यारा सीली सीली…

यारा सीली सीली…

निर्माती लता मंगेशकर, सहनिर्माते हृदयनाथ मंगेशकर व बाळ फुले आणि दिग्दर्शक गुलजार यांचा ‘लेकीन’ हा चित्रपट 1991 मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचं कथानक गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या एका लघुकथेवर आधारित होतं. यात डिम्पल कापडीया, विनोद खन्ना, अमजद खान, आलोकनाथ यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तर हेमा मालिनी यांनी यात विशेष भूमिका साकार केली. गुलजार यांनी लिहिलेल्या ‘लेकीन’च्या गाण्यांना हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरसाज चढवला आहे. 38 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘लेकीन’ला उत्कृष्ट पार्श्वगायन (लता मंगेशकर), उत्कृष्ट कला दिग्दर्शन (नितीश रॉय), उत्कृष्ट वेशभूषा (भानू अथय्या), उत्कृष्ट संगीत दिग्दर्शन (हृदयनाथ मंगेशकर) आणि उत्कृष्ट गीतलेखन (गुलजार) असे पाच सन्मान मिळाले. तर अभिनेत्री डिम्पल कापडीया, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांना फिल्म फेअर पुरस्कारासाठी नामांकने मिळाली होती. गुलजार फिल्म फेअरचेही उत्कृष्ट गीतकार ठरले.

या चित्रपटाच्या निमित्ताने गुलजार-हृदयनाथ मंगेशकर पहिल्यांदा एकत्र आले. या जोडीने गीत-संगीताचा अभिजात आविष्कार ‘लेकीन’च्या गाण्यांमधून घडवला. चित्रपटात केसरिया बालमा के तुमसे लागे नैन व केसरिया बालमा मोहे बावरी बोले लोग…, दिल मे लेकर तुम्हारी याद…, मै एक सदी से बैठी हू…, सुनियो जी अरज हमारी…, यारा सीली सीली… (सर्व लता), झूठे नैन बोले सांची बतिया… (आशा भोसले, सत्यशील देशपांडे), सूरमयी शाम… (सुरेश वाडकर), जा जा रे… (लता-हृदयनाथ मंगेशकर) अशी एकापेक्षा एक सरस गाणी आहेत. यातल्या प्रत्येक गाण्यावर एक स्वतंत्र लेख लिहिता येईल. आजच्या भागात ‘यारा सीली सीली’ या अनवट गाण्याचा रसस्वाद घेऊ या…

यारा सीली सीली बिरहा की रात का जलना
यारा सीली सीली, यारा सीली सीली
ओ यारा सीली सीली, डोला सीली सीली

गाण्याच्या पहिल्या शब्दापासूनच गुलजारच्या शब्दांची मोहिनी श्रोत्यांना मोहित करायला सुरुवात करते. विरहाची रात्र आसवांनी चिंब झालीये.. याचं वर्णन करण्यासाठी ‘सीली सीली’ या अनोख्या शब्दाचा प्रयोग गुलजारने केलाय. अशी शब्दांची किमया गुलजार सारखा प्रतिभावंतचं करू शकतो ! पुढच्या ओळीत स्वर नि संगीताचं लावण्य प्रत्ययास येतं. या ओळी गाण्याची गतीमध्ये परिवर्तन करतात.

ये भी कोई जीना है, ये भी कोई जीना है
ये भी कोई मरना
यारा सीली सीली बिरहा की रात का जलना
ओ यारा सीली सीली, डोला सीली सीली

पुन्हा एकदा संगीतसाज नवं वळण घेतो. पडद्यावर डिम्पल गहन विचारांमध्ये हरवलेली दिसते आणि गाण्यात गुलजारच्या शब्दांची जादू देखील अजून गहिरी होत जाते. ही विरहणी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणते…

टूटी हुए चूडीयोंसे जोडू ये कलाई मै
पिछली गली में जाने क्या छोड आयी मै
बीती हुई गलियों से,
बीती हुई गलियों से, फिर से गुजरना
ओ यारा सीली सीली, डोला सीली

हाताच्या मनगटावरच्या बांगड्या तुटून त्याचे तुकडे झाले आहेत.. त्या तुटलेल्या बांगड्यांचे तुकडे जोडण्याचा अपयशी प्रयत्न मी करत्येय… आयुष्याचा इथवर झालेला प्रवास मागचं बरचसं काही स्मरण करून देतोय…माझं काय नि किती हरवलं आहे, हे नाही सांगता येतय .. खूप काही हरवल्याची सल मात्र काळीज विदीर्ण करते… भूतकाळातल्या आठवणी पिच्छा सोडायला तयार नाहीत… ह्या आठवणी सारख्या छळतात.. पुन्हा पुन्हा छळतात! गाणं ऐकता ऐकता आपण कधी यात स्वत:ला हरवून बसतो, कळतच नाही. मनाचा ठाव घेत आपल्या आत गाणं उतरत जातं.

पैरो में ना साया कोई सर पे ना साई रे
मेरे साथ जाये ना मेरी परछाई रे
बाहर उजाडा है
बाहर उजाडा है, अंदर वीराना
ओ यारा सीली सीली, डोला सीली सीली

एकटेपण, एकाकीपणा, विरह आणि यामुळे मनाची होणारी घालमेल, तगमग गुलजारने फार नेमक्या नि सुंदर शब्दांमध्ये मांडली आहे. माझ्या सोबत तर सावली देखील येत नाही, अशी तीव्र खंत ही विरहणी व्यक्त करतेय. माझ्या बाहेरचं जग सुंदर, प्रसन्न, आनंदी आणि आलबेल आहे पण माझं अंतरंग मात्र कसं सुनसान, अंधारलेलं, ओसाड बनलेलं आहे. एक प्रकारचं नैराश्य, उदासवाणी खिन्नता त्यात दाटून राहिलेली आहे. हे गाणं चित्रित करताना कॅमेरापर्सन मनमोहनसिंग यांनी गाण्यातला विरह समजून-उमजून आशयानुरूप चित्रीकरण केलं आहे. यासाठी त्यांना आणि सिनेमाचे दिग्दर्शक गुलजार यांना दाद द्यायला हवीच.

संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी उस्ताद आमीर खान यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेतले आहेत. संत कबीर,संत मीराबाई, संत सूरदास यांच्या हिंदी रचनाही त्यांनी संगीतबद्ध केल्या आहेत. शिवाय महान शायर गालिबच्या गझलसुद्धा सूरांत बांधल्या आहेत. मीराबाई यांच्या भक्ती गीतांच्या दोन ध्वनिफिती (चला वही देस आणि मीरा भजन ) काढणारे ते पहिले संगीतकार आहेत. हृदयनाथ मंगेशकरांनी मोजक्या हिंदी चित्रपटांना संगीत दिलं आहे. यामध्ये हरीश्चंद्र तारामती, प्रार्थना , धनवान, मशाल, सुबह, चक्र, लेकीन, माया मेमसाब, लाल सलाम ह्या चित्रपटांचा समावेश आहे. संगीतकार म्हणून फार कमी हिंदी चित्रपट त्यांनी केले. त्यांचा ‘लेकीन’ हा राजमान्यता आणि लोकमान्यता मिळवणारा एकमेव गाजलेला हिंदी चित्रपट म्हणता येईल. शिवाय त्यांची बरीचशी हिंदी चित्रपट गाणी मराठी गाण्यांवर बेतलेली आहेत.

आपल्या गाण्यांच्या जाहीर कार्यक्रमातून त्यांनी खूपदा सांगितलंय की त्यांची अनेक गाणी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी बांधलेल्या चीजांवर आधारलेली आहेत. ते अशा चीजांचा खजिना सोडून गेल्याचं सांगितलं जातं. यावर आधारित एकापेक्षा एक श्रवणीय गाणी हृदयनाथांनी श्रोत्यांना दिली आहेत. लेकीनच्या यशानंतर गुलजार-हृदयनाथ मंगेशकर या जोडगोळीने ‘माया मेमसाब’ हा चित्रपट केला. यातली लता आणि कुमार सानू यांच्या आवाजातली ओ दिल बंजारे…, इक हसीन निगाह का…, खुद से बांते करते रहना…, मेरे सरहाने जलाओ सपने…, ये शहर बडा पुराना है…. ही सर्व सोलो (एकल) गाणी देखील सुश्राव्य झालेली आहेत. पण त्यांची हिंदीतली सर्वोत्तम कामगिरी आणि कलाकृती म्हणजे ‘लेकीन’ ! यातलं कोणतंही गाणं त्यांच्या मराठी गाण्याच्या चालीवर बेतलेलं नाहीये. ‘लेकीन’ची गाणी रसिकांच्या सदैव स्मरणात राहणारी आहेत !

–प्रवीण घोडेस्वार 

First Published on: May 29, 2022 4:50 AM
Exit mobile version