तर मला जोड्याने हाणा; तेलंगणात उमेदवाराचा अनोखा प्रचार

तर मला जोड्याने हाणा; तेलंगणात उमेदवाराचा अनोखा प्रचार

अकुल हनुमंथ यांनी मतदारांना चक्क चपलेचे वाटप केले

निवडणुका आल्या की उमेदवार हात जोडून दारात उभे राहतात. निवडणूक झाल्यानंतर मात्र ते पुन्हा पाच वर्षात क्वचितच दिसतात. जनतेची कामे व्हावीत यासाठी मग लोकप्रतिनिधींच्या मागे मागे फिरावे लागते. मात्र तेलंगणा राज्यात तुमच्या समजुतीला तडा देईल, अशी घटना घडली आहे. एका उमेदवाराने जनतेला आश्वासने देण्याऐवजी चक्क चपला दिल्या आहेत. विश्वास बसत नाही ना! पण हे खरं आहे. एका अपक्ष उमेदवाराने मतदारांना चपला दिल्या असून “निवडूण आल्यानंतर जर तुमची कामं केली नाहीत तर याच चपलाने मला चपलांनी मारा” असा संदेश दिला आहे. जगतियाल जिल्ह्यातील कोरुतला मतदारसंघातून अकुला निवडणूक लढवित आहेत.

तेलंगणा राज्यात ७ डिसेंबर रोजी विधानसभा निवडणूका होऊ घातल्या आहेत. यानिमित्ताने तेलंगणात राजकीय धामधुमीला सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी अद्याप तेलंगणात प्रचारासाठी उतरलेले नाहीत. वर्तमान मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे मात्र सुरुवातीपासून प्रचारात चांगलेच दंग झालेले आहेत. मात्र अकुला हनुमंथ या अपक्ष आमदाराने स्वतःचा हटके प्रचार करायला सुरुवात केलीये. ज्यामुळे सध्या तो देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

अकुला यांच्या हा अनोखा प्रचार फंडा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त लोक शेअर करत आहेत. मेट्टुप्पली शहरात घरा-घरात जाऊन प्रचार करताना हा व्हिडिओ शूट केला आहे. “जर मी आश्वासन दिल्याप्रमाणे विकास करु शकलो नाही तर मी राजीनामा देईन, असे वक्तव्य अकुला यांनी केले आहे. त्याशिवाय त्यांनी मतदारांना चपलेचे वाटप सुद्धा केले आहे. मी जर काम नाही केले तर मला जोड्याने मारा, असेही अकुला यांनी मतदारांना सांगितले.

First Published on: November 23, 2018 2:26 PM
Exit mobile version