रिकामा अर्धघडी राहू नकोस

रिकामा अर्धघडी राहू नकोस

–सुनील शिरवाडकर

दोन वर्षे झाली तुला रिटायर्ड होऊन..करतोस काय रे दिवसभर.. वेळ कसा घालवतोय?
काही नाही रे..सकाळचा वेळ जातो असाच.. थोडाफार व्यायाम..पूजा बिजा यात..
आणि संध्याकाळी?
असंच इकडे तिकडे करायचं..एखादी चक्कर मारून यायचं बाहेर… काही नाही तर आहेच आपला मोबाईल. जरा वेळ whatsapp वर फिरायचं…मग जरावेळ Facebook..जातो दिवस निघून.

रिटायर्ड झालेल्या बर्‍याच मित्रांना मी असे प्रश्न विचारले. प्रत्येकाची उत्तरे निरनिराळी. कोणाच्या घराला म्हणजे बंगल्याला आवार असते, तिथे त्यांचा बराचसा वेळ जातो. झाडं लावलेली असतात, त्यांची देखभाल, कुंड्यांची हलवाहलव, झाडांना पाणी घालणं, सकाळच्या पूजेसाठी कोणी फुलं आणायला बाहेर पडतात. कोणी घरातलीच साफसफाई, आवराआवर करतात. मॉर्निंग वॉक, व्यायाम, योगा यातही बर्‍याच जणांचा बराच वेळ जातो.

धार्मिक वृत्तीचे असतात त्यांचा पूजा करण्यात तासभर कसाही जातो. सकाळचा वेळ जातो असा. दुपारी जेवण, मग झोप, पण संध्याकाळी काय?

रिटायर्ड झाल्यावर सुरुवातीला खरंच प्रश्न पडला होता, आता दिवसभर करायचं काय? पण एक ठरवलं होतं, आपली घरात अडचण होऊ द्यायची नाही. सतत घरात बसलं तर घरच्यांनादेखील आपली अडचण होऊ शकते. मग मी आठवड्यातून तीन दिवस संध्याकाळी एका सेवाभावी संस्थेत जायला लागलो. रोज एक तास तिथे द्यायचा. बरीच कामं असतात त्यांच्या ऑफिसमध्ये. तिथे मदत करायची. कोणत्याही मानधनाची अपेक्षा न करता.

पण अशी माणसं थोडीच. संध्याकाळी टीव्ही बघणे हाच बर्‍याच जणांचा मुख्य कार्यक्रम. मोबाईल, टीव्ही, पुन्हा मोबाईल असंच चालू असतं आजकाल. मग कधीतरी मोबाईलवर सूचना येते चार्जिंग संपत चालल्याची. मग आपण काय करतो? तो चार्जिंगला लावतो. अर्ध्या एक तासात तो फुल चार्ज होतो आणि मग पुन्हा आपलं सोशल मीडियावर भटकणं सुरू होतं.

जसं मोबाईलचं तसंच आपल्या मनाचंही असतं, पण आपल्या ते लक्षातच येत नाही. आपलं मन कधी चार्ज करतो? मुळात आपलं मनही कधी कधी डिस्चार्ज होतं हे आपल्याला ठाऊकच नसतं. मन डिस्चार्ज होतं म्हणजे नक्की काय होतं.

एखाद्या संध्याकाळी मनात खूप उदासी दाटून येते. ते नैराश्यच असतं असं नाही. खूप कंटाळा आलेला असतो. एकटेपणा सतावत असतो. अशा वेळी आपल्या एखाद्या मित्राला फोन करायचा सहजच, अगदी निरुद्देश. अगदी फालतू गप्पा मारल्या तरी हरकत नाही. तोही असाच मोकळा असतो. त्यालाही टाईमपास करायचा असतो. पाच-दहा मिनिटांसाठी म्हणून केलेला फोन, पण गप्पा अशा रंगत जातात. अर्धा तास होऊन जातो तरी कळत नाही आणि मग आपण गप्पा आवरत्या घेतो. फोन ठेवतो तेव्हा मन फुल चार्ज झालेलं असतं. जुन्या आठवणी, जुना काळ बोलण्यामुळे डोळ्यासमोर आलेला असतो. एक कंटाळवाणी संध्याकाळ सुंदर झालेली असते.

अशा जिवाभावाच्या गप्पा मारायला असे अनेक मित्र हवेत. आज याला फोन केला, उद्या त्याला केला. प्रत्यक्ष भेटी होत राहतील, पण फोनवर तर आपण क्षणात संपर्कात येऊ शकतो. यावरून आठवलं, असंच सोशल मीडियावर वाचलेला एक मौलिक संदेश.

रिटायर्ड लाईफ हे औषधांच्या गोळ्यांसोबत जगण्यापेक्षा मित्रांच्या टोळ्यांसोबत जगा. हे सगळं झालं आजच्या पिढीचं. मागची पिढी काय करीत होती वयाच्या साठीनंतर? माझी आजी…त्यानंतर वडील संध्याकाळी नियमानं हरिपाठाचं वाचन करायचे. सतत कानावर पडून माझाही तो ओळखीचा झाला. त्यातील बरेचसे अभंग जगण्याचं सार शिकवतात, हरिनामाचं महत्त्व सांगतात आणि त्यामुळेच त्या पिढीचं जगणं खूप सुलभ झालं होतं. सोशल मीडियावर येणार्‍या शेकडो संदेशांचं सार एका हरिपाठात सामावलं आहे.

हरिपाठाच्या एका अभंगात माऊली म्हणतात…
सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी
रिकामा अर्धघडी राहू नकोस.

आणि पुढच्याच अभंगात म्हणतात…
असावे एकाग्री स्वस्थ चित्त मनी
उल्हासे करूनी स्मरावा हरी
अंतकाळी तैसा संकटाचे वेळी
हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य

First Published on: March 19, 2023 5:00 AM
Exit mobile version