World Cancer Day : 4 फेब्रुवारीला का साजरा करतात जागतिक कर्करोग दिन ; जाणून घ्या

World Cancer Day : 4 फेब्रुवारीला का साजरा करतात जागतिक कर्करोग दिन ; जाणून घ्या

World Cancer Day : 4 फेब्रुवारीला का साजरा करतात जागतिक कर्करोग दिन ; जाणून घ्या

कर्करोगाविषयी जनजागृती करण्याकरिता ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो. कर्करोगाबाबत माहितीचा प्रसार करणे आणि कर्करोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्रोत्साहन देणे हे जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्यामागील उद्दिष्ट आहे.

पॅरिस येथे सन २००० मध्ये झालेल्या जागतिक परिषदेत कर्करोगविषयक मसुदा मांडण्यात आला. अशा प्रकारचा विषय हाताळणारी ही पहिलीच परिषद ठरली. या परिषदेत जगभरातील शासकीय उच्चपदस्थ अधिकारी आणि कर्करोगविषयक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी पॅरिसच्या कर्करोगविषयक सनदेला मान्यता दिली. प्रस्तुत सनद कर्करोगसंबंधित संशोधन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना याकरिता आर्थिक गुंतवणूक करणे, कर्करोगग्रस्त रुग्णांचे जीवनमूल्य उंचावणे तसेच त्यांना योग्य उपचार देणे अशा तत्त्वांचा पुरस्कार करते. सनदेच्या दहाव्या कलमात अधिकृतरीत्या ४ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक कर्करोग दिवस’ म्हणून जाहीर केला गेला.

कर्करोगविषयक उपलब्ध माहिती तसेच कर्करोगाचे निदान आणि उपचार यांत झालेली लक्षणीय प्रगती यांमुळे रोगप्रसारामध्ये कपात होणे अपेक्षित आहे. परंतु जागतिक आकडेवारीनुसार दरवर्षी कर्करोगाचे नव्याने निदान होणार्‍या रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, कर्करोगाच्या माहितीचा प्रसार करून कर्करोगाने होणार्‍या मृत्यूचे प्रमाण कमी करता येऊ शकते. यासाठी कर्करोग प्रतिबंधात्मक उपायांविषयी जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने जगभरातील कर्करोग संस्था आणि आरोग्य संघटना जागतिक कर्करोग दिवस साजरा करतात.

कर्करोगामुळे होणार्‍या मृत्यूंपैकी ७० टक्के मृत्यू हे अल्पविकसित देशांमध्ये होत असल्याकारणाने अशा ठिकाणी कर्करोग आणि त्याचा प्रतिबंध याबद्दल जनजागृती करण्यासाठी जागतिक कर्करोग दिवस हे एक महत्त्वाचे साधन आहे.

आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना ही संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्करोगावर नियंत्रण राखण्यासाठी आणि पर्यायाने जागतिक आरोग्य सुधारण्यासाठी कार्यशील असते. आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना, जागतिक आरोग्य संघटना आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कर्करोग दिवसाचे आयोजन केले जाते.


हे ही वाचा – Attack On Owaisi : हिंदूंविरोधी वक्तव्यामुळे ओवैसींवर गोळीबार केला, पोलीस चौकशीत आरोपीचा जबाब


 

First Published on: February 4, 2022 4:00 AM
Exit mobile version