भ्रमाची दहीहंडी!

भ्रमाची दहीहंडी!

राज्यात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. कोरोनाच्या महामारीमुळे गेली दोन वर्षे सगळ्याच उत्सवांवर बंदी असल्यामुळे लोकांच्या उत्साहावर पाणी पडले होते. सध्या कोरोना पूर्णपणे संपला नसला तरी त्याचा प्रभाव कमी झालेला आहे. त्यामुळेच राज्य सरकारने सण उत्सव साजरे करण्यासाठी लोकांना मोकळीक दिलेली आहे. या वर्षी झालेल्या दहीहंडी उत्सवाला एक वेगळीच झळाळी होती. त्याला दोन कारणे आहेत. गेली अडीच वर्षे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पडण्यासाठी भाजपने सर्व प्रकारचे जे काही प्रयत्न केले त्याला यश आले.

शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील असंतुष्टांचा मोठा गट त्यांच्या हाती लागला. सुरुवातीला तो शिवसेनेतील अंतर्गत विषय आहे, असे भासवणार्‍या भाजप नेत्यांनी या बंडखोरांची सूरत ते गुवाहाटी ते गोवा अशी जी सहल घडवून आणली. त्यामुळे यामागे भाजप आहे, हे उघड झाले. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत पहिले भाषण करताना हे सगळे सत्तांतर घडून आले आहे, त्यामागे देवेंद्र फडणवीस आहेत, असे जाहीर केले. त्याला फडणवीस यांनीही हसून या मागचे सूत्रधार आपणच आहोत, असे दाखवून दिले. ज्या शिवसेनेने आपली हातातोंडाशी आलेली सत्ता घालवली, त्यांनाच आपण खिंडार पाडून त्यांच्याच मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली, त्याचा प्रचंड आनंद भाजपच्या नेत्यांना झालेला आहे. त्यात पुन्हा ज्यांनी आपला ऐनवेळी अपेक्षाभंग केला.

त्या शिवसेनेची आपल्याला जिरवता आली, ज्यांनी मुख्यमंत्रीपदाचा अट्टाहास कायम ठेवून काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली, त्यांना धडा शिकवता आला. याचा एक आसुरी आनंद सत्ताधारी भाजप नेत्यांच्या चेहर्‍यावर दिसल्यावाचून राहत नाही. त्यातही तो विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेहर्‍यावर अधिक उजळून निघालेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांची गर्दी खेचू शकणार्‍या दहीहंडी उत्सवाला केवळ परवानगीच नव्हे तर मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यात आले. गोविंदांना १० लाख रुपयांचे संरक्षण देण्यात आले. इतकेच नव्हे तर दहीहंडीला एक क्रीडा प्रकार असल्याचा दर्जा देऊन गोविंदांना क्रीडा कोट्यात येणार्‍या नोकरीत आरक्षण देण्यापर्यंत शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर करून टाकले.

जेव्हा क्रीडा संघटना आणि अन्य जाणकारांनी त्याविषयी आक्षेप नोंदवला, तेव्हा सरकारने सारवासारव केली, पण राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हे सरकार किती बेभानपणे निर्णय घेत आहे हेच दिसून येते. कारण दहा लाख रुपयांची रक्कम आणि गोविंदांना नोकरीतील आरक्षण हे कुणाला मिळाले आहे. पण आज सत्तेत आलेले भाजपचे नेते इतके जोशात आहेत की, त्यांना आता आकाश ठेंगणे वाटू लागले आहे. त्यात पुन्हा या सरकारचे अनेक विषय हे न्यायालयात आहेत. त्यात खरी शिवसेना कुठली, बंडखोर आमदारांची मान्यता रद्द होणे, यांचा समावेश आहे. त्यामुळे विधानसभेत शिवसेनेतील बंडखोरांना सोबत घेऊन राज्यात सरकार स्थापन करण्यात यश मिळवले असले तरी न्यायालयाच्या निर्णयाची टांगती तलवार सरकारवर लटकत आहे. त्यामुळे पुढे काय होईल याची भाजपचे नेते आणि शिंदे गट यांनाही कल्पना नाही. आपल्याला जो वेळ मिळालेला आहे, त्यात जास्तीत जास्त लोकांना खूश करणार्‍या घोषणा करणे आणि योजना जाहीर करण्याचा जणू या सरकारने सपाटा लावलेला आहे.

शिंदे सरकारने आगामी काळात येणार्‍या सगळ्या सण आणि उत्सवावरील सगळ्या मर्यादा काढून टाकलेल्या आहेत. मग ती दहीहंडी असो किंवा येणारा गणेशोत्सव असो. थर कितीही लावा आणि गणपतीची मूर्ती कितीही उंच बनवा. शिंदे-फडणवीस सरकारने सध्या लोकांना सगळ्याच बाबतीत खुली सूट दिलेली आहे. त्यात पुन्हा आगामी काळात मुंबई महापालिकेसोबत अन्य काही महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्यामध्ये भाजपला शिंदे गटाला सोबत घेऊन एकहाती सत्ता मिळवायची आहे. त्यामुळे यावर्षी आपले सरकार आल्याचा जसा प्रचंड आनंद भाजप नेत्यांना झालेला आहे, त्याचसोबत मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनेच्या नाकावर टिच्चून काहीही करून जिंकायचीच, असा भाजपने चंग बांधलेला आहे. जसे काहीही करून त्यांनी राज्यातील सत्ता मिळवली, तशीच त्यांना आता एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन मुंबई महापालिकेची सत्ता मिळवायची आहे. यावर्षी बहुसंख्य दहीहंड्यांचे प्रायोजकत्व हे भाजपच्या नेत्यांकडे होते, असेच दिसून आले.

भाजपने जसे शिवसेनेतील शिंदे गटाला हायजॅक करून राज्याची सत्ता मिळवली तसेच या वर्षी बहुतेक दहीहंड्या हायजॅक करून भाजपने सगळीकडे आता आमचाच प्रभाव आहे, असे लोकांना दाखवून दिले आहे. त्यामुळे पुढे येणार्‍या गणेशोत्सवांमध्येही विविध मंडळांच्या माध्यमांतून भाजप आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावेल हे स्पष्ट होत आहे. कारण राज्यातील सत्ता मिळवल्यानंतर आता मुंबई महापालिकेची एकहाती सत्ता हेच आता भाजपचे लक्ष्य आहे. २०१९ साली आपल्याला अडीच वर्षेही मुख्यमंत्रीपद द्यायला भाजप तयार नाही हे लक्षात आल्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुठलाही विधिनिषेध न बाळगता विरोधी विचारसरणीच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडीची स्थापना केली आणि मुख्यमंत्रीपद मिळवले.

अर्थात, त्यावेळी जनतेने बहुमत हे युतीत निवडणूक लढवलेल्या भाजप आणि शिवसेनेला दिले होते, पण भाजपला धडा शिकवून मुख्यमंत्रीपद मिळवायचेच, असा पवित्रा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला होता आणि ते मिळवले, पण त्यामुळे शिवसेनेतील अनेकांची कोंडी झाली होती, पण काही बोलता येत नव्हते. कारण साहेब मुख्यमंत्री होते. पुढे त्याचा फायदा भाजपने घेतला. त्यामुळे सध्या त्यांचे सरकार राज्यात आले. सरकार राज्यात आले खरे, पण ते टिकवणे किती अवघड आहे, हे त्यांना मंत्रिमंडळ विस्तारासाठी लागलेल्या विलंबामुळे दिसून आले असेल. दगाबाजीचे आरोप शिवसेना आणि भाजप एकमेकांवर करत आहेत. त्यात आता खरी शिवसेना कुणाची ठाकरेंची की शिंदेंची हा पेच आहेच. त्यामुळे येणार्‍या काळात नागरिक मतदारांसमोरही मोठा पेच निर्माण होणार आहे. शिंदे-फडणवीस एकीकडे आणि उद्धव ठाकरे दुसर्‍या बाजूला असा सामना सुरू आहे. भाजपने दहीहंडी तर जोरात साजरी केली आहे. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत लोकांच्या मनात काय आहे, ते पहावे लागेल. कारण मोदी हैं तो मुमकीन हैं, या भ्रमात भाजप नेते वावरत असतात, पण ते प्रत्येक वेळी खरे ठरतेच असे नाही.

First Published on: August 22, 2022 2:00 AM
Exit mobile version