नव्वदोत्तर मराठी कथा : वर्तमानाचे नवे रचित

नव्वदोत्तर मराठी कथा : वर्तमानाचे नवे रचित

मराठीतील कथापरंपरा वैशिष्ठ्यपूर्ण आहे. प्रारंभी नियतकालिकांनी मराठी कथेच्या उत्कर्षास मोठा हातभार लावला. सुरुवातीची कथा तंत्रशरणेच्या, रंजकतेच्या आहारी गेल्याने तिची वाढ खुंटली. पुढे काही काळ तिच्यावर रुपवादाचाही प्रभाव राहिला. साठनंतरच्या काळात वास्तवचित्रण मराठी कथेच्या केंद्रस्थानी आले. मात्र वास्तवाच्या एकरेषीय आकलनामुळे व्यामिश्रतेकडे तिचे दुर्लक्ष झाले. केवळ भरगच्च वास्तव तपशील देऊन कथानकाची लांबण लावल्याने कथेच्या रूपबंधाकडे कमालीचे दुर्लक्ष झाले. या काळामध्ये कथा या वाङ्मयप्रकारात ज्यांनी मूलभूत भर घातली त्यामध्ये व्यंकटेश माडगूळकर, बाबुराव बागुल, चारुता सागर, जी. ए. कुलकर्णी, भाऊ पाध्ये, दिलीप चित्रे, विलास सारंग, भास्कर चंदनशिव, श्याम मनोहर, रंगनाथ पठारे, भारत सासणे, राजन गवस, कमल देसाई, गौरी देशपांडे आणि सानिया यांचा समावेश होतो. या लेखकांनी कथेच्या रुपघडणीत महत्वाची भूमिका बजावली. यातील काही लेखकांनी नव्वदनंतरही सकस अशी कथा लिहिली आहे.

नव्वदनंतरच्या मराठी कथेचा विचार करत असताना जागतिकीकरणाने निर्माण केलेल्या जटील, भयावह समस्यांना दुर्लक्षून चालत नाही. जागतिकीकरणामुळे भारतीय समाज-सांस्कृतिक प्रारुपात मूलगामी बदल झाले. बाजार आणि वस्तूकरणाला महत्त्व प्राप्त झाले. शोषणाच्या नव्या शृंखला तयार झाल्या. जागतिकीकरणातून आकाराला आलेल्या नवभांडवलदार रचनेचे ध्रुवीकरण झाले. शोषित, कष्टकरी, शेतकरी वर्ग यामध्ये भरडला गेला. ग्रामीण आणि नागर जीवनाच्या सीमारेषा धूसर झाल्या. नवे पेच निर्माण झाले. महानगरातील कष्टकरी सामान्य माणसाचा या आक्रमणासमोर निभाव लागला नाही. याच काळात जातीय, धार्मिक अस्मिता अधिक बळकट झाल्या. गावगाड्यातील कृषिजनसंस्कृतीशी निगडित अनेक नव्या समस्या उभ्या राहिल्या. ग्रामीण भागात झालेल्या राजकारणाच्या शिरकावाने गावच्या एकसंधपणाला तडे गेले. स्त्री-पुरुष नातेसंबंधात नवे ताण निर्माण झाले. या कालावकाशाचे वाचन मराठी कथेने कसे केले, अशा सर्व संभ्रमित करणार्‍या गोष्टींना आजच्या कथेने कसा प्रतिसाद दिला, तुकड्या-तुकड्यात विखुरलेल्या आजच्या वास्तवाला सांधण्यासाठी तिने कोणत्या रीती अवलंबल्या, हे पाहणे महत्त्वाचे वाटते.

आजची कथा जीवनानुभवाची विविध क्षेत्रे धुंडाळत आहे. जयंत पवार, समर खडस, नीरजा, आसाराम लोमटे, सतीश तांबे, किरण गुरव, किरण येले, बालाजी सुतार, प्रणव सखदेव, विवेक कुडू, प्रज्ञा दया पवार, मनस्विनी लता रवींद्र या कथाकारांनी मराठी कथेला नवे परिमाण प्राप्त करून दिले आहे. सर्वसामान्य माणसाचे जगणे केंद्रवर्ती ठेवत त्याच्या जगण्यातील विविध परिमितीचे, सूक्ष्म कंगोर्‍यांचे अनेकपदरी दर्शन त्यांनी घडविलेले आहे. या लेखकांनी कथेविषयीच्या पूर्वसमजुतींना ओलांडत नवी जाण प्रस्तुत केली आहे. त्यांचे कथालेखनही अधिकतर दीर्घत्वाकडे झुकणारे आहे. दीर्घकथेचा रुपबंध स्वीकारल्याने त्यांना वर्तमानातील गुंतागुंत, जटिलता कवेत घेता आली आहे. एकापेक्षा अधिक पात्रे केंद्रस्थानी ठेवत वेगवेगळे आवाज पृष्ठस्तरावर आणणे शक्य झालेले आहे.

अशा अनेक आवाजीपणामुळे दीर्घकथेचा स्वतंत्र बाज, आविष्कारणाची निराळी रीत विकसित झाली आहे. अपेक्षित परिणामासाठी रूपाची ही घडण फायदेशीर ठरली आहे. नेमाडे यांची कथेविषयीची विधाने सकारात्मक अर्थाने आजच्या मराठी कथेला बळ पुरवणारी ठरली आहेत. चिंचोळा, एकसुरी, गौण म्हणून स्थिरावलेल्या या वाङ्मप्रकारात नजीकच्या काळात फार मोठे बदल झाले. या काळातील कथालेखक बहुविध आशयसूत्रे, त्यातील अंतर्विरोध नेमकेपणाने मांडत कथालेखनाचे एक नवे रचित साकारत आहेत. वरवरचे पृष्ठस्तरीय वास्तव मांडण्यापेक्षा खोलवरचे गर्भित सूचन करण्याकडे त्यांचा कल आहे. धर्म, जात, लिंग, प्रदेश अशा अस्मिताकेंद्री गोष्टींची दाट छाया पसरलेल्या आजच्या काळाची वस्तुनिष्ठ चिकित्सा करण्याचे काम या लेखकांनी केलेले आहे. शोषित, वंचित, कष्टकरी वर्ग सातत्याने त्यांच्या कथेतून अवतीर्ण झालेला आहे. स्त्री-पुरुष नातेसंबंधाकडेही बदलत्या कालभानाच्या आणि मूल्यभानाच्या परिप्रेक्षातून त्यांनी पाहिले आहे.

या काळाचे समर्थ कथाकार म्हणून जयंत पवार यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. मराठी कथेच्या कक्षा रुंदावण्यामध्ये त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. महानगरातील पालटलेल्या स्थितीगतीचा, सामान्य माणसाच्या विस्थापनाचा, कष्टकरी कामगारांच्या समूह मानसिकतेचा तळठाव त्यांची कथा घेते. वास्तव आणि कल्पिताचा खेळ उभा करत पृष्ठस्तरीय अनुभवद्रव्याचे अनेक कंगोरे त्यांनी उजागर केलेले आहेत. रहस्यकथेच्या रुपबंधाचा अभिनव वापर त्यांनी केला. इतिहासाचे, पुराणांचे पुनर्वाचन केले. अनेकांच्या दृष्टीतून कथा रचली. कोणत्या पात्राच्या कथनातून आपण विधानापर्यंत पोहोचू यासंबंधीच्या शक्यता तपासल्या. कथनाचे सातत्याने प्रयोग केले. यामुळे त्यांना एकापेक्षा जास्त पात्रांचे जीवनानुभव कथेच्या संरचनेत मुरवता आले. या वैविध्यामुळे त्यांची कथा बहुपदरी झाली. समर खडस यांची कथा ही महानगरीय अवकाशासंदर्भात असली तरी ती धार्मिकता, स्त्री-पुरुष संबंध, राजकारण, हिंसा, क्रौर्याचे विदारक दर्शन घडविते. आपल्या कथांच्या शेवटी ज्या सत्याकडे ते नेतात, ते क्रौर्याने भारलेले असते. त्यांच्या कथेतील मानवी हिंस्त्र दर्शनाने रूढ वाचकाला असांकेतिकतेचे धक्के बसतात. अतिशय प्रवाही, उत्कंठावर्धक आणि बेधडक शब्दबंधातून त्यांनी समकालीन समाजवास्तवाची केलेली चिकित्सा ही समाजचिकित्सेचा नमुनादर्श आहे.

आसाराम लोमटे आणि किरण गुरव यांसारखे कथाकार गावपरिसरातील बदलाची चित्रे वेगळ्या संवेदनदृष्टीतून चित्रित करत आहेत. भाबडा रोमॅटिकपणा, रजंकता, प्रादेशिकता अशा सापळ्यात अडकलेल्या ग्रामीण कथेला समष्टीच्या, जीवनदर्शनाच्या पातळीवर नेण्याचे काम या कथाकारांनी केले. आसाराम लोमटे यांच्या कथासृष्टीत काळबदलाचे मूल्यात्म भान आहे. दोन पिढ्यांमधील अंतर, गतिमान विकास आणि मूल्यर्‍हास यामधील ताणाचे पडसाद त्यांच्या कथेत आहेत. शेतकरी आंदोलने, शेतीसमोरील आव्हाने, गावगाड्यातील प्रभुत्वसंबंध, अवर्षणग्रस्तता, स्त्रीशोषण, राजकारण अशा अनेक प्रश्नांना पृष्ठस्तरावर आणत त्यामागील कार्यरत व्यवस्थांची चिकित्सा करण्याचे काम त्यांची कथा करते. ग्रामीण बोलीतील ओघवत्या कथनशैलीतून सजीव असे कथाशिल्प त्यांनी घडविले आहे. मुख्य कथानकास समांतर उपकथानकांच्या सांधणीमुळे त्यांच्या कथेला अनेक आवाजीपण प्राप्त झाले.

किरण गुरव यांनी आपल्या कथेत बाईपणाच्या दुःखाच्या अनेकमीती साकारल्या आहेत. गावगाड्यातील बाईच्या मनोव्यापाराची सूक्ष्म निरीक्षणे नोंदवली आहेत. तसेच नवशिक्षित तरुणांच्या धडपडीचे, बेकारीचे प्रभावी चित्रण त्यांच्या कथेत आहे. नोकरी अभावी छोटे व्यवसाय सुरू करणार्‍या तरुणांच्या स्वप्नाकांक्षा नवभांडवली जगाच्या आक्रमणात धुळीस मिळतात. या तरुणांच्या शिकण्याच्या, संघर्षाच्या, स्थित्यंतराच्या अनेक कहाण्या गुरव यांनी साकारल्या आहेत. भौतिक अवकाशाच्या शिरकावामुळे ग्राम अवकाशाचा बदललेला चेहराही त्यांनी ताण्याबाण्यासह साकारलेला आहे. अलंकृत भाषेचा वापर करूनही त्यांच्या भाषेतील नैसर्गिक सहजता कुठेही उसवत नाही. किरण येले यांनी ‘मोराची बायको आणि तिसरा डुळा’ या संग्रहातून स्त्री-पुरुष नातेसंबंधाच्या विविध परी शोधण्याचा प्रयत्न केला आहे. स्त्री-पुरुष संबंधातील कुतूहलजन्य, नाजूक प्रश्नांना त्यांनी कथारचनेच्या केंद्रस्थानी आणले आहे. महानगरीय जगण्यातील गुंते, ताणेबाणे, अस्वस्थता, तगमग आणि या सर्वाला वेढून येणार्‍या लिंगभावाचे वेगळे असे विश्व येले यांच्या कथेत आहे. त्यांची कथा पिचलेल्या, दबलेल्या लोकांच्या वेदनेलाही मुखर करते. अतिशय काव्यात्म, संवादी शैलीतून त्यांनी अनुभवद्रव्याला सुसंघटित आकार दिला आहे.

नीरजा, प्रज्ञा दया पवार, मनस्विनी लता रवींद्र या समकाळातील महत्वाच्या कथालेखिकांनी स्त्री-पुरुष नातेसंबंधातील विविध आयामांचा धांडोळा घेतला. एकाकीपण, तुटलेपण, हतबलता, प्रेम, वासना, भय, मृत्यू, कोंडमारा, लिंगभेद याविषयीचे प्रखर भान त्यांच्या कथांमधून अभिव्यक्त झाले आहे. लिंगभावाची केलेली मांडणी पारंपरिकतेपेक्षा वेगळी आहे. अनुभवद्रव्याला तितक्याच ताकदीने पेलणारी काहीशी असांकेतिक भाषा या लेखिकांनी योजलेली आहे. याशिवाय आजच्या काळात प्रणव सखदेव, बालाजी सुतार, विवेक कुडू यांनीही महत्त्वाची अशी कथा लिहिली आहे. आधुनिकोत्तर जाणिवांची संवेदनचित्रे त्यांच्या कथेत आहेत.

एकंदरीत आजची मराठी कथा अनेक सर्जक शक्यता आजमावत आहे. या काळातील कथालेखकांनी प्रचलित संकेतव्यूह झुगारत कथेची संरचना अधिक प्रसरणशील केली आहे. आधीच्या कथेपेक्षा आशय आविष्काराची धाटणी निराळी आहे. या कथाकारांनी मानवी जगण्यातील अंधार्‍या कोपर्‍यांना उजागर केले. कल्पिताचा सजगपणे वापर केला. वास्तवाचे बहुमुखीपण अधोरेखित करण्यासाठी कथनाच्या विविध पद्धती अवलंबल्या. या काळातील कथेची भाषा चिंतनशीलतेकडे, वैचारिकतेकडे झुकत असली तरी तिच्यातील दृश्यात्मकताही तितकीच प्रभावी आहे. आशय आणि भाषेचे अनोन्य नाते या कथांमध्ये पाहायला मिळते. कथा हा दुय्यम नाही तर महत्त्वाचा वाङ्यप्रकार आहे, एवढी आश्वासकता या काळातील कथेने नक्कीच निर्माण केली आहे. कथा या साहित्यप्रकाराकडे सांस्कृतिक राजकारण तसेच कथाकारांच्या आक्रसदृष्टीमुळे प्राप्त झालेल्या मर्यादांना उल्लंघून नवी कथा हे कथाकार घडवीत आहेत, हे मराठी कथेचे सुचिन्हच म्हणावे लागेल.

–संदीप दळवी 

First Published on: May 16, 2021 4:50 AM
Exit mobile version