दिवाळी फटाके प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाचे नवे निर्देश!

दिवाळी फटाके प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाचे नवे निर्देश!

दिवाळी अवघ्या काही दिवासांवर येऊन ठेपलेली असताना फटाके वाजवण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय चर्चेचा विषय ठरला होता. दिवाळीदरम्यान संध्याकाळी फक्त ८ ते १० या वेळेतच फटाके वाजण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत होत्या. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलासा दिला आहे. फटाके वाजवण्याच्या वेळेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सूट दिली आहे. आता दिवसाच्या कुठल्याही वेळी फटाके वाजवता येणार आहेत. मात्र, ही वेळ दोन तासांपेक्षा जास्त नसावी, अशी अट न्यायालयाने घातली आहे. त्यामुळे आता दिवसाच्या कोणत्याही वेळी फटाके वाजवण्याची सूट जरी मिळाली असली, तरी दिवसाला दोनच तास फटाके वाजवता येणार आहेत.

आठवड्याभरापूर्वीच २३ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर सरसकट बंदी नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे दिवाळी धडाक्यात साजरी करण्याचं प्लॅनिंग करणाऱ्यांचा जीव भांड्यात पडला होता. मात्र, त्याचवेळी ऑनलाईन फटाके विक्रीवर बंदी कायम ठेवली होती. तसेच, पर्यावरणाला हानी पोहोचवणारे फटाके फोडण्यावरही बंदी कायम ठेवली होती.

सर्वोच्च न्यायालयाचा मध्यम मार्ग

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. काहींनी, ही बंदी अन्यायकारक असून सण मनाप्रमाणे साजरे करता यायला हवेत अशी प्रतिक्रिया दिली होती, तर काहींनी पर्यावरणाला पूरक असा निर्णय घेतल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचं अभिनंदन केलं होतं. मात्र, संध्याकाळी ८ ते १० हीच वेळ का? असा आक्षेप घेतला जात होता. यावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान स्पष्टीकरण दिलं आहे. या नव्या निर्देशांनुसार फटाके वाजवण्यासाठी संध्याकाळी ८ ते १० ही वेळ शिथिल करण्यात आली आहे. आता दिवसाच्या कोणत्याही वेळी फटाके वाजवता येणार आहेत. मात्र, असं करतानाच फटाके वाजवण्यासाठीची वेळेची मर्यादा मात्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. दिवसाच्या कोणत्याही वेळी फटाके जरी वाजवले, तरी त्याचा एकूण वेळ २ तासांच्या वर जाता कामा नये, अशी अट न्यायालयाने घातली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिवाळी फटाका प्रकरणावर मध्यम मार्ग काढल्याचं बोललं जात आहे.

First Published on: October 30, 2018 12:08 PM
Exit mobile version