माझी मैना गावावर राहिली!

माझी मैना गावावर राहिली!

मुंबईची दुभती गाय म्हणून असलेली ओळख तेव्हासुध्दा होती आणि आतासुध्दा आहे. कोकणातून या मुंबईत चाकरमानी यायचे तसं ‘आली का म्हमई’ म्हणत घाटमाथ्यावरूनही माणसं यायची. पोटातली आग कशी जाळायची, हाच प्रश्न दोन्ही ठिकाणी असायचा. पण तोच सामाईक प्रश्न घेऊन या दोन्ही गावकुसाकडली ती माणसं मिळेल त्या बसने, मिळेल त्या ट्रेनने मुंबईत उतरायची. आधी ती एकटीच यायची. मग एके दिवशी त्यांचा नोकरीचाकरीचा प्रश्न सुटला आणि ती नोकरीत पर्मनंट वगैरे झाली की त्यांचे दोनाचे चार हात व्हायचे. पण गावाकडे लग्न झालं आणि काढलेली रजा संपली की लगेच त्यांना कामावर हजर व्हायला लागायचं. मग नव्या नवरीला गावाकडे तसंच ठेवून मुंबईला यावं लागायचं. बस डेपोकडे किंवा रेल्वे स्टेशनवर निरोप द्यायला आलेल्या बायकोला तसं सोडून जाताना या माणसांच्या जीवाची घालमेल व्हायची. कधी कधी एकत्र कुटुंबातली त्यांची ही कारभारीण घरातल्या वडीलधार्‍या माणसांच्या धाकापुढे दबून जाऊन फक्त नजरेनेच मूक निरोप द्यायची. त्यावेळी तिच्याही जीवाची घालमेल व्हायची आणि याच्याही.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या नजरेतून ही घालमेल त्या काळात अगदी अचूक टिपली गेली. महाराष्ट्राच्या या दोन्ही दिशांनी आलेली ती माणसं कामकरी, कष्टकरी वर्गातली होती. आपल्या वाटेला आलेल्या त्या ठोकळेबाज आयुष्यातही ती सुख मानायची. अण्णाभाऊ साठे याच वर्गातून आले होते. वारणेच्या खोर्‍यात, डोंगरदर्‍यात त्यांचं लहानपण गेलं होतं. पुढे आपल्या वडिलांसोबत पायी चालत ते मुंबईला आले. पोटापाण्यासाठी नोकरीधंद्याच्या शोधात निघाले. माटुंग्यातल्या लेबर कॅम्पातल्या झोपडीत राहिले. पण अडगळीतल्या घरातही त्यांची प्रतिभा बहरली. त्यांच्यातल्या प्रतिभेला अडगळीतल्या घराची अडचण वाटली नाही. त्यांनी बागेतल्या कळ्याफुलांच्या, शहरी प्रेयसीच्या चाफेकळी नाकावरच्या प्राजक्ताची फुले टाइप चांदणओल्या कविता केल्या नाहीत. त्यांचं लिखाण त्यांच्या काबाडकष्टाच्या जगण्यातून आलं. त्यांच्या जगण्याशी समांतर असलेली मार्क्सवादी विचारधारा त्यांनी स्वीकारली. कम्युनिस्ट पार्टीचे ते सक्रिय सभासद झाले. साहजिकच आपली लेखणी त्यांनी पददलित, शोषित, वंचित, पीडित जनतेसाठी झिजवली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर अमर शेख वगैरे मंडळींबरोबर त्यांनी आपल्या प्रतिभेचं हत्यार करून अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला. कम्युनिस्ट चळवळीसाठी ते स्वत:ही राबले आणि त्यांनी आपली लेखणीही राबवली. ‘फकिरा’सारखी अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारी कादंबरी लिहिली. वैचारिक आणि सामाजिक बांधिलकी हा त्यांच्या लिखाणाचा कायम स्थायीभाव होता आणि तो त्यांच्या मृत्यूपर्यंत तसाच राहिला. कम्युनिस्ट चळवळीचा भर ओसरल्यानंतरसुध्दा ते कम्युनिस्ट चळवळीत सक्रिय राहिले. अण्णाभाऊ कायम त्या विचारासाठी जगले. लोकनाट्याचे जनक ठरले. गरीबीचं जिणं जगणार्‍यांचे नायक झाले.

हे असे अण्णाभाऊ एकदा लिहून गेले –

जग बदल घालुनी घाव,
सांगून गेले मला भीमराव,
गुलामगिरीच्या ह्या चिखलात,
रुतून बसला का ऐरावत,
अंग झाडुनी निघ बाहेरी,
घे बिनीवरती धाव.

अण्णाभाऊंचे हेच शब्द पुढे रिपब्लिकन चळवळीचा मंत्र ठरले. आजही रिपब्लिकन चळवळीला हे शब्द प्रेरणा देत राहिले आहेत. अण्णाभाऊंनी मुंबईची लावणी लिहिली ती आजही जुन्याजाणत्यांच्या आठवणीत राहिली आहे.

..तर अशा या अण्णाभाऊंनी, आपल्या कारभारणीला गावीच ठेवून स्वत: मात्र मुंबईत कामाधामासाठी आलेल्या कष्टकर्‍याच्या मनातली जी घालमेल लिहिली त्याला आजही तोड नाही. आजही कुणीतरी तरूण गायक आपल्या खड्या आवाजात एखाद्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये ती गातो तेव्हा अंगावर सरसरून शहारा आल्याशिवाय राहत नाही. अण्णाभाऊंनी लिहिलेले ते शब्द आजही एखाद्याच्या तोंडून ऐकल्यावर मन इतकं सुन्न होतं की पुढे त्याबद्दल काही लिहावंसंच वाटत नाही.
अण्णाभाऊंची ती शब्दरचना, शब्दांमागून येणारे शब्द नुसते वाचत गेले तरीही त्यांचं एका मंजुळ नादातलं, पण तरीही आतून हलवून टाकणारं लिखाण नि:शब्द करून टाकतं. अण्णाभाऊंनी ती घालमेल कशी लिहिली आहे ते पहाच –

माझी मैना गावावर राहिली,
माझ्या जीवाची होतीया काहिली.
ओतीव बांधा, रंग गव्हाळा,
कोर चंद्राची, उदात्त गुणांची,
मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची,
हसून बोलायची, मंद चालायची,
सुगंध केतकी, सतेज कांती,
घडीव पुतळी सोन्याची, नव्या नवतीची, काडी दवण्याची.
रेखीव भुवया, कमान जणू इंद्रधनूची,
हिरकणी हिर्‍याची, काठी आंधळ्याची,
तशी ती माझी गरीबाची,
मैना रत्नाची खाण,
माझा जीव की प्राण,
नसे सुखाला वाण,
तिच्या गुणांची छक्कड मी गायली,
माझ्या जीवाची होतीया काहीली.

उगाच भल्लातकल्प शब्दांचं अवडंबर न माजवता, कळ्याफुलांसारखे कारण नसताना नाजूक शब्द न लिहिता, साध्यासुध्या शब्दांत लिहिून गुंगवून, नादावून टाकणारे असे अण्णाभाऊ साठे वाचल्यानंतर किंवा पहाडी स्वरांत ऐकल्यानंतर पुढे कुणाला काही बोलावंसं वाटेल? आजच्या कॉर्पोरेट भाषेत सांगायचं तर एकच शब्द उच्चारावा लागेल तो म्हणजे – स्पीचलेस!…बस्.

First Published on: January 19, 2020 2:14 AM
Exit mobile version