‘मी आता मिठाई विकतो’ अभिनेते शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय

‘मी आता मिठाई विकतो’ अभिनेते शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय

अभिनेते शरद पोंक्षे हे नेहमीच आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात त्याच बरोबर प्रत्येक विषयावर आपलं स्पष्ट मत सुद्धा मांडत असतात. मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करत त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं हक्काचं स्थान निर्माण केलं. पण अभिनेते शरद पोंक्षे यांचं वैयक्तीक आयुष्य मात्र नेहमीच चर्चेत राहीलं. 2018 च्या अखेरीस अभिनेते शरद पोंक्षे यांना कर्करोगाचं निदान झालं पण या आजारावर यशस्वी मात करून शरद पोंक्षे यांनी पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. दरम्यान शरद पोंक्षे यांना काही काळ आर्थिक अडचणींचा सामनासुद्धा करावा लागला. या संदर्भांत बोलताना एका मुलाखती दरम्यान शरद पोंक्षे यांनी त्यांच्या नव्या व्यवसायाबद्दल सांगितले.

हे ही वाचा – आता फक्त अभिनयच नाही तर ‘या’ चित्रपटाची निर्मिती देखील करणार करिना

एका कार्यक्रमात अभिनेते शरद पोंक्षे यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी त्या कार्यक्रमात संवाद साधताना शरद पोंक्षे म्हणाले,’करोना काळात मनोरंजन क्षेत्राची खूप वाताहात झाली होती. त्यात 2019 हे वर्ष माझ्यासाठी खूपच खराब गेलं. कर्करोगामुळे आधीच बँक बॅलन्स संपला होता आणि त्यातून जरा कुठे पुन्हा काम सुरु झालं आणि लगेच सात महिन्यांत करोनाला सुरुवात झाली आणि लोकडाऊन झालं. घर चालवण्यासाठी हाती पैसे असावे म्हणून काहीतरी केलं पाहिजे असा विचार सुरु झाला’.

“ या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी काहीतरी करण्याचा विचार सुरु झाला. त्यानंतर आम्ही चार-पाच मित्र एकत्र आलो आणि त्यानंतर चितळे बंधू यांना मी भेटलो. चितळे बंधुंशी बोलणं झाल्या नंतर मी चितळे एक्सप्रेस सुरु केलं. यामधूनच बोरिवली आणि डोंबिवली मध्ये आम्ही दोन दुकानं सुरु केली. चितळेंची शाखा आम्ही या दोन ठिकाणी सुरु केल्यानंतर माझे दोन सहकारी मित्र डोंबिवलीचं दुकान सांभाळू लागले आणि मी बोरिवलीच्या दुकानाचं काम पाहतोय. मी आता मिठाई विकतो.” असं शरद पोंक्षे म्हणाले.

हे ही वाचा – ‘विक्रम वेधा’चे दुसरे गाणे ‘बंदे’ रिलीज, पाहा गाण्यातील ह्रतिक रोशनचा धमाकेदार अंदाज

याच संदर्भांत बोलताना शरद पोंक्षे पुढे म्हणाले, “जेव्हा चित्रीकरण नसतं तेव्हा मी दुकानात बसतो. पण हा अनुभव खूप भन्नाट आहे. दुकानामध्ये असताना बऱ्याच स्त्रिया दुकानात येतात. कारण मिठाईच्या दुकानात पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रिया फार उत्साहाने खरेदी करायला येतात. मला जेव्हा दुकानात पाहतात तेव्हा त्यांची कुजबूज सुरु होते. हे शरद पोंक्षे आहेत का? मी ही सगळी चर्चा ऐकत असतो. नंतर घाबरत घाबरत मला बोलतात तुम्ही शरद पोंक्षे यांच्यासारखे दिसता. मग मीदेखील कधी मूडमध्ये असलो की त्यांना विचारतो कोण शरद पोंक्षे?” अभिनेते शरद पोंक्षे सध्या अभिनय आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी सांभाळत आहेत.

हे ही वाचा – बजेटपेक्षाही जास्त किमतीला विकले गेले शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचे हक्क

First Published on: September 27, 2022 2:17 PM
Exit mobile version