ब्लॉकचेन तंत्र अन् लक्ष्मी मंत्र!

ब्लॉकचेन तंत्र अन् लक्ष्मी मंत्र!

आतापर्यंतची सर्वात मोठी ‘ब्लॉकचेन’वर आधारित क्रिप्टोकरन्सी चोरी मागील वर्षी पकडली गेली होती. अमेरिकन जोडप्याला सहा वर्षांपूर्वी २६ हजार ९१७ कोटी रुपयांचे म्हणजे ३.६ अब्ज डॉलर किमतीचे १.१९ लाख बिटकॉईन चोरल्याप्रकरणी अमेरिकेच्या न्याय विभागाने इलया लिचटेन्सटाइन (३४) व हीथर मोर्गन (३१) या एका विवाहित जोडप्याला अटक केली होती. अशा वेळी प्रश्न पडतो की नेमके ब्लॉकचेन काय आहे आणि त्यावर आधारित क्रिप्टोकरन्सी इतकी सुरक्षित कशी की ३.६ अब्ज डॉलर किमतीच्या चलनाची चोरी झाली तरीसुद्धा चोर उशिरा का होईना पकडला गेलाच!

काय आहे ‘ब्लॉकचेन’ टेक्नोलॉजी?

१. ब्लॉकचेन हा शब्द ब्लॉक (Block) आणि चेन (Chain) या दोन शब्दांनी मिळून बनला.

२. ब्लॉकचेन ही एक डिसेंट्रलाईज्ड म्हणजे विस्तारलेली टेक्नोलॉजी किंवा तंत्रज्ञान व एक ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे.

३. कोणतीही गोष्ट डिजिटल बनवून त्याचे रेकॉर्ड येथे ठेवले जाऊ शकते.

४. ब्लॉकचेनला डिस्ट्रिब्यूटेड लेजर टेक्नोलॉजीच्या (डीएलटी) रूपातदेखील ओळखले जाते.

५. ब्लॉकचेन पहिल्यांदा १९९१ मध्ये एक रिसर्च प्रोजेक्टच्या रूपात आले होते, परंतु २००९ मध्ये बिटकॉईनमध्ये याचा वापर केला गेला.

६. ‘डिजिटल करन्सी’देखील ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरून व एक डिजिटल खाते बनवत बटव्यात जतन करता येते.

७. आता याचा क्रिप्टोकरन्सीसोबत काही दुसर्‍या कामातही वापर केला जातो, तसेच होणारी देवाणघेवाण होते, ती चेनमध्ये (साखळीतील) प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये दिसते.

८. आज बिटकॉईनसारख्या बिटकॉईन कॅश, ईथर, तारकीय, पॅक्सोस स्टँडर्ड, टिथर, आवे आणि यार्न फायनान्स आदी किमान ६००० डिजिटल कॉईन्स म्हणजेच कूट-चलन किंवा क्रिप्टो-करन्सी या जगभर विविध संस्थांनी विविध व्यवसाय व व्यवहारासाठी बनवल्या आहेत आणि त्यालादेखील ब्लॉकचेन तंत्रज्ञान सपोर्ट करण्यासाठी सज्ज झाले आहे.

९. परिणामी क्रिप्टोकरन्सीजचा पाठीचा कणा (बॅकबोन) अशी ओळख असलेल्या ‘ब्लॉकचेन’चे तंत्रज्ञान हॅक केले तरी चोरोंका बचना मुश्किल ही नहीं पर नामुमकीन है. कठीण आहे. म्हणूनच आहे.

१०. थोडक्यात ‘ब्लॉकचेन’ म्हणजे कुठलीही डिजिटल माहिती अथवा रेकॉर्ड व्यवस्थापन करण्याची एक साधीसुधी यंत्रणा किंवा प्रणाली होय.

११. माहिती भरवशाची आहे की आपल्याला मिळालेल्या माहितीमध्ये कुणी जाणूनबुजून बदल केला किंवा कोणी मध्येच एखादा लिफाफा खोलून पत्रातील गोपनीय संदेश-मजकूर हॅक करून वाचला आहे अथवा ‘ध’ चा ‘मा’ करत सिस्टीम क्रॅक केली आहे याची अत्यंत खात्रीशीर माहिती देत फसवणूक टाळण्यासाठीची विश्वासार्ह यंत्रणा म्हणजे ब्लॉकचेन!

असे चालते ‘ब्लॉकचेन’चे काम!

१. ब्लॉकचेन तंत्रज्ञान डिजिटल माहितीचे रेकॉर्ड (नोंदणी) आणि डिस्ट्रीब्यूशन (वितरण) करण्यासाठी परवानगी देत सुरक्षित मानले जाते.

२. ब्लॉकचेनच्या देवाणघेवाणीचा रेकॉर्डमध्ये फेरफार झाले तरीही कधी, कुणी, कुठे, कसे व काय फेरफार केलेत याची इत्थंभूत माहितीदेखील नोंदली जाते.

३. ‘ब्लॉकचेन’ म्हणजे वितरित विकेंद्रित नोंद खाते अर्थात डिस्ट्रब्युटेड डिसेन्ट्रलाईज्ड लेजर होय.

४. ब्लॉकचेनचे डिजिटल लेजर संपूर्ण नेटवर्कमध्ये हुबेहूब नक्कल म्हणजे डुप्लिकेट कॉपीसह वितरित करता येते.

५. ब्लॉकचेन तंत्रज्ञानात दर दहा मिनिटांनी ते स्वयंचलितपणे स्वत:चे परीक्षण करत अपडेट होत आणि या धनादेशांमधील व्यवहारांमध्ये अशा सामंजस्य अवधीला ‘ब्लॉक’ असे म्हणतात. तसेच व्यवहारातील ‘चेन’ म्हणजे मालिका किंवा श्रृंखला म्हणून या तंत्रज्ञानाला नाव मिळाले ‘ब्लॉकचेन’!

ब्लॉकचेन उपयोग

१. क्रिप्टोकरन्सी हे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित चलन होय, म्हणूनच क्रिप्टोकरन्सी म्हणजे एक विश्वासार्ह ‘डिजिटल बटवा’च आहे.

२. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील संवेदनशील माहिती, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नागरिकांच्या प्रत्येक हालचाली व बँकेच्या ट्रान्झेक्शनवर देखरेख ठेवण्यासाठी व त्यांची माहिती संग्रहित करण्यासाठी तसेच खासगी अथवा सार्वजनिक ठिकाणांहून ट्रान्सफर (स्थानांतरीत) करण्यासाठी ‘ब्लॉकचेन’ हा एक उत्तम प्लॅटफॉर्म अथवा व्यासपीठ आहे.

३. देशांच्या सीमारेषा पुसत जागतिक आर्थिक आदानप्रदान व संवाद ब्लॉकचेनने सुरू आहे.

४. गुप्त सांकेतिक लिपी म्हणजे ‘डाटा एनक्रीप्शन्स’मुळे परस्पर माहिती, कुणी उघडली, जरी हे काम कोणी? कुठे केले? हे अगदी सहज समजण्यासाठी आणि चोराची खातरजमा करून पकडण्यासाठी सध्या ब्लॉकचेन तंत्रज्ञान सध्यातरी उपयुक्त आहे.

५. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईटमधील पेटंट, कॉपीराईट आदींबाबत आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी रोखण्यासाठीदेखील ब्लॉकचेन उपयुक्त आहे.

ब्लॉकचेन आकार आणि व्याप्ती

१. १९९० मध्ये इंटरनेटची सुरुवात जगभर झाली व आता ‘ब्लॉकचेन’ तंत्र व डिजिटल बटवा हा आर्थिक क्षेत्रात जीव की प्राण बनत आहे.

२. सन २०१२ मध्ये स्थापन झालेले ब्लॉकचेन हे जगातील सर्वात लोकप्रिय पाकीट किंवा डिजिटल बटवा होय, जो पृथ्वीवरील १९७ पैकी १८० देशांमध्ये वापरला जात आहे.

३. ब्लॉकचेन जागतिक बाजाराचा आकार २०२० मध्ये ३ अब्ज डॉलर्स होता, जो २०२० ते २०२५ दरम्यान ६७.३० टक्केे इतका प्रभावी चक्रवाढ वार्षिक वाढीच्या दराने (सीएजीआर), २०२५ पर्यंत ३९.७० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

जोडी ‘क्रिप्टोकरन्सी व ब्लॉकचेन’ची!

१. सतोशी नाकामोतो या जापनीज शास्त्रज्ञाने ३१ ऑक्टोबर २००८ ला डिजिटल करन्सी म्हणजे संगणकीय आर्थिक व्यवहारात आदानप्रदान करता येणारे आभासी चलन किंवा नाणे म्हणजे बिटकॉईन हे अधिकृतपणे रजिस्टर केले व ब्लॉकचेन आणि बिटकॉईन युगाचा प्रारंभ झाला.

२. ब्लॉकचेन हे तंत्रज्ञान आहे तर या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन वापरले जाणारे डिजिटल चलन हे क्रिप्टोकरन्सी या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी लोकांनी ब्लॉकचेनला क्रिप्टोकरन्सीशी जोडण्यास सुरुवात केली व बिटकॉईन हे आभासी नाणे म्हणजेच ब्लॉकचेन असा काही लोकांचा गैरसमज झाला.

३. अवघ्या १४ वर्षात ब्लॉकचेन जगभर पसरले व अवघ्या दशकभरात या आभासी चलनांची उलाढाल अब्जावधी डॉलरच्या घरात पोहचली आहे.

ब्लॉकचेनसाठीचे धोके आणि आव्हाने

१. इंटरनेटच्या माध्यमातून व कोणत्याही देशाच्या सीमारेषांचे बंधन नसल्याने कर भरण्याचा प्रश्नच येत नाही आणि ही सरकारसाठी फार मोठी डोकेदुखी ठरत आहे हे आजही देशातील राज्यकर्ते व जनतेच्या पूर्णपणे लक्षात आले आहे.

२. प्रत्येक जण आपल्याला हवे तसे चलन निर्माण करू लागल्याने व १९५ देशांवर एकच वितरण व विनिमय नियम नसल्याने ६००० पेक्षा जास्त विविध आभासी चलनावर आता देशोदेशी बंदी घातलीदेखील जाऊ लागली आहे. अनेक हॉटेल्स व व्यावसायिक क्रिप्टोकरन्सी स्वीकारली जाणार नाही असेदेखील धोरण राबवत आहेत, हा विरोधाभास आहे.

३. आभासी चलनाद्वारे केलेले आर्थिक व्यवहार अतिशय गोपनीय असले तरी कॉम्प्युटर हॅकर आणि क्रॅकर सायबर सिक्युरिटी भेदून हा व्यवहार बघूच शकणार नाहीत याची शंभर टक्के खात्री देता येईलच असे नाही.

४. इंटरनेट बंद पडणे.

५. क्लाउड सर्व्हरचा विद्युत पुरवठा अनिश्चित कालावधीसाठी खंडित होणे.

६. हॅकर्सने आर्थिक चोरी केल्याचे कळण्यासाठी व चोर शोधण्यासाठी जाणारा वेळ आणि मानवी श्रम आणि त्याच्या परिणामाने होणारे आर्थिक नुकसान तसेच मानसिक ताणतणाव हे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाबाबत धोके तसेच आव्हाने आहेत.

७. एखाद्या देशाची अर्थव्यवस्था एका क्षणात उद्ध्वस्त करण्याचे सामर्थ्य या आभासी चलनात आहे.

८. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेबरोबरच इतर तंत्रज्ञान माध्यमातून व्यक्तीचे जीवन सुखकर होण्याबरोबरच नवीन समस्यांची निर्मिती व ब्लॉकचेन तंत्रज्ञान अडचणींवर ‘सोल्यूशन्स’ हे चक्र अटळ आहे.

‘ब्लॉकचेन’ तंत्र अन् ‘लक्ष्मी मंत्र’!

चांगली गोष्ट ही आहे की ब्लॉकचेन टेक्नोलॉजी वापरासाठी ‘टॅलेंट’चा दुष्काळ पडला आहे. परिणामी पैशांचा पाऊस पाडता येईल म्हणजेच अशा अमाप नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. जागतिक ब्लॉकचेन बाजाराचा आकार २०२६ साली ६७.४ बिलियन (दशलक्ष) डॉलरपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे, जो दरवर्षी ६८.४ टक्के चक्रवाढ पद्धतीने वाढ दाखवतो. परिणामी संधींचा खजिना उपलब्ध आहे. २०१९ मध्ये एका वर्षात ‘ब्लॉकचेन’वर आधारित नोकर्‍यांमध्ये ३०० टक्के वाढ झाली. यात जवळपास ४२ टक्के नोकर्‍या या आर्थिक क्षेत्राशी संबंधित आहेत. भारतात सध्या ब्लॉकचेन डेव्हलपरला दरवर्षी सुमारे २० लाख रुपये पगार दिला जात आहे, मात्र वेब ३ जॉब्सनुसार जागतिक पातळीवर ब्लॉकचेन डेव्हलपरला दरवर्षी सरासरी एक लाख डॉलर म्हणजे दरवर्षी सरासरी सुमारे ८३ लाख भारतीय रुपये इतका पगार मिळतो.

–(लेखक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे अभ्यासक आहेत)

First Published on: January 8, 2023 5:26 AM
Exit mobile version