कर्तबगार मराठी महिला

कर्तबगार मराठी महिला

नवरात्र उत्सवानिमित्त महाराष्ट्रातील कर्तबगार मराठी स्त्रियांच्या कार्याची आपल्याला आठवण झाल्याशिवाय राहत नाही. त्यातीलच एक नाव म्हणजे जयमाला शिलेदार. नाट्यसंगीत, शास्त्रीय गायन यांची विशेष जाणीव असलेले नाव. अनेक नाटक व गायन कलाकृतीतून त्यांनी आपला मराठी बाणा जपला. कला ही कुण्या एकाची जहागिरी नसून ती आत्मसात करून तिला योग्य न्याय देता येतो, हाच संदेश आपल्याला जयमालाबाईंच्या एकंदरीत कारकिर्दीकडे बघितल्यावर मिळतो.

हिराबाई बडोदेकर यांनीसुद्धा ख्याल, ठुमरी, भजन, नाट्यसंगीत यात एकेकाळी हुकूमत गाजवली. भारतीय शास्त्रीय संगीत लोकप्रिय करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनी आकाशवाणीवर राष्ट्रगीत म्हणण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता. मराठी संगीत नाट्य अभिनय क्षेत्रात आणखीन एक नाव आदराने घेतले जाते ते म्हणजे सुंदरबाई जाधव यांचं. १९८० ते १९९०च्या काळात गायिका, अभिनेत्री, संगीतकार अशा विविध पदव्यांनी सुंदरबाई ओळखल्या जायच्या. मराठीत गझल कव्वाली सादर करून त्या उपस्थित रसिकांची मने जिंकत. हैदराबाद येथे त्यांच्या कार्यक्रमाचे मोठे जलसे होत.

त्यातले मुझे कत्ल कर डाला! ही त्यांची गझल आजसुद्धा रसिकांना मंत्रमुग्ध करते. त्याचप्रमाणे साहित्य क्षेत्रात १०० वर्षांपूर्वी एक नाव आदराने घेतलं जायचं, ते म्हणजे आनंदीबाई शिर्के यांचं. त्यांच्या सांजवात या आत्मचरित्रामुळे त्यांना साहित्य क्षेत्रात मोठे मानाचे स्थान प्राप्त झाले. त्यांच्या अनेक कथा, कादंबर्‍या आजदेखील वाचल्या जातात. केवळ साहित्य सांस्कृतिक क्षेत्रातच नव्हे, तर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात पुरुषांची मक्तेदारी मोडून काढत अनुसयाबाई शिंदे यांनी डफावर थाप मारत गावोगावी जाऊन आपल्या शाहिरीच्या माध्यमातून महाराष्ट्र एकसंध केला. मराठवाडा मुक्ती संग्राम, गोवा मुक्ती लढ्यातदेखील त्यांच्या शाहिरीची तोफ कडाडली.

सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण करणार्‍या विमलाबाई बागल. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा प्रत्यक्ष कृतीतून आणणार्‍या चळवळ्या महिला नेत्या म्हणून त्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. महिलांना न्याय मिळवून देणार्‍या व त्यांच्यासाठी विविध आंदोलने करणार्‍या विमलाबाई आमदारही राहिल्या आहेत.

स्वातंत्र्यलढ्यातील इंदुबाई पाटणकर यांचे नाव आजसुद्धा आदराने घेतले जाते. राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून त्यांनी अनेक चळवळीत आपला सहभाग नोंदवला. प्रतिसरकारच्या चळवळीच्या त्या महत्त्वपूर्ण नेत्या होत्या. त्याचप्रमाणे लिलाबाई पाटील यांचे योगदानदेखील महत्त्वाचे आहे. गांधी विचाराने प्रेरित होत त्यांनी १९४२ साली स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल त्यांना १४ वर्षे कारावास झाला. त्यांच्या योगदानाची दखल साने गुरुजींनी घेत त्यांच्यावर लेखसुद्धा लिहिला. हौसाबाई पाटील यांनीसुद्धा तुफान सेनेच्या माध्यमातून शस्त्र उठाव करून इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले व आपल्या वडिलांचा म्हणजेच क्रांतिसिंह नाना पाटलांचा वारसा खर्‍या अर्थाने पुढे चालवला. लोक चळवळ, स्वातंत्र्यलढा या विविध क्षेत्रांत महाराष्ट्रातील अनेक महिलांनी आपल्या कार्याची मोहर उमटवली आहे. काहींचे कार्य अधोरेखित झाले, तर काहींचे काळाच्या पडद्याआड गेले. अशाच कर्तबगार मराठी महिलांचा अल्प परिचय पुढे आणण्याचा हा छोटासा प्रयत्न.

–भूषण विठ्ठलराव काळे

First Published on: October 2, 2022 5:14 AM
Exit mobile version