माही…खेळ बाकी काही

माही…खेळ बाकी काही

महेंद्रसिंग धोनी कधी निवृत्त होणार याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २०१९-२० च्या मोसमासाठी जाहीर केलेल्या श्रेणी निहाय वार्षिक करारबद्ध २७ खेळाडूंच्या यादीतून धोनीला वगळल्यामुळे त्याच्या निवृत्तीबाबत उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. वर्ल्डकप स्पर्धेनंतर गेले ६ महिने धोनी क्रिकेट खेळलेला नाही. परंतु, झारखंड रणजी संघातील खेळाडूंबरोबर त्याने गुरुवारी रांचीत सराव केला त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या, सहा वर्षांपूर्वीच धोनीने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर वनडे तसेच टी-२० क्रिकेट आयपीएलमध्ये तो सातत्याने खेळत आहे. आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धा ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरात खेळली जाईल त्यात धोनीचा समावेश होणार का, याबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत. आगामी आयपीएल स्पर्धेत धोनी चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) कडून खेळणार आहे.

धोनी जुलै ७ रोजी चाळीशीत प्रवेश करेल. पंधरा वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत धोनीच्या खात्यात ९० कसोटी, ३५० वनडे, ९८ टी-२० सामन्यातून १७ हजारांहून अधिक धावा तसेच यष्टिमागे ८२९ बळी जमा आहेत. मार्चमध्ये आयपीएल स्पर्धेला सुरुवात होत असून चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या नेतृत्वाची धुरा धोनीकडे सोपविण्यात आली आहे. या स्पर्धेत धोनीने आपला ठसा उमटविल्यास ऑस्ट्रेलियात होणार्‍या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्याचा विचार करण्यात येईल, असे उद्गार भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी अलिकडेच काढले होते. निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी मात्र धोनीऐवजी रिषभ पंत वर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवलेले दिसते. २२ वर्षीय पंत अजूनही भारतीय संघात स्थिरावलेला नाही. त्याच्या यष्टिरक्षणात सफाई जाणवत नाही. फलंदाजीतही विचित्र फटके मारण्याची सुरसुरी येते. ही सवय त्याला तसेच संघालाही अडचणीत आणते.

धोनीच्या स्वभावानुसार तो स्वतःहून निवृत्तीची घोषणा लगेचच करेल असे वाटत नाही. आयपीएलमध्ये धोनी चेन्नई सुपरकिंग्ज (सीएसके) खेळणार असून या स्पर्धेदरम्यान तो ‘इंटर नॅशनल क्रिकेटर’ असावा अशी सीएसकेची धारणा आहे. गुरुवारी धोनी रांचीत झारखंड रणजी संघाबरोबर सरावाला उतरला तो आयपीएलच्या सरावासाठी. बीसीसीआयचे अध्यक्ष तसेच भारताचे माजी कर्णधार सौरभ गांगुली यांनी याबाबत भाष्य करणे टाळले. मात्र बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याआधी गांगुली यांनी धोनीच्या भवितव्याबाबत भाष्य करताना सांगितले होते ‘मला खात्री आहे की धोनी निवडसमितीच्या संपर्कात असेल, भारतीय संघ व्यवस्थापनाशी संवाद साधेल तो आपल्या कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर आहे की त्याला निर्णय घ्यावाच लागेल.’

भारताचे माजी कर्णधार तसेच राष्ट्रीय निवड समितीचे दिलीप वेंगसकर यांना धोनीला करारबद्ध खेळाडूंच्या यादीतून वगळल्याबद्दल बिलकूल आश्चर्य वाटले नाही. वर्ल्डकपनंतर गेले ६ महिने धोनी कुठल्याही क्रिकेट स्पर्धेत खेळलेला नाही. त्यामुळे २०१९-२० च्या मोसमातील करारासाठी त्याचा विचार होणे शक्यच नव्हते, असे वेंगसरकर यांनी नमूद केले. परंतु, त्याचा (धोनीचा) अजूनही टी-२० क्रिकेट वर्ल्डकपसाठी विचार होऊ शकतो. धोनीचा फिटनेस तसेच फॉर्म यावर बरेच काही अवलंबून असेल, अशी पुस्ती वेंगसरकर यांनी जोडली.

धोनीनंतर दिल्लीकर नौजवान खेळाडू रिषभ पंतकडे वनडे तसेच टी-२० क्रिकेटसाठी यष्टिरक्षणाची सूत्रे सोपविण्यात आली. कसोटी क्रिकेटमध्ये वृद्धिमान सहाकडे यष्टिरक्षकाची भूमिका सोपविण्यात आली. २२ वर्षीय पंतला अजूनही ‘‘धोनी, धोनी ’’ अशा ओराळ्यांना सामोरे जावे लागते. भारतातील विविध स्टेडियम्सवर धोनीचे अगणित चाहते मोठ्या संख्येने अजूनही हजर असतात. पंतने झेल टाकला, स्टम्पिंग सोडले तसेच रिव्ह्यूमध्ये गफलत केल्यास प्रेक्षकांकडून पंतची हुर्यो उडविली जाते. एवढेच कशाला वानखेडेवर मंगळवारी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामान्यात बदली यष्टिरक्षक लोकेश राहुलला देखील ‘धोनी, धोनी’ अशा आरोळ्यांना सामोरे जावे लागले. भारतीय संघ २४ जाने-११ फेब्रुवारी दरम्यान न्यूझीलंड दौर्‍यात टी-२० तसेच वनडे सामने खेळणार असून त्यात रिषभ पंतची कसोटी लागेल. न्यूझीलंड दौर्‍यात पंतची ‘कसोटी’ लागेल. या दौर्‍यात पंत अपयशी ठरल्यास धोनीच्या पुरागमनच्या आशा पल्लवीत होतील.

भारतीय क्रीडा क्षेत्रावर दृष्टिक्षेप टाकल्यास अनेक बुजुर्ग, नामवंत खेळाडूंना आपल्या निवृत्तीचा निर्णय घेणे कठीण जाते. अलिकडेच ताजे उदाहरण लिअँडर पेसचे! वयाच्या ४६ व्या वर्षी लिअँडरने आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर करताना यंदाच्या मोसमात म्हणजे २०२० मध्ये निवृत्तीचा निर्णय व्यक्त केला. कारकिर्दीच्या शिखरावर असताना निवृत्ती व्यक्त करणे सर्वांनाच जमते असे नाही अपवाद सुनिल मनोहर गावस्करचा. बुजुर्गु उद्योगपती, कसोटी पटू, क्रिकेट समालोचक विजय मर्चंट यांचे उद्गार सदैव स्मरणात राहतील. मर्चंट म्हणाले, ‘लोक जेव्हा विचारतात का निवृत्त होत आहात? तेव्हाच निवृत्ती स्विकारणे इष्ट, निवृत्त का होत नाही? असे लोकांनी विचारणा करण्यापर्यंत थांबणे अनिष्टच.’

First Published on: January 19, 2020 2:47 AM
Exit mobile version