वेगळ्या वाटेवरच्या दीर्घकथा

वेगळ्या वाटेवरच्या दीर्घकथा

डॉ. सुरेंद्र दरेकरांचा ‘बुडता आवरी मज’ हा दोन दीर्घकथांचा संग्रह ‘संवेदना प्रकाशन’ तर्फे नुकताच प्रकाशित झाला आहे. या संग्रहात दोन दीर्घकथा आहेत. त्या वाचायलादेखील वाचक मुळात काही तयारीचा हवा, असं थोडं वाचताच लक्षात येतं. पहिली कथा, ‘बुडता आवरी मज’ ही समकालीन आहे. तीत भूतकाळाचे संदर्भ आहेत, पण कथा प्रामुख्यानं आताच्या काळात घडते. आधुनिक राहणी असलेल्या सुखवस्तू कुटुंबाची कथा. प्रतिकूल परिस्थितीत बालपण आणि सुरुवातीचं तारुण्य गेलेल्या पतिपत्नींच्या व्यक्तिरेखा अतिशय सशक्तपणे उभ्या राहिल्या आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करणार्‍या दोघा तरुण मुलींच्या व्यक्तिरेखाही त्यांना पूरक आहेत.

अकाली, अनपेक्षित, अपघाती मृत्यू झालेल्या त्यांच्या तरुण मुलाचंही चित्रण थोडक्यात समर्थपणे केलंय.( फक्त एकच थोडंसं वाटतं की इतकी मोठी दुर्घटना नजीकच्याच भूतकाळात घडून गेलेली असून दैनंदिन जीवनात तिचं सावट फारसं पडलेलं दिसत नाही, मुलाच्या आईची हळूहळू खालावत गेलेली तब्येत वगळता. वडिलांचा कल तत्त्वज्ञानाकडे असल्यामुळे, ते स्वाभाविक.) त्यांच्या, मुलींच्या कामांच्या वेगवेगळ्या क्षेत्रांचं तपशीलवार, नेटकं चित्रण कथेत आलंय. तिथलं वातावरण, तिथली माणसं, तिथल्या समस्या आणि आव्हानं, माणसांचे परस्परसंबंध यांची अतिशय सुविहित गुंफण कथेत आहे. तत्त्वज्ञानविषयक सविस्तर चर्चा आहेत. त्यासाठी, अचानक झालेल्या एका बंगाली समवयस्क, समानधर्मी गृहस्थांच्या भेटीचा, वाढलेल्या परिचयाचा भाग कथेत गुंफून टाकलेला आहे. पण हा नवा धागा मूळ कथेतल्या कुटुंबाशी, व्यक्तींशी अगदी सहज स्वाभाविक रीतीनं जुळून गेला आहे.

त्यातूनच कथेत तत्त्वज्ञानविषयक सविस्तर चर्चा येतात. त्या ओढूनताणून आणलेल्या वाटत नाहीत, हे लेखकांचं कौशल्य. भविष्य-ज्योतिष, वास्तूशास्त्र, कृतकर्मांची फळं भोगावी लागल्याचे संदर्भ. किती केवढी गुंतागुंत आणि त्या गुंत्याची सफाईनं केलेली उकल यामुळे कथा अधिकाधिक सखोल होत जाते. परत, जे. कृष्णमूर्तींच्या जगभरच्या इतरही तत्त्वज्ञांच्या विचारांची एवढी विस्तृत चर्चा समाविष्ट असूनही कथेच्या ओघाला कुठे बाध नाही, रसभंग नाही. ही कथा वाचताना मला चाळीसच्या दशकात वा.म.जोशींनी लिहिलेल्या कादंबर्‍यांची आठवण झाली. पण तिथे त्या चर्चांमुळे रुक्षपणा आल्याचं जाणवतं. डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकरांच्या कादंबर्‍यांतही अशा चर्चा आहेत, मात्र अधिक सफाईनं गुंफलेल्या. शरच्चंद्र चिरमुले, विद्याधर पुंडलीक, भारत सासणे यांच्या कथांमध्येही त्या वेळोवेळी येतात, अर्थात एवढ्या विस्तारानं नाही. पण कथेच्या ओघात त्या मिसळून टाकण्याची, किंबहुना पूरक तर्‍हेनं गुंफण्याची जी हातोटी त्यांना आणि जी.एं.ना साधली होती, तीच, तशीच, आणखी परिणामकारकतेनं या लेखकाला साधली आहे!

दुसरी ‘पॉइज’ ही कथा चाळीस वर्षांपूर्वीच्या काळात घडते. तेव्हाचे सगळे कौटुंबिक-सामाजिक-राजकीय-भौगोलिक-वैज्ञानिक-आर्थिक संदर्भ तिच्यात आले आहेत. ग्रामीण वातावरणाचं, शेतीवाडीच्या संदर्भातलं, गावातल्या नातेसंबंधांचं चित्रण फार सुरेख उतरलं आहे. पहिल्या कथेसारख्याच हिच्यातही अनेक व्यक्तिरेखा असल्या, तरी एक प्रमुख व्यक्तिरेखा केंद्रस्थानी आहे. तिच्या भोवती सगळं चित्रण होत जातं. चाळीस वर्षांपूर्वीचं ग्रामीण कुटुंब, तिथून सुरू झालेलं नायकाचं आयुष्य हळूहळू शहराकडे, आणखी मोठ्या शहराकडे, मग महानगराकडे प्रवास करत जातं आणि अखेरीस परदेशी स्थलांतराच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहचतं. या कथेत शुद्ध विज्ञानविषयक दीर्घ चर्चा आहे, तरी काही व्यक्ती आणि प्रसंगांच्या निमित्तानं तात्त्विक चर्चांचा धागा शिवाय मानसशास्त्राची जोड देऊन त्यात गुंफला आहे. आणि कथेच्या प्रवाहात त्यामुळे खंड पडू न देण्याचं कौशल्य इथेही आहेच. परत प्रत्येक संदर्भ त्या जवळपास अर्धशतकापूर्वीच्या सगळ्या वास्तवाशी बेमालूमपणे जोडलेला आहे. तो सगळा काळच जिवंत झाला आहे.

असं वाटतं की लेखकांचं आयुष्य जशी वळणं घेत गेलेलं आहे, त्या प्रवासाचा एक धागा सगळ्याला जोडत असावा. लेखकांची विविध विषयांतली झेप, व्यासंग, समज, आत्मसात केलेलं ज्ञान इथे प्रत्ययाला येतं. इतक्या विषयांना आणि क्षेत्रांना स्पर्श करणार्‍या, नव्हे, त्यांचं बारकाईनं चित्रण करणार्‍या या कथा लेखकाच्या सर्वस्पर्शी प्रज्ञेचं दर्शन घडवतात. इंग्रजीत लिहिणार्‍या लेखकांचा असा अभ्यास, सखोल ज्ञान त्यांच्या लेखनातून जाणवतं, तसं मराठीत फारसं आढळत नाही. अच्युत गोडबोले, भैरप्पांसारखे अभ्यासू भारतीय लेखक मुळात कमी. पण तेही एका पुस्तकात एक मुख्य विषय हाताळतात. इथे अनेक विषय एकत्र आणि त्यांचे ताणेबाणे अत्यंत सफाईनं गुंफलेले! संगीतविषयक संदर्भ, विविध भाषांमधले संवादही स्वाभाविकपणे येऊन जातात. कॉलेज, तिथलं सगळं वातावरण, विद्यार्थ्यांचं, प्राध्यापकांचं जग तर अगदी जिवंत! मराठी साहित्याला हा प्रतिभावंत, सशक्त लेखक खूप काही देऊ पाहतो आहे.

मनोज दरेकर यांचं मुखपृष्ठ आहे. आतली,अर्पणपत्रिकेबरोबरची आणि दोन्ही कथांच्या प्रारंभीची चित्रं फार सुंदर आहेत. लेखकाची अर्पणपत्रिकाही अंत:करणाला स्पर्श करणारी आहे. वाचताना डोळे ओलावतात. अतिशय हृद्य आणि अर्थपूर्ण शब्द! प्रकाशक नितीन हिरवे (संवेदना प्रकाशन)यांनी पुस्तक अतिशय उत्तम रीतीनं तयार केलं आहे.

-लेखक – सुरेंद्र दरेकर
-मूल्य – ३०० रुपये
-पृष्ठे – २६२

– -लीना पाटणकर

-(पुस्तक परीक्षक मराठीच्या प्राध्यापिका आहेत)

First Published on: April 4, 2021 3:30 AM
Exit mobile version