‘मल्ल्या’ प्रमाणे स्मार्ट उद्योजक बना !

‘मल्ल्या’ प्रमाणे स्मार्ट उद्योजक बना !

शुक्रावारी हैदराबादमध्ये पहिल्या राष्ट्रीय जनजातीय उद्यमी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात केंद्रीयमंत्री ज्युएल ओराम आदिवासी समाजातील लोकांशी संवाद साधत होते. यावेळी ओराम यांनी उपस्थितांना ‘केवळ हार्डवर्क न करता स्मार्टवर्कसुद्धा करा’, असा सल्ला दिला. ओराम आदिवासी समाजातील लोकांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहित करत होते. स्मार्ट वर्कचा सल्ला देत असताना त्यांनी बनेल उद्योहपती विजय मल्ल्या याचं उदाहरण दिलं. फरार झालेल्या मल्ल्यापासून प्रेरणा घ्या आणि त्याच्यासारखे स्मार्ट बना, असा सल्ला ओराम यांनी आदिवासी समाजातील लोकांना दिला. ‘विजय मल्ल्या वाईट कामांमुळे बदनाम आहे पण या कामांमध्ये फसण्यााधी तो एक यशस्वी उद्योगपती आहे. त्यामुळे त्याच्या यशाने आणि मेहनतीने प्रेरित व्हा आणि त्याच्यासारखे स्मार्टवर्क शिका’, असंही ओराम यांनी सांगितलं. या कार्यक्रमासाठी १ हजाराहून जास्त आदिवासी बांधव उपस्थित होते.

मल्ल्यापासून प्रेरित व्हा

भाजप नेते ओराम पुढे म्हणाले, ‘तुम्ही विजय मल्ल्याला नेहमीच शिव्या घालता. मल्ल्याने कितीही चुकीची कामं केली असली तरी तो एक स्मार्ट आणि सक्षम व्यावसायिक आहे. त्यांनी काही हुशार आणि बुद्धिजीवी लोकांच्या साहाय्याने आज बँका, राज्य सरकार आणि राजकारणी लोक यांना आपल्या प्रभावाखाली आणले आहे. तुम्हालाही असं करण्यापासून कोणी रोखणार नाही. आदिवासी लोक राज्य व्यवस्थेवर प्रभाव टाकू शकत नाहीत, असं कुठे लिहीलंय? तुम्हीही यशस्वी बनून बँकांवर तुमचा प्रभाव टाकू शकता.’

आदिवासी असण्याचे फायदे-तोटे

कार्यक्रमादरम्यान ओराम म्हणाले, की ‘आदिवासी असण्याचे जसे तोटे आहेत तसेच फायदेही आहेत. आदिवासी लोकांना शैक्षणिक संस्था, सरकारी नोकऱ्या यांमध्ये आरक्षण आहे. या आरक्षणाचा लाभ घेऊन आदिवासी बांधव त्यांचे जीवनमान सुधारु शकतात. तर दुसरीकडे आदिवासी असण्याचे तोटेही आहेत. एखादी आदिवासी समाजातील माणूस यशस्वी झाल्यास त्याला हवी तशी ओळख मिळत नाही. लोक त्यांच्या यशालाही आरक्षणाशी जोडतात आणि त्यांच्याशी भेदभाव करतात’. याच मुद्द्याला जोडून तेलंगाणाचे अर्थमंत्री इटाला राजेंद्र यांनीही आपले मत व्यक्त केले. ‘अनेक बँका आदिवासी बांधवांसोबत भेदभाव करतात. त्यांना लवकर कर्ज देत नाहीत. मात्र, बँकांनी असा भेदभाव बंद करुन आपल्या धोरणांध्ये बदल केला पाहिजे’, असं इटाला राजेंग्र यावेळी म्हणाले.

 

First Published on: July 14, 2018 1:57 PM
Exit mobile version