दिल्लीच्या वेशीवरील आंदोलन शेतकऱ्यांनी मागे घ्यावं; गडकरींचं आवाहन

दिल्लीच्या वेशीवरील आंदोलन शेतकऱ्यांनी मागे घ्यावं; गडकरींचं आवाहन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे. शिवाय, मोदी सरकार शेतकऱ्यांच्या सर्व सूचना ऐकण्यास तयार आहे. तसेच कधीही बळीराजावर अन्याय होणार नाही असा विश्वास नितीन गडकरी यांनी दिला. नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा २० वा दिवस आहे. त्यामुळे गडकरी यांच्या आवाहनानंतर शेतकरी आंदोलन मागे घेणार का हे पाहावे लागेल.

“सध्याच्या घडीला कृषी आणि वाणिज्य मंत्री शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यात व्यस्त आहेत. जर मला चर्चा करण्यासाठी सांगितले तर मी नक्कीच त्यांच्याशी संवाद साधेन,” असे नितीन गडकरी म्हणाले आहेत. “जर चर्चाच नसेल तर गैरसमज आणि वाद निर्माण होऊ शकतात. जर चर्चा असेल तर तोडगा काढता येऊ शकतो आणि संपूर्ण प्रकरणच मिटेल. शेतकऱ्यांना न्याय आणि दिलासा मिळेल. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत,” असे नितीन गडकरी म्हणाले. शेतकऱ्यांच्या सूचना ऐकण्यासाठी सरकार तयार आहे, असे गडकरींनी सांगितले.

 

First Published on: December 15, 2020 10:51 AM
Exit mobile version