पेजव्ह्यूज हवेत?, मल्टिपल पीक्स शोधा

पेजव्ह्यूज हवेत?, मल्टिपल पीक्स शोधा

सध्या सतत खूप वेगवेगळी माहिती आपल्या पुढ्यात येऊन पडते. काहीही गरज नसताना कुठली कुठली माहिती लोक एकमेकांना फॉरवर्ड करत असतात. आज काहीच फॉरवर्ड केले नाही, तर कदाचित रात्री आपल्याला झोप येणार नाही, असेच काही जणांना वाटत असावे. भारतात मोबाईलमधील कोणती अ‍ॅप सर्वाधिक वापरली जातात, असे जर शोधायचे झाल्यास इतरांना फॉरवर्ड करण्याची सुविधा असणारे अ‍ॅप असेच याचे उत्तर येईल. सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत फॉरवर्ड करण्याचे काम सुरूच असते. या सगळ्यामध्ये आपले लक्ष वेधून घेणारा आणि दीर्घकाळपर्यंत आपल्या लक्षात राहणारा आशय नक्की कोणता हेसुद्धा बघितले पाहिजे. माहितीच्या विस्फोटानंतर नक्की कोणता आशय लोक खरंच वाचतात आणि तो त्यांच्या लक्षात राहतो, हे नीटपणे समजून घेतले तर न्यूज वेबसाईटमध्ये कार्यरत असणार्‍यांचे काम काहीसे सोप्पे होऊ शकते. हेच काम न्यूज लाईफ स्पॅनने स्किमा, गुगल ट्रेंड्स आणि क्सिसच्या साह्याने केले. सध्या तरी हा अभ्यास अमेरिकेपुरता मर्यादित आहे.

कोणत्या विषयाच्या बातम्या दीर्घकाळपर्यंत वाचकांच्या लक्षात राहतात, असे त्यांनी शोधले आणि या बातम्यांची वर्गवारी केली. यातून असे दिसून आले की नैसर्गिक आपत्ती, हिंसाचार किंवा युद्ध, निवडणुका, मोठ्या व्यक्तींचा मृत्यू आणि सामाजिक वाद या विषयातील बातम्या वाचकांच्या जास्त काळ लक्षात राहतात. या विषयातील माहिती वाचक गुगलच्या साह्याने शोधत असतात. त्यातही ज्या भागात या स्वरुपाची घटना घडली आहे. त्या भागातून या प्रकारचे शोध घेण्याचे प्रमाण जास्त असते. म्हणजे चक्रीवादळाचा फटका ज्या भागाला बसला आहे, त्या आणि लगतच्या भागातून याबद्दलची जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आणि माहिती मिळवण्यासाठी सध्यातरी गुगलवर जाऊन शोधणे हाच प्रमुख मार्ग झाला आहे.

वाचकांचा माहितीचा शोध घेण्याचा पॅटर्न कसा आहे या आधारावर काही मॉडेलही तयार करण्यात आले आहेत. वाचक कोणत्या स्वरुपाच्या बातम्या एकाग्र चित्ताने वाचतात, तो विषय कोणत्या गटात मोडतो, तो विषय तात्कालिक असतो की दीर्घकालीन चालणारा, लोक त्या विषयाकडे कसे आकर्षित होतात, त्या विषयातील लोकांचा इंट्रेस्ट कसा संपत जातो या सगळ्या मुद्यांच्या आधारावर ही मॉडेल तयार करण्यात आली आहेत.

या मॉडेलनुसार काही विषयांबद्दल लोक पद्धतशीरपणे शोध घ्यायला लागतात, मग शोध घेण्याचे प्रमाण हळूहळू वाढत जाऊन त्याचा सर्वोच्च बिंदू येतो आणि नंतर हळूहळू शोध घेण्याचे प्रमाण कमी कमी होऊ लागते. या मॉडेलला त्यांनी सिमेट्रिक म्हटले आहे. साधारणपणे चक्रीवादळासारखी नैसर्गिक आपत्तीच्या काळात लोक याच पद्धतीने शोध घेतात. चक्रीवादळ येण्याची माहिती समजल्यावर त्याबद्दल शोध घ्यायला सुरुवात होते. त्यानंतर वादळ नक्की कुठे धडकणार, त्याचा आपल्या भागाला फटका बसणार का, वारे किती वेगाने वाहणार, सरकारने काय सूचना दिल्या आहेत याबद्दल लोक शोध घेत जातात एकदा वादळ धडकल्यानंतर हळूहळू किती आर्थिक नुकसान झाले, कोणत्या भागात नुकसान झाले, किती जीवितहानी झाली, सरकारने मदतीसंदर्भात कोणत्या घोषणा केल्या आहेत, याबद्दल लोक शोध घेतच राहतात. या पद्धतीमध्ये घटना घडण्याआधी लोकांमध्ये त्याबद्दल जेवढी उत्सुकता असते तेवढीच घटना घडून गेल्यानंतरही राहते. त्यामुळे लोक शोध घेतच राहतात.

दुसरे जे मॉडेल देण्यात आले आहे त्याला स्क्युड लेफ्ट असे म्हणण्यात आले आहे. या मॉडेलमध्ये वाचकांना एखादी घटना घडणार असल्याचे माहिती झाल्यावर ते लगेचच त्याबद्दल शोध घ्यायला सुरुवात करतात. हळूहळू शोध घेणार्‍यांची संख्या आणि संबंधित विषयातील शोधाचे वैविध्यही वाढत जाते. पण आधीच्या मॉडेलपेक्षा यामध्ये एक वेगळेपण आहे. ते म्हणजे संबंधित घटना प्रत्यक्ष घडल्यानंतर त्या विषयातील शोध घेण्याचे प्रमाण झटकन कमी होते. लोकांचा नंतर त्या विषयात काही इंट्रेस्ट राहत नाही. विविध निवडणुकांवेळी जे शोध घेतले जातात ते याच मॉडेलमध्ये मोडतात. निवडणुकांबद्दल माहिती झाल्यावर लोक हळूहळू त्याबद्दलची माहिती शोधायला लागतात. उमेदवार, पक्षांची माहिती, वादग्रस्त वक्तव्ये, सत्ताधारी आणि विरोधकांचे दावे-प्रतिदावे, सेलिब्रिंटीचा सहभाग, निवडणुकांच्या तारखा, मतमोजणीच्या तारखा याबद्दल शोध घेतला जातो. पण एकदा निवडणुकीचे निकाल लागले आणि कोण जिंकले हे स्पष्ट झाले की लगेच वाचक त्या विषयातील शोध घेणे बंद करतात. मतमोजणीनंतर वाचकांना त्या विषयामध्ये काही रस नसतो. यात शोध घेण्याच्या सर्वोच्च बिंदूनंतर आलेख झटकन खाली येतो. म्हणूनच याला स्क्यूड लेफ्ट म्हटले आहे.

स्क्यूड लेफ्टच्या एकदम विरुद्ध आहे स्क्यूड राईट. या मॉडेलमध्ये अचानकपणे शोध घेण्याचे प्रमाण वाढते आणि काहीच वेळात संबंधित विषयाचा शोध घेण्याचा सर्वोच्च बिंदू गाठला जातो. पण पुढे शोध घेण्याचे प्रमाण लगेच खाली येत नाही. पुढील काही दिवस लोक त्या विषयाचा शोध घेतच असतात. देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्यानंतर लगेचच त्यांच्याबद्दलची माहिती शोधायला सुरुवात झाली. काही तासांतच त्यांच्याबद्दल शोध घेण्याचे प्रमाण खूप वाढले. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याचे कळल्यावरही लोक त्यांच्याबद्दल शोध घेतच होते. पुढील काही दिवस असा शोध घेण्याचे काम सुरूच होते. दहशतवादी हल्ला किंवा बॉम्बस्फोट झाल्यानंतरही एकदम शोध घेण्याचे प्रमाण वेगाने वाढते, पण नंतर हळूहळू ते कमी होत जाते. धक्कादायक घटना घडल्यानंतर या मॉडेलनुसार लोक शोध घेतात, असे दिसून आले आहे.

जेव्हा एखाद्या घटनेबद्दल लोक खूप दिवस शोध घेत राहतात. कधी कधी शोध घेण्याचे प्रमाण एकदम वाढते परत घटते. पुन्हा काही दिवसांनी अचानक शोध घेणार्‍यांची संख्या वाढते आणि पुन्हा कमी होऊ लागते. या मॉडेलला नॉन सिमेट्रिक असे म्हटले आहे. या विषयामध्ये संबंधित विषयासंदर्भात शोध घेण्याचे मल्टिपल पीक्स येतात. म्हणजेच शोध घेण्याचे प्रमाण त्या काळात खूप वाढते आणि नंतर कमी होते. ठराविक कालावधीमध्ये असे एकापेक्षा जास्त वेळा होते. त्यामुळे असे विषय न्यूज वेबसाईटला पेजव्ह्यूज मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरतात. याचे उदाहरण म्हणजे अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची आत्महत्या. या घटनेनंतर पुढील जवळपास एक वर्ष विविध मुद्दे पुढे येत होते. तपासात नवी माहिती समजत होती आणि वाचक त्या त्या विषयातील माहिती वाचण्यासाठी गुगलवर जाऊन शोध घेत होते.

कोणते विषय लोकांच्या लक्षात राहतात आणि वाचकांचा गुगलवर जाऊन शोध घेण्याचा पॅटर्न कसा असतो हे डिजिटल माध्यमात काम करीत असलेल्या पत्रकाराने कायम लक्षात ठेवले पाहिजे. टार्गेट्स पूर्ण करण्यासाठी तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होईल.

First Published on: December 26, 2021 1:00 AM
Exit mobile version