मेहुल चोक्सीने बुडवले भारतातील सर्वाधिक कर्ज, लोकसभेत माहिती सादर

मेहुल चोक्सीने बुडवले भारतातील सर्वाधिक कर्ज, लोकसभेत माहिती सादर

नवी दिल्ली – पंजाब नॅशनल बँकेतून कर्ज घेऊन फरार झालेल्या मेहुल चोक्सीवर भारतीय बँकेतील सर्वाधिक कर्ज बुडवल्याचाही आरोप आहे. मेहुल चोक्सीने भारतीय बँकातून घेतलेले ७ हजार ८४८ कोटींचं कर्ज बुडवलं आहे. पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा समोर येण्याआधीच २०१८ मध्ये तो भाचा नीरव मोदीसह भारतातून पळून गेला होता. सध्या तो एंटीगुआ येथे राहत असून त्याच्याकडे त्या देशाचे नागरिकत्वही आहे. ३१ मार्च २०२२ पर्यंतचे देशातील ५० विलफुल डिफॉल्टर्सवर (Willful Defaulters) भारतीय बँकामध्ये एकूण ९२ हजार ५७० कोटींचं कर्ज आहे.

अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी लोकसभेत आज याबाबत आकडेवारी सादर केली. त्यानुसार, गीतांजली जेम्सचे मेहुल चोक्सीसह अनेक मोठे डिफॉल्टर्स या यादीत आहे. यामध्ये एरा इंफ्रा इंजिनिअरिंग (५,८७९ कोटी), री एग्रो (४,८०३ कोटी), कॉनकास्ट स्टील एंड पावर (३,३११ कोटी), विनसम डायमंड्स एंड ज्वेरली (२,९३१ कोटी), रोटोमॅक ग्लोबल (२,८९३ कोटी), कोस्टल प्रोजेक्ट्स (२,३११ कोटी) आणि जूम डेव्हलपर (२,१४७ कोटी) यांची नावे आहेत.

हेही वाचा – नोटाबंदीचा फज्जा? सहा वर्षांत व्यवहारातील चलनी नोटा वाढल्या, अर्थमंत्र्यांनी आकडेवारीच केली सादर

भारतातील सर्वांत मोठी सार्वजनिक बँक भारतीय स्टेट बँकेने २ लाख कोटींचं कर्ज राइट ऑफ केलं आहे. तर, पंजाब नॅशनल बँकने ६७ हजार २१४ कोटींचं कर्ज राइट ऑफ केलं आहे. खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआ बँकने सर्वाधिक म्हणजे ५० हजार ५१४ कोटींचं कर्ज राइट ऑफ केलं असून एचडीएफसी बँकेने ३४ हजार ७८२ कोटींचं कर्ज राइट ऑफ केलं आहे.

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार अनुसूचित व्यवसायिक बँकांनी गेल्या पाच आर्थिक वर्षांत १० लाख ९ हजार ५११ कोटी रुपयांचं कर्ज राइट ऑफ केलं आहे. तर, अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राइट ऑफ केलेल्या कर्जाचे कर्जदारांकडून परतफेड करण्यात येणार आहे. त्यांच्याकडून वसुली करण्यात येत आहे.

हेही वाचा – Budget 2023 मध्ये नोकरदारांना मिळणार तीन खास गिफ्ट

केंद्रीय तपास यंत्रणेने फरार व्यवसायिक मेहुल चोक्सीविरोधात गेल्या शुक्रवारीच मोठी कारवाई केली होती. त्याच्याविरोधात फसवणूक आणि गैरव्यवहारप्रकरणी तीन आणखी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पंजाब नॅशनल बँकेच्या उपमहाप्रबंधक यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोक्सी आणि इतर आरोपींवर विविध बँकेत ६ हजार ७४७ कोटींचा अपहार केल्याचा आरोप आहे.

First Published on: December 21, 2022 4:09 PM
Exit mobile version