भाजप उपाध्यक्षांवर बलात्काराचा आरोप, दिला राजीनामा

भाजप उपाध्यक्षांवर बलात्काराचा आरोप, दिला राजीनामा

बलात्कार

गुजरातमधील भाजपचे उपाध्यक्ष जयंती भानुशाली यांच्यावर एका २१ वर्षीय विद्यार्थिनीने वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर भानुशाली यांनी आपला भाजप उपाध्यक्षपदाचा राजीनामा जितू वाघानी यांच्याकडे सोपवला आहे. गुजरात भाजपाकडून या संदर्भात एक परिपत्रक जारी केलं असून त्यामध्ये भानुशाली यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. ५३ वर्षीय जयंती भानुशाली हे गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील असून याच मतदारसंघातून ते भाजपाचे माजी आमदारही राहिले आहेत. कच्छमधल्या अब्दासा मतदारसंघामधून २००७ ते २०१२ दरम्यान ते निवडून आले होते. दरम्यान, भानुशाली यांनी राजीनामा दिला असला, तरी त्यांनी बलात्काराचे आरोप फेटाळून लावले आहेत. यामध्ये कट असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

नक्की झालं काय?

१० जुलै रोजी एका २१ वर्षीय तरुणीने जयंती भानुशाली यांच्याविरोधात पोलिसात एक अर्ज दाखल केला आणि हा सगळा प्रकार समोर आला. या अर्जामध्ये सदर तरुणीने भानुशाली यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून भानुशाली यांनी आपल्यावर वारंवार बलात्कार केल्याची तक्रार या अर्जात तरुणीने केली आहे. गुजरातमधल्या एका प्रसिद्ध फॅशन डिझायनिंग कोर्सला प्रवेश मिळवून देण्याचं आमिष भानुशालींनी आपल्याला दिल्याचंही तरुणीनं म्हटलं आहे. भानुशाली यांच्या एका सहाय्यकानं बलात्काराचं व्हिडिओ शुटिंग काढून आपल्याला ब्लॅकमेल करण्याची तयारीही केल्याचा दावा तरुणीने या अर्जात केला आहे.

‘माझ्यावरचे आरोप बिनबुडाचे’

दरम्यान, जयंती भानुशाली यांनी मात्र आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. प्रतिमा मलिन करण्यासाठीच हा सर्व प्रकार केला जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

पोलिसांकडे दाखल केलेला अर्ज म्हणजे माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे. मी आणि माझ्या कुटुंबियांवर बिनबुडाचे आरोप करण्यात आले आहेत. मात्र, जोपर्यंत या सर्व प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागत नाही, तोपर्यंत मी पक्षाला उपाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे.

जयंती भानुशाली, नेते, गुजरात भाजपा

 

अद्याप FIR नाही

दरम्यान, या प्रकरणी अद्याप एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती सूरतचे पोलिस आयुक्त सतीश शर्मा यांनी दिली आहे. हा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी कापोर्डा पोलिस स्टेशनकडे पाठवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

First Published on: July 15, 2018 2:19 PM
Exit mobile version