विजांचे शिल्पाकृती दगड : ‘फल्गराइट’

विजांचे शिल्पाकृती दगड : ‘फल्गराइट’

‘फल्गर’ या लॅटीन शब्दाचा अर्थ विजा असा होतो आणि वितळलेल्या सिलिका म्हणजेच क्वार्झपासून बनणार्‍या ‘लेचटेलीराइट’ म्हणजे विजा पडल्याने वितळून बनणारे ते ‘फल्गराइट’ अशा प्रकारे या शब्दाची उत्पत्ती झाली. ‘विजांचे शिल्पाकृती दगड’ या नावानेदेखील ‘फल्गराइट’ जगात ठिकठिकाणी ओळखले जातात. ‘फल्गराइट’ म्हणजे खाद्य पदार्थातील ‘कबाब’ प्रमाणे आतून पोकळ असलेल्या दगडी नळ्या होय. ‘फल्गराइट’ अनेकदा वेड्यावाकड्या आकाराच्या, एक ते दोन इंच व्यासाच्या, एक फुटापर्यंत लांबी गाठताना आढळतात. वीज कोसळलेल्या जागेच्या खाली पंधरा मीटर खोलीवरसुध्दा ‘विजांचे दगड’ सापडतात. इमारतीच्या गच्चीवर वीज कोसळल्याने लोखंडाचे गज, वाळू, सिमेंट यांच्या मिलाफाने बनलेल्या ‘फल्गराइट’ची देखील माहिती मिळते.

काही ठिकाणी ते गोलाकार, काटेरी, धातू मिश्रित गोळ्याच्या रूपात ‘फल्गराइट’ आढळतात. सोने तसेच चांदीचे कण चिकटलेले ‘विजांचे दगड’ देखील सापडल्याचा उल्लेख आढळतो. पॉझिटिव्ह म्हणजे धन विजा कोसळतात तेव्हा जास्त ऊर्जा असल्या कारणाने अनेक फुटापर्यंत दगडांना वितळविते. त्यातून मोठ्या फल्गराइटच्या आकृत्या साकार होतात. अमेरिकेत उत्तर फ्लोरिडा येथून बाहेर काढण्यात आलेल्या ‘फल्गराइट’ची लांबी 4.9 मीटर इतकी भरल्याने या ‘विजेच्या दगडी नळीला’ सर्वात लांब ‘फल्गराइट’चा सन्मान आतापर्यंत तरी मिळालेला आहे. वाळूपासून बनलेले फल्गराइट व दगड वितळून बनलेले फल्गराइट असे विजांच्या दगडांचे वर्गीकरण केले जाते. वाळवंटी प्रदेशाबरोबरच समुद्र किनारी कोरड्या वाळूत विजा कोसळल्यानेदेखील वाळूचे ‘फल्गराइट’ तयार झालेले आढळतात.

उपलब्ध जमिनीप्रमाणे नैसर्गिक फल्गराइटचा रंग काळा, राखाडी, हिरवा, पांढरट, दुधी काचेसारखा आढळतो. अनेकदा ‘फल्गराइट’ काचेसारखे पारदर्शक तर कधी वितळलेल्या धातूची चकाकी घेत चमचमताना आढळतात. कृत्रिमपणे विजा पडून हुबेहुब नैसर्गिक दिसणारे ‘मानव निर्मित रंगीबेरंगी फल्गराइट’देखील बनविले जातात. काही लोक वाळवंटात वाळूबरोबर काचेचे तुकडे, रंगीत दगड-गोटे आदींचे ढिग बनवून त्यावर लायटनिंग अरेस्टर बसवून त्यावर विजा झेलतात. अशा फल्गराइट बनावटींची करोडो रूपयांची जगात खरेदी-विक्री पण होते, यावर कदाचित लोकांचा विश्वास बसणार नाही. मात्र असे घातक प्रयोग करताना अनेकांनी आपला जीव गमावला आहे हेदेखील लक्षात घ्यायला हवे.

दिवाणखाना सजविण्यासाठी ‘एन्टीक पिस’ म्हणून देखील ‘फल्गराइट’चा वापर केला जातो. अमेरिकेतील बोस्टन येथे ‘म्युझियम ऑफ सायन्स’ मध्ये ‘फल्गराइट’चे असंख्य नमुने पाहायला मिळतात. काही ‘फल्गराइट’ हे चुंबकाप्रमाणे गुणधर्म धारण करतात व चुंबक सुईचीदेखील दिशाभूल करतात. आण्विक चाचण्यांसाठी केल्या जाणार्‍या स्फोटांच्या ठिकाणीदेखील प्रचंड ऊर्जेने ‘फल्गराइट’सारखे दिसणारे हिरवे काचेसारखे दगड तयार होतात, मात्र त्यांना ‘ट्रिनिटाइट’ असे म्हणतात.

सहारा वाळवंटात पंधरा हजार वर्षांपूर्वी तयार झालेल्या ‘फल्गराइट’चा अभ्यास करून वितळलेल्या दगडात अडकलेल्या हवेच्या बुडबुड्यावरून त्यावेळच्या हवामानाची माहिती उपलब्ध झाल्याचा दावा नवारो गॉन्झेल्झ यांनी 2007 मध्ये केला. पंधरा हजार वर्षांपूर्वीच्या काळात सहारा हे वाळवंट नव्हते आणि तेथे सामान्य वातावरणात हिरवळ होती असा धक्कादायक निष्कर्ष त्यांनी या अभ्यासातून मांडला. ‘मैलाचे पत्थर’ बनत ‘फल्गराइट’ अर्थात ‘विजांचे शिल्पाकृती दगड’ खरोखर हजारो वर्षांपूर्वीच्या हवामानाची साक्ष देतात.

 

First Published on: April 17, 2022 5:27 AM
Exit mobile version