स्वत:शीच विवाह !

स्वत:शीच विवाह !

स्वत:शीच विवाह !

जगात जर तुम्हाला आनंदी रहावयाचे असेल तर स्वत:वर प्रेम करायला शिका, असा सल्ला तज्ज्ञ मंडळी देत असतात. यामागे अनेक वैद्यकीय कारणे जरी असली तरी आत्मप्रेमातूनच व्यक्तीने स्वत:ची काळजी घ्यावी हा या डॉक्टरी सल्ल्यामागचा मूळ उद्देश असतो. हे सगळं सांगण्याचे कारण की हाच सल्ला गुजरातमधील शमा बिंदु नावाच्या एका 24 वर्षीय तरुणीने प्रत्यक्षात आणला असून तिने स्वत:शीच लग्न केले. यामुळे सध्या देशभरात तिच्या या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण शमाने भारतीयच नाही तर तमाम देशातील विवाह पद्धतीलाच छेद दिला असून लग्नासाठी जोडीदार असायलाच हवा ही परंपराही तिने मोडीत काढली आहे. आयुष्यभराचा जोडीदार म्हणून तिने स्वत:चीच निवड केली आहे. एवढेच नाही तर सामान्य जोडप्याप्रमाणे लग्नानंतर ती हनिमूनलाही जाणार आहे. पण जोडीदाराशिवाय.

अशाप्रकारे स्वत:शीच लग्न करण्याचे देशातील हे पहिले प्रकरण असल्याने समाजात खळबळीपेक्षा या लग्नाबद्दल सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. भारतीय समाज आताच कुठे गे आणि लिव्ह इनबद्दल खुलेआम बोलू लागला असताना, लिव्ह इन नाते स्वीकारू लागला असताना त्यात आता या स्वत:शीच लग्न करण्याच्या sologamy marriage फॅडची भर पडल्याने तरुणांना नवं काहीतरी जरी गवसलं असलं तरी पालकांच्या हृदयाचे ठोके मात्र नक्की वाढले आहेत.

भारतीय समाज हा संस्कृती, रुढी, परंपरा यावर आधारित आहे. विवाहसंस्था हा आपल्या समाजाचा पाया आहे. कारण याच विवाहसंस्थेतून समाज घडतो, फुलतो आणि वाढतो. कुटुंबपद्धती तयार होते. जी पुढे कुटुंबाचेच नाही तर समाजाचेही प्रतिनिधित्व करते. त्यातूनच देश घडत असतो. यामुळे आपल्याकडे आजही मुलगा मुलगी कितीही शिकले जरी परदेशात जाऊन त्यांनी डिग्री जरी मिळवल्या तरी लग्न हा त्यांच्याच नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी सोहळ्याचाच नाही तर प्रतिष्ठेचा दिन असतो. पण जसजसा काळ बदलत आहे तसतशा अनेक रुढी परंपराही बदलू लागल्या आहेत. नवीन पिढी पाश्चिमात्यांचे अनुकरण करण्यात इतकी धुंद झाली आहे की, वर्षानुवर्षाच्या परंपरा कालबाह्य होताहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या कुटुंबाने अनेक वर्षं याच रुढी परंपरा जपत कुटुंबसंस्था टिकवून ठेवल्या त्याच कुटुंबातील तरुणाईला आज लग्नापेक्षा लिव्ह ईनमध्ये राहणे जास्त कम्फर्टेबल वाटू लागले आहे. त्यात आपले मराठी तरुण तरुणीही आघाडीवर आहेत.

यामुळे एका विशिष्ट वर्गातच असे प्रकार सुरू आहेत असं बोलणं आजच्या तारखेला अन्यायकारक आहे. परिणामी अनेकवेळा मुलांच्या प्रेमाखातर किंवा विरोध केल्यास ती दूर जातील या धास्तीने पालक या मुलांच्या सर्व मागण्या मान्य करताना दिसत आहेत. इच्छा नसतानाही पालक मुलाचे किंवा मुलीचे लिव्ह इन रिलेशन मान्य करताना दिसत आहेत. यातील काही सजग पालकांमध्ये तर फॅमिली गेट टुगेदर करत मुलांच्या लिव्ह इन रिलेशनशिपची घोषणा करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. अशा पालकांचा समाजातील टक्काही वाढत आहे.

तर काही ठिकाणी पालक आपला मुलगा किंवा मुलगी गे असल्याचे आपल्याला माहीत असून त्यांच्या गे लग्नास, गे पार्टनरला आपला पाठिंबा असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत आहेत. काळाप्रमाणे पालकांनांही मुलांच्या मनाप्रमाणे आपली पावले पुढे टाकावी लागत आहेत. यात ते मनाने किती सहभागी आहेत हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहेत. त्यात आता देशात पहिल्यांदाच स्वत:शी लग्न करण्याचा पेटंट मिळवण्याच्या प्रयत्नात असणार्‍या शमा बिंदुच्या सोलोगॅमी मॅरिजने भर टाकली आहे. शमाने तिला लग्न न करताच नवरी बनायचं असल्याचं सांगितलंय. शमाचे हे विचार बालिश आणि हास्यास्पद असल्याची तिच्यावर टीका झाली आहे. पण कुठल्याही टीकेला महत्व न देता शमाने स्वत:शी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. तिचा हा निर्णय धाडसी जरी असला तरी आपल्या देशात मात्र तो कितपत स्वीकारला जाईल हे इतक्यात सांगणे कठीण आहे. कारण आपल्या देशात सांस्कृतिक परंपरांचे वर्चस्व आहे. तर या लग्नाचे मूळ हे परदेशातलं आहे. अमेरिकेत 1993 साली लिंडा बारकर या महिलेने स्वत:शी लग्न केले.

जगात पहिल्यांदाच अशाप्रकारे एका व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीबरोबर लग्न न करता स्वत:बरोबर विवाह केल्याने खळबळ उडाली होती. लिंडानेच जगात पहिल्यांदा सोलोगॅमी मॅरेजचा फंडा आणला. या लग्न सोहळ्यात तिने 75 पाहुण्यांना निमंत्रित केले होते. लिंडानंतर हळूहळू इतर देशांमध्येही हा ट्रेंड फोफावू लागला. दरम्यान, हा ट्रेंड काही ठराविक गोष्टींमुळे लोकप्रिय ठरला आहे. आत्मप्रेम या गोंडस नावाखाली जो तो स्वत:च स्वत:वर प्रेम करतोय. यात प्रामुख्याने ज्यांची प्रेमसंबंध, लग्नसंबंधात नात्यामध्ये फसवणूक झाली आहे अशा मंडळी सोलोगॅमी मॅरेज करुन स्वत:ला एका खोट्या नाट्या नात्यात सुखी ठेवू पाहत आहेत. मात्र शरीरसुखासाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर करण्यात हीच मंडळी पुढे आहेत. ही या लग्नाची दुसरी गोष्ट जरी असली तरी या नात्यात सेक्ससाठी मात्र दुसरा पार्टनर ठेवण्याचीही पद्धत आहे. पण त्या रिलेशनशिपमध्ये बांधिलकी नसल्याने आज एक आणि उद्या दुसरा आणि तो ही नाही राहीला तर तिसरा असा खेळ सोलोगॅमी मॅरेजमध्ये सुरू असल्याचे अनेक देशात पाहावयास मिळत आहे. यामुळे सोलोगॅमी मॅरेज काही ठराविक व्यक्तीच स्वीकारताना दिसत आहेत.

आता या ठराविक व्यक्तींबद्दल बोलायचं झालं तर मानसोपचार तज्ज्ञांच्या मते ज्या व्यक्ती नातेसंबंधात असुरक्षित असतात किंवा ज्यांची फसवणूक झालेली असते वा ज्यांनी आपल्या पालकांना, मित्र मैत्रिणींना नात्यामध्ये इच्छा नसताना राहताना बघितले आहे. त्यातील तणाव अनुभवला आहे अशा व्यक्ती सोलोगॅमी मॅरेजला पसंती देत आहेत. तसेच आपण दुर्लक्षिले जात आहोत या असुरक्षित जाणीवेतून इतरांचे लक्ष केंद्रित करण्यासाठीही अशा प्रकारे लग्न करून लक्ष वेधण्याचा उद्योग परदेशात अनेकजण करत असतात. यातील काहीजणांना मानसिक व्याधी जडल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे सोलोगॅमी मॅरिजमध्ये तरुणांच्या तुलनेत तरुणींचे प्रमाण सर्वाधिक आहे. सध्या तरी देशात शमाने या एकल लग्नाचा पाया रोवला असला तरी येत्या काळात तो किती तरुण तरुणी प्रत्यक्षात आणतील हे येणारा काळ सांगणार आहे. तोपर्यंत आपल्या तरूण मुलांना लग्न, लिव्ह ईन रिलेशनशिप आणि सोलोगॅमी मॅरिजवरचे प्रबोधन करावे लागणार आहे.

दरम्यान, सध्याच्या फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाच्या जमान्यात जी व्यक्ती सोशल मीडियावर प्रसिद्ध होते. लोक तिला लगेच फॉलो करायला लागतात. किंबहुना, तिचे अनुकरण करू लागतात. सध्या देशात शमाची तिने केलेल्या सोलोगॅमी मॅरिजची चर्चा आहे. शमाने सामान्य लग्नाप्रमाणेच सगळे विधी करत स्वत:शी लग्नगाठ बांधली आहे. हळदीपासून इतर विधीसाठी तिच्या लग्नास हजर असलेल्या मित्र मैत्रिणी, नातेवाईकांचे फोटो, व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आपण स्वत:शी लग्न करून किती आनंदात आहोत हेच सांगण्याचा प्रयत्न शमा करत आहे. देशात अशा प्रकारचा लग्नसोहळा पार पडण्याची ही पहीलीच घटना आहे. यामुळे सगळा देशच या घटनेकडे अवाक होऊन पाहत आहे. यात अनेकांनी शमाला खूपच खालच्या पातळीवर जाऊन ट्रोलही केले आहे. पण शमा मात्र तिच्या आनंदात आहे.

लवकरच ती गोव्याला हनिमूनलाही जाणार असल्याचे सांगितले जात आहे. शमाच्या आयुष्याचा हा पट कंगणाच्या ‘क्विन’ चित्रपटाची आठवण करून देणारा आहे. जोडीदाराशिवाय एकटं, स्वतंत्र, आनंदात जगता येतं हे कगंणाने चित्रपटात दाखवलं होतं. तर तेच शमाने रियल लाईफमध्ये उतरवले आहे. यामुळे नव्याची नवलाई म्हणा किंवा उत्सुकता आज ना उद्या अशाच काही शमा किंवा शाम यांनी सोलोगॅमी मॅरेज स्वीकारून आयुष्याची नवीन सुरुवात केल्यास आश्चर्य वाटण्याचे काम नाही.


 

First Published on: June 12, 2022 5:26 AM
Exit mobile version