लोककल्याणकारी राजा

लोककल्याणकारी राजा

महाराष्ट्र ही रत्नांची खान आहे. या खाणीत जन्माला आलेली रत्न ही चिरकाल लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. अनेक शतकांच्या काळरात्रीनंतर स्वराज्याचा उषःकाल येथील रयतेला उघड्या डोळ्यांनी बघता आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपाने लोककल्याणकारी रयतेचा राजा या भूमीला मिळाला. साहस, धैर्य आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन मुघलांची जुलमी राजवट उलथवून टाकत लोककल्याणकारी स्वराज्याची स्थापना केली. अठरापगड जातीतील लोकांना एकत्र करून प्रत्येकाच्या हाताला काम आणि पोटाला भाकर दिली. साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी प्रत्येक क्षेत्रात केलेलं काम आजच्या राज्यकर्त्यांना लाजवेल असंच आहे. शिवरायांच्या काळातील लष्कर, न्यायव्यवस्था, अर्थव्यवस्था, शेती, पर्यावरण, उद्योग, जलव्यवस्थापन, राजनीती यासारख्या क्षेत्रातील काम हे आजही आदर्शवत आहे.

प्रजा सुखी तर राजा सुखी. या गोष्टीचे तंतोतंत पालन करत रयतेची सेवा केली. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये. अशी सक्त ताकीद देत शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने आत्मनिर्भर बनवले. शेतीची योग्य पद्धतीने मोजणी करून त्यात पिकवल्या जाणार्‍या पिकाची नोंद केली. तेव्हापासूनच पिकाची नोंद ही महसूल दप्तरी लावली जाऊ लागली. दुष्काळ पडल्यावर वेळोवेळी शेतसारा माफ केला. सावकारी पाशातून शेतकर्‍यांना मुक्त केलं. शेतीची आणि शेतकर्‍यांची काळजी घेतल्यानेच छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात कधी शेतकर्‍यांची आत्महत्या झालेली आढळत नाही. स्वराज्यात शेती हाच मुख्य आधार होता. शेतीला लागणार्‍या पाण्यासाठी पाणी अडवून बंधारे बांधले. शेतीसाठी लागणारी साधनसामुग्री उपलब्ध करून दिली. यामुळे छत्रपतींनी अंमलात आणलेले उपाय शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने सुखी संपन्न करणारे ठरले.

महाराज धर्मनिरपेक्ष, न्यायी, समतावादी आणि चारित्र्यसंपन्न होते. महाराजांची राजनीती ही धर्मवादी, जातीवादी किंवा भाषावादी नव्हती तर ती लोककल्याणकारी होती. आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाच्या जोरावर आणि योजनाबद्ध अविरत परिश्रमाने महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. रयतेमध्ये देशभक्तीची भावना निर्माण केली. महाराजांनी आपल्या शासनात शिस्त आणली आणि न्यायदान करताना कुणाचीही गय केली नाही. गैरकारभार करणार्‍या अधिकार्‍यांना वेळीच समज देऊन स्वराज्याला डाग लागू दिला नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे दूरदृष्टीचे राज्यकर्ते होते. 1673 मध्ये महाराजांनी चिपळूणच्या सैन्याधिकार्‍यांना पत्र लिहिताना ‘मोगलाई बरी वाटेल, असे वागू नका’ म्हणून सुनावले होते. सैन्यावाचून राज्य धन आणि पराक्रम प्राप्त होत नाही. यातूनच महाराजांनी आपल्या लष्कराची आणि आरमाराची उभारणी केली. यातून स्वराज्याची देखभाल तर झालीच परंतु, स्वराज्यात व्यापारदेखील बहरला. आपल्याकडे असलेले अपुरे सैन्यबळ, डोंगर दर्‍यांमधील भौगोलिक परिस्थिती, मर्यादित साधनसामुग्री या सर्व गोष्टी विचारात घेऊन आपली युद्धनीती आखून गनिमीकाव्याने अनेक गड किल्ले ताब्यात घेतले आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा कोणत्याही व्यक्तिगत लाभासाठी नव्हता, तर तो परिवर्तनासाठी होता. सर्व जनतेला सन्मानाने जगता यावे. यासाठी स्वराज्याची गरज ओळखून रयतेची मानसिकता बदलली. आणि राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक गुलामगिरी मोडून काढत समता आणि बंधुता स्थापित केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य म्हणजे शहाजीराजे आणि जिजाऊ माँ साहेबांची स्वप्नपूर्ती होती. आजही शिवरायांच्या उंचीचे व्यक्तिमत्व जागतिक इतिहासात सापडत नाही. राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान, राष्ट्रभक्ती या त्रिसूत्रीची ओळख म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. जगातील अनेक चळवळींचे प्रेरणास्थान हे शिवराय राहिले आहेत. शिवरायांच्या गनिमीकाव्याने अनेक चळवळी राबविल्या गेल्या आणि विजयदेखील मिळवल्याचे अनेक दाखले आपल्याला मिळतात. जगातील अनेक सामाजिक घडामोडींचे प्रेरणास्थान हे छत्रपती आहेत. यामुळेच शिवरायांना एक आदर्श राजा, उत्तम प्रशासक, कुशल नेतृत्व, दूरदृष्टीचा प्रणेता म्हणून ओळखलं जातं.

आज समाजात अनेक समाजविघातक विकृती वाढत चालल्या आहेत. नीतीमूल्यं पायदळी तुडवली जात आहेत. अन्याय, अत्याचार वाढत आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला पुन्हा छत्रपती शिवरायांचे आचार-विचार समजावून सांगण्याची वेळ आली आहे. छत्रपती शिवरायांचे सर्वव्यापी धोरण राबविण्याची नितांत गरज आता भासू लागली आहे. कारण ज्या शेतकर्‍यांना शिवरायांनी जवळ केलं. वेळोवेळी शेतीसाठी लागणारी साधनसामुग्री पुरवली आणि शेतकर्‍यांना त्यांच्या पायावर उभं करून खर्‍या अर्थाने समृद्ध केलं, आज त्याच शेतकर्‍यांना आपल्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरावं लागतंय. तरीदेखील न्याय मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून आजदेखील शिवरायांचे ध्येय धोरण राबवून देशातील प्रत्येक घटकांना न्याय देऊन समृद्ध करणं ही आजची गरज बनली आहे.

अशा या लोककल्याणकारी राजाची जयंती 19 फेब्रुवारीला आपण मोठ्या उत्साहात साजरी करतो. सातासमुद्रापार हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. हा सोहळा साजरा करताना शिवरायांचे विचार प्रत्यक्ष अंमलात आणणे गरजेचं आहे. जेव्हा हे विचार देशातल्या शासन, प्रशासन आणि जनतेच्या वागणुकीत येतील तेव्हाच खर्‍या अर्थाने या लोककल्याणकारी राजाची ध्येय धोरणे आणि विचारांचे सार्थक होईल.

झाले बहू होतील बहू
परी या सम हा…

-लखन सावंत 

First Published on: February 7, 2021 2:00 AM
Exit mobile version