आषाढी वारी निमित्त शेमारू मराठीबाणा वाहिनीची अनोखी भक्तीमय भेट

आषाढी वारी निमित्त शेमारू मराठीबाणा वाहिनीची अनोखी भक्तीमय भेट

आषाढी वारी निमित्त शेमारू मराठीबाणा वाहिनीची अनोखी भक्तीमय भेट

पंढरीची वारी ही महाराष्ट्राची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. आषाढ महिन्याची सुरुवात झाली की, सगळ्यांनाच पंढरपूरच्या वारीचे वेध लागतात.  कोरोनामुळे गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही पायी वारीला खंड पडला आहे. कोरोनामुळे प्रत्यक्ष वारी करणे शक्य होणार नसले तरी विठूरायांच्या भक्तांची भक्तीची ओढ जराही कमी झालेली नाही. वारकऱ्यांची वारी थांबली तरी भक्तीची परंपरांगत वहिवाट मात्र थांबलेली नाही त्यासाठीच भक्ती आणि मनोरंजनाचा आगळा मेळ साधत शेमारू मराठीबाणा वाहिनी भक्तांसाठी विठ्ठल भेटीचा मार्ग अधिक प्रशस्त करणार आहे. वारकऱ्यांसाठी विट्ठल धावुनिया आला, दारोदारी रंगेल अनोखा सोहळा! या उक्तीप्रमाणे भक्ती आणि मनोरंजनाच्या माध्यमातून माऊली विशेष कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन शेमारू मराठीबाणा वाहिनीतर्फे करण्यात येणार आहे. ‘गजर माऊलीचा उत्सव कीर्तनाचा’, ‘वारी तुमच्या दारी’, भक्तीगीत रचना अशा तीन अनोख्या संकल्पनांच्या सादरीकरणातून विठूमाऊलीचे हे विशेष उपक्रम वेगवेगळ्या माध्यमांतून रंगणार आहेत.

शेमारू मराठीबाणा वाहिनीवरील ‘गजर माऊलीचा उत्सव कीर्तनाचा या आषाढवारी विशेष कीर्तन मालिकेतंर्गत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन रंगणार आहे. ह.भ.प. उत्तम महाराज बडे, ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे, ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे आदि नामवंत कीर्तनकार रविवार ४ जुलैपासून दररोज सायंकाळी ६ वाजता आपले कीर्तन सादर करतील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता पुष्कराज चिरपुटकर करणार आहे.

पंढरपूरच्या आनंदवारी सोहळ्याची अनुभूती भक्तांना मिळावी यासाठी ‘वारी तुमच्या दारी’ हा अनोखा उपक्रम शेमारू मराठीबाणा वाहिनीने योजिला आहे. शेमारू मराठीबाणा या आपल्या नावाला जागत आजवर वेगेवगळे उपक्रम राबवणाऱ्या या वाहिनीचा ‘वारी तुमच्या दारी’ हा उपक्रम ही असाच अनोखा आहे. एका चित्ररथाला पंढरपूरच्या मंदिराचे स्वरूप देत हा चित्ररथ वेगवेगळ्या शहरांत जाऊन तिथल्या भक्तांसाठी भक्तीद्वार खुले करणार आहे.

५ जुलैपासून पुणे, औरंगाबाद, अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यांमधल्या ११ शहरांतून हा चित्ररथ फिरणार आहे. वारकऱ्यांच्या साथीने भजन, कीर्तन, नामगजर, हरिपाठ, भारूड या सगळ्या अध्यात्माच्या भक्तिखेळाचे दर्शन घडविले जाणार आहे. ९ दिवस प्रत्येक शहरांत वारीचा भक्ती सोहळाच रंगणार आहे. फलटणपासून सुरु झालेल्या या सोहळ्याची सांगता पंढरपूरात होणार आहे. यात सहभागी विठ्ठलभक्तांसाठी खास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी वारकऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे.


हेही वाचा – दीपिका झळकणार सीतेच्या भूमिकेत

First Published on: July 1, 2021 8:41 PM
Exit mobile version