तोट्याचा मालक कोण ?

तोट्याचा मालक कोण ?

व्यवसायात किंवा शेअर्स, म्युच्युअल फंड यात फायदा झाला तर त्यात कररूपाने सरकार भागीदार असते, मग व्यवसायात तोटा झाला तर सरकार तोटा सहन करते का? भारतीय करप्रणालीमध्ये प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर असे दोन कर आहेत. आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जगण्यासाठी ज्या काही वस्तू व सेवा वापरतो त्यात आपल्याला कर हा द्यावाच लागतो. भलेही त्या कराचा दर वस्तू किंवा सेवेनुसार वेगवेगळा असू शकेल. हेही खरे आहे की काही जीवनावश्यक वस्तू व सेवेवर करसुद्धा लावला जात नाही. हा जो काही वस्तू व सेवेवर कर वसूल केला जातो त्याला अप्रत्यक्ष कर संबोधले जाते. त्याचा तुमच्या उत्पन्नाशी काहीही संबंध नसतो. असे म्हटले तरी वावगे होणार नाही की, देशाचा प्रत्येक नागरिक हा कररूपाने देशाच्या तिजोरीत पैसे टाकत असतो.

आपण जो काही व्यवसाय, उद्योग करतो त्यातून जो नफा मिळतो (उत्पन्न वजा ते उत्पन्न मिळविण्यासाठी जो खर्च केला जातो त्याला नफा म्हणतात) त्यावर आपल्याला आयकर भरावा लागतो. त्याला प्रत्यक्ष कर असे संबोधले जाते. जे काही गुंतवणूकदार असतात त्यांना शेअर्स, म्युचल फंड, प्रॉपर्टी इत्यादी गुंतवणुकीवर नफा झाला तरी त्यावर आयकर भरावा लागतो. महत्त्वाचा प्रश्न हा आहे की तोटा झाला तर काय? कोरोना महामारीमुळे व एकूणच वाढती महागाई यामुळे व्यवसायात तोटा होत आहे. वाढते कर्मचारी पगार, जागेचे भाडे, बँक कर्जाचे व्याज, इंधन दरवाढीमुळे वाढता दळणवळण खर्च, इतर खर्च तर सुरूच आहे आणि विक्री नाही किंवा उत्पन्न नाही तर व्यवसायात तोटा होणारच.

उद्योग, व्यवसायात नफा झाला की वैयक्तिक करदात्याकला स्लॅबनुसार व इतर करदात्याला ठरावीक दराने आयकर भरावा लागतो, परंतु व्यवसायात तोटा झाला तर काय होते, सरकार फक्त व्यावसायिक व उद्योजकाच्या नफ्यात कररूपाने भागीदार असते, परंतु त्याला तोटा झाला तर सरकार त्याला वार्‍यावर सोडते हा गैरसमज अनेक उद्योजकांच्या मनात आहे. आयकर कायदा १९६१मध्ये याबाबत काय तरतुदी आहे याचा विचार आपण दोन भागांत करू.

भाग एक : एखाद्या वर्षी जर माझे दोन व्यवसाय असतील आणि एका व्यवसायात तोटा झाला आणि दुसर्‍या व्यवसायात नफा झाला तर एका व्यवसायाच्या नफ्यातून दुसर्‍या व्यवसायाचा तोटा वजा करून उरलेल्या नफ्यावर आयकर भरावा लागतो. म्हणजे माझा स्वतःचा ‘अ’ व्यवसाय आहे. त्यात मला १० लाख रुपये नफा झाला आणि माझा दुसरा ‘ब’ व्यवसाय आहे. त्यात मला ५ लाख रुपये तोटा झाला, तर मला रु. १० लाख नफा वजा रु. ५ लाख तोटा असे उरलेल्या रु. ५ लाखांवरच आयकर भरावा लागतो. याला आयकर कायदा १९६१च्या कलम ७०नुसार इंट्रा हेड इन्कम ऍडजेस्टमेंट असे म्हणतात.

भाग दोन : जर मला माझ्या व्यवसायात तोटा झाला तर काय होणार. व्यवसायातील तोटा हा पुढील वर्षी जर नफा झाला तर त्यातून वजा होतो व मला उरलेल्या नफ्यावरच टॅक्स भरावा लागतो. हे जरा अधिक समजून घेऊया. मला आर्थिक वर्ष २०२०-२०२१मध्ये व्यवसायात रु. १० लाख तोटा झाला आणि पुढील वर्ष २०२१-२२ मध्ये रु.१५ लाख नफा झाला, तर मला २०२०-२०२१ यावर्षी काहीही आयकर भरावा लागणार नाही. कारण त्या वर्षी तोटा आहे आणि मला २०२१-२२मध्ये जो रु. १५ लाख नफा झाला आहे त्यातून मागील वर्षाचा तोटा रु. १० लाख वजा होतो. म्हणजे मला २०२१-२२ मध्ये फक्त रु. ५ लाखांवरच आयकर भरावा लागेल. कारण माझा मागील वर्षाचा रु. १० लाख तोटा आधी भरून काढला जातो व काही नफा उरत असेल तरच पुढील वर्षी आयकर भरावा लागतो.

याला आयकर कायदा १९६१, कलम ७२नुसार कॅरी फॉरवर्ड ऑफ लॉस असे म्हणतात आणि असा तोटा ज्या वर्षी तोटा झाला आहे त्या वर्षापासून ८ वर्षे पुढे कॅरी फॉरवर्ड होतो व पुढील वर्षी होणार्‍या नफ्यातून तो तोटा वजा होतो. त्यासाठी महत्त्वाची अट अशी आहे की तुमचे आयकर रिटर्न हे आयकर खात्याने नेमून दिलेल्या तारखेच्या आत भरणे गरजेचे आहे. रिटर्न नेमून दिलेल्या तारखेनंतर भरले तर तोटा कॅरी फॉरवर्ड होत नाही. व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात तुम्ही जी काही भांडवली गुंतवणूक केली आहे जसे की फॅक्टरी बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, कार यावर तुम्हाला ठरावीक दराने घसारा खर्च म्हणून पकडला जातो.

ही भांडवली गुंतवणूक मोठी असेल तर साहजिकच हा घसारासुद्धा मोठा असतो. त्यामुळे हा घसारा तोटासुद्धा पुढील ८ वर्षे जर नफा झाला तर त्यातून वजा होतो. तसेच व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात बँक कर्ज मोठ्या प्रमाणात असते व त्यावरील व्याजसुद्धा मोठे असते. ते व्याज वसूल होईल इतकासुद्धा नफा त्यावर्षी नसतो. मग त्यामुळे तोटा होतो तोसुद्धा पुढील ८ वर्षांच्या नफ्यातून वजा होऊन उरलेल्या नफ्यावरच आयकर भरावा लागतो. तसेच सर्वांत महत्त्वाचे तुम्ही व्यवसायात विक्री केली व त्याचे पैसे वसूल झाले नाही ते बुडीत झाले तर तेसुद्धा खर्चात पकडून जर तोटा आला तर तोसुद्धा पुढील ८ वर्षे नफ्यातून वजा होतो व उर्वरित नफ्यावर आयकर भरावा लागतो, मात्र असे बुडीत येणे भविष्यात वसूल झाले तर ते त्या वर्षीचे उत्पन्न पकडून त्यावर टॅक्स भरावा लागतो. त्यासाठी आयकर कायद्यानुसार विशिष्ट बाबींची पूर्तता करावी लागते.

फक्त व्यवसायच काय, परंतु तुम्हाला शेअर्स, म्युचल फंड, प्रॉपर्टी यामध्येसुद्धा तोटा झाला तरीही तोसुद्धा पुढील वर्षाच्या नफ्यातून वजा होऊन उरलेल्या नफ्यावरच आयकर भरावा लागतो.

तर वर आपण आयकर कायदा १९६१मधील काही तरतुदी बघितल्या. त्यानुसार तोटा झाला तर त्यातसुद्धा सरकार सामील असते हीच सत्य बाब आहे. सरकार निर्दयी नाही. त्यामुळे व्यवसायात काही तोटा झाला तर घाबरण्याची गरज नाही. तो तोटा पुढील वर्षी झालेल्या नफ्यातून वजा होईल व उरलेल्या नफ्यावरच आयकर भरावा लागेल. करदाता कुठलाही असो तो प्रत्यक्ष कर देणारा असो किंवा अप्रत्यक्ष कर देणारा असो त्याचा सन्मान हा झालाच पाहिजे. या देशात जे काही नागरिकांना फुकट मिळते त्यासाठी कुणीतरी पैसे दिलेले असतात आणि तो म्हणजे करदाता (तुम्ही-आम्ही सर्वच ) त्यांना रिस्पेक्ट हा मिळालाच पाहिजे.

First Published on: July 17, 2022 5:20 AM
Exit mobile version