संघ १९९२ प्रमाणे आंदोलन उभारेल असा इशारा संघाने दिला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार पुढील अडचणी वाढल्या आहेत. यापूर्वी संघाचे प्रचारक डॉ. मनमोहन वैद्य यांनी देखील राम मंदिरासाठी जमिनीचे अधिग्रहण करा अशी मागणी केली होती. एकंदरीत या साऱ्या घडामोडी पाहता राम मंदिराच्या मुद्यावरून आता संघानं आक्रमक भूमिका घेतली आहे.

वाचा – राम मंदिरासाठी भूसंपादन करा – संघ

काय म्हणाले भैयाजी जोशी

ठाण्यात मागील तीन दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शिबीर सुरू आहे. शिबिराच्या सांगता सोहळ्यावेळी बोलताना संघाचे सहकार्यवाहक भैयाजी जोशी यांनी पत्रकार परिषद घेऊन राम मंदिरासाठी १९९२ प्रमाणे आंदोलन उभं करू असा इशारा दिला आहे. राम मंदिराची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. न्यायालय त्याबाबत योग्य तो निर्णय देईल. न्यायव्यवस्थेचा आम्ही आदर करतो. मात्र, मंदिरासाठी लागणारा वेळ हा वेदनादायी असल्याचं भैयाजी जोशी यांनी म्हटलं आहे. मागील ३० वर्षापासून आम्ही राम मंदिरासाठी आंदोलन करत आहोत. असं देखील भैयाजी जोशी यांनी म्हटलं आहे.

राम मंदिर आणि राजकारण

राम मंदिराच्या मुद्यावरून आता शिवसेना देखील आक्रमक झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या मुद्यावरून आता शिवसेना भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात आता संघ देखील राम मंदिराच्या मुद्यावरून आक्रमक झालेला पाहायाला मिळत आहे. दरम्यान, राम मंदिराचं प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असून जानेवारी २०१९ पर्यंत यावरील सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.

वाचा – सत्ता होती तर राम मंदिर का नाही झाले? उद्धव ठाकरेंचा संघाला सवाल

First Published on: November 2, 2018 3:38 PM
Exit mobile version