‘त्या’ कपड्यांवरुन जान्हवी कपूर झाली ‘ट्रोल’

‘त्या’ कपड्यांवरुन जान्हवी कपूर झाली ‘ट्रोल’

जान्हवी कपूर (फाईल फोटो)

‘धडक’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेली जान्हवी कपूर, अगदी कमी कालावधीतच प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. माध्यमांमध्ये तसंच सोशल मीडियावरही जान्हवीचाच बोलबाला असतो. जान्हवी कुठे जाते? काय करते? तिचा पुढचा चित्रपट कोणता? हे सगळं जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. मात्र, जेव्हा एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री ‘फेमस सेलिब्रिटी’ होतात, तेव्हा त्यांच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीची सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये चर्चा होते. बरेचदा हे स्टार्स ‘ट्रोलिंग’चे शिकार होतात. जान्हवी कपूरसोबतही सध्या काहीसं असंच झालं आहे. जान्हवी सध्या तिने परिधान केलेल्या एका ड्रेसवरुन ट्रोल होत आहे. ‘जान्हवीने घातलेला ड्रेस हा एका हॉलीवूड स्टारच्या ड्रेसची कॉपी आहे’ असं म्हणत, नेटिझन्सनी तिला चांगलंच ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

जान्हवीने नुकतंच एका मासिकासाठी फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटसाठी तिने घातलेला ड्रेस हा ‘कॉपीड’ ड्रेस असल्याचं ट्रोलर्सचं म्हणणं आहे. त्यामुळे बॉलीवूडची ‘धडक गर्ल’ जान्हवी कपूर पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. फोटोशूटसाठी जान्हवीने निळ्या आणि आकाशी रंगाचा चमकदार ड्रेस परिधान केला होता. ट्रोलर्सच्या म्हणण्यानुसार, हुबेहूब असाच एक ड्रेस इंटरनॅशनल ब्रँडच्या एका फॅशन शोमध्‍ये एका मॉडेलने परिधान केला होता. ‘जान्हवीने घातलेला हा चमकदार ड्रेस मुळात एका आंतरराष्‍ट्रीय डिझाईनरने डिझाईन केलेला असून, त्यावरुनच या नव्या ड्रेसची कॉपी करण्यात आली आहे,’ असा दावा नेटिझन्सनी केला आहे. इतकंच नाही तर जान्हवीने घातलेल्या ड्रेसचा आणि त्यासोबतच इंटरनॅशनल ब्रँडसाठी तयार करण्यात आलेल्या त्या मूळ ड्रेसचा फोटोदेखील शेअर केला आहे.

आता हे दोन्ही फोटो पाहून तुम्हीच ठरवा, की जान्हवी कपूरला ट्रोल करणं योग्य आहे की नाही ते…

First Published on: January 22, 2019 8:12 PM
Exit mobile version